राधानगरीत पावसाळ्यापूर्वी फुलपाखरू उद्यान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

राधानगरी - तब्बल १२१ प्रजातींच्या फुलपाखरांचे अस्तित्व व फुलपाखरांचे नंदनवन ठरलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यात हत्तीमहाल येथे प्रस्तावित वैशिष्ट्यपूर्ण ‘फुलपाखरू उद्यान’ आकाराला येत आहे.

राधानगरी - तब्बल १२१ प्रजातींच्या फुलपाखरांचे अस्तित्व व फुलपाखरांचे नंदनवन ठरलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यात हत्तीमहाल येथे प्रस्तावित वैशिष्ट्यपूर्ण ‘फुलपाखरू उद्यान’ आकाराला येत आहे.

यंदाच्या पावसाळ्यापूर्वी या उद्यानाची निर्मिती पूर्णत्वास जाईल. जवळपास २८ लाख रुपयांच्या खर्चातून १८ गुंठे क्षेत्रात या उद्यानाची निर्मिती होत आहे. पर्यावरणतज्ज्ञ सुहास वायंगणकर यांच्या संकल्पनेतून या उद्यानाचा आराखडा तयार केला आहे.

१२१ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद
राधानगरी वन्यजीव अभयारण्यात १२१ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद केली आहे. सदर्न-बर्ड विंग हे भारतातील सर्वांत मोंठे फुलपाखरू (१९० मि.मी.) व ग्रास ज्युवेल हे सर्वांत लहान फुलपाखरू (१५ मि.मी.) येथे आढळते. हजारोंच्या संख्येने एकत्र जमून सामूहिक स्थलांतर करणारे ब्लू टायगर, ग्लॉसी टायगर, स्ट्राईक टायगर ही फुलपाखरेही येथे ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये आढळतात. या पार्श्‍वभूमीवर फुलपाखरू उद्यान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

निसर्ग पायवाटा, सुरवंट संवर्धन केंद्र, निसर्ग निर्वाचन केंद्र, फुलपाखरांसाठी खाद्य वनस्पतींची लागवड, लहान तळी, काटेरी कुंपण आदी कामांचा यात समावेश आहे. राधानगरीत सप्टेंबर २०१६ मध्ये फुलपाखरू महोत्सव झाला. या महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर प्रस्तावित फुलपाखरू उद्यानाचा प्रस्ताव वन्यजीव विभागाने तयार केला. अभयारण्यक्षेत्रात निसर्गपर्यटन विकासासाठी यंदा पहिल्यांदाच ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीतूनच प्रस्तावित फुलपाखरु उद्यानाची निर्मिती गतीने सुरू आहे.

निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत प्रस्तावित फुलपाखरू उद्यान, राऊतवाडी धबधबा क्षेत्र सुधारणा व सुरक्षिततेच्या उपाययोजना, हत्तीमहाल क्षेत्रात आकर्षक कारंजे, तळ्यांची निर्मिती, वाहनतळ यामुळे आगामी काळात अभयारण्यक्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढणार आहे.

राऊतवाडी धबधबा क्षेत्र सुधारणा कामांत धबधबा स्थळाला जाणाऱ्या ओढ्यावर लोखंडी पूल, पायवाटेला संरक्षण कठडे, परिसरात पेव्हिंग व्लॉक यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. ही कामेही यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन वन्यजीव विभागाने आखले. दुसऱ्या टप्प्यात धबधबा स्थळी वाहनतळ, पर्यटकांसाठी उपाहारगृह, महिला व पुरुषांसाठी प्रसाधनगृह, मनोरे या कामांचा समावेश आहे. प्रस्तावित योजनेतून धबधबा क्षेत्राचा कायापालट होणार असून ते पर्यटकांसाठी सुरक्षित पर्यटनस्थळ बनणार आहे. निसर्ग पर्यटन निधीतून हत्तीमहाल क्षेत्रातही पर्यटकांसाठी पार्किंग शेड, वन्य प्राण्यांच्या प्रतिकृती, निसर्ग निर्वाचन केंद्राचे अत्याधुनिकीकरण आदी कामे अंतिम आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Butterfly garden in Radhanagari before mansoon