चला व्यंगचित्रे बघायला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

‘सकाळ’च्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त बाबूराव पेंढारकर कलादालनात भरलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनास सुरुवात झाली. महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले.

कोल्हापूर - स्थलांतरित पक्ष्यांविषयी सर्वत्र कुतूहल असते. गेल्या दोन वर्षांत भारतातून काही पक्षी परदेशात स्थलांतरित झाले. त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात वेगळेच भाव खदखदत आहेत. ते स्थलांतरित पक्षी म्हणजे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि इतर मंडळी. त्यांचे व्यंगचित्र... तर अच्छे दिन आगे हैं, असे सांगणारा नामफलक जवळ का येत नाही, हे सांगणारे व्यंगचित्र आणि मोदीविरोधी राजकारणाची शिजू लागलेली बिरबल छाप खिचडी... अशा बऱ्याच राजकीय व्यंगचित्रांनी राजकीय, सामाजिक, प्रशासकीय पातळीवर होणाऱ्या घोटाळ्यांवर मार्मिक भाष्य केले आहे, तर कधी चिमटे घेत मनमुराद हसवले आहे. या साऱ्या हास्यछटा दैनिक ‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त भरलेल्या ‘पोलिटिकली करेक्‍ट’ या राजकीय व्यंगचित्र प्रदर्शनातून व्यक्त झाल्या आहेत.    

‘सकाळ’च्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त बाबूराव पेंढारकर कलादालनात भरलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनास सुरुवात झाली. महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक भाऊसाहेब पाटील, संपादक संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, जयेश ओसवाल, ललित गांधी, दिलीप माने. उपस्थित होते.  

या प्रदर्शनात व्यंगचित्रकार मनोज कुरील यांचे ‘मोदीविरोधी राजनीतीची’ हे बिरबल छाप खिचडी शिजू लागल्याच्या गमतीशीर छटा मांडणारे व्यंगचित्र आहे. नीलेश जाधव यांची महाराष्ट्र डोक्‍यावर घेऊन धावणाऱ्या ‘देवेंद्र’ यांची छबी अफलातून आहे. राष्ट्रीय, प्रादेशिक समस्यांनी तापमान वाढविणारी तापमापी विकास सबनीस यांच्या व्यंगचित्राने रेखाटली आहे. 

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा दगड अंगावर घेऊन पडलेला सामान्य माणूस, त्या दगडावर निद्रासन करणारे सरकारी रूप, इंधन दरवाढीमुळे होणाऱ्या महागाईवर मार्मिक भाष्य करून जाते. तर कप्तान यांचे व्यंगचित्र सरकारी योजना उपक्रम व प्रचाराची घोषवाक्‍यं आणि वास्तव यातील दरी दाखवित अंमलबजावणीची खिल्ली उडवते.

घनःश्‍याम देशमुख यांनी बिलंदर राजकीय नेता, त्यांच्या पत्नी यांच्यात खासगीत होणारी राजकीय संवादातील टीकाटिप्पणी खुमासदार शैलीत मांडली आहे. नेत्यांची टोपी व बाईसाहेबांच्या साडीची कडक इस्त्री आकर्षक रंगसंगतीतून त्यांनी नेटकेपणाने सजविली आहे. तितकेच कडक भाष्यही त्यांनी व्यंगचित्रातून केले आहे. 

अनिल डांगे यांनी निवडणूक कार्यालयातील सरकारी संवाद चित्ररूपात रंगवलाय, तर ‘अच्छे दिन आगे हैं’ असे सांगत तिघे केंद्रीय नेते एका घोड्यावर बसून महागाईच्या दरीवरून अच्छे दिनच्या डोंगरावर झेप घेतायंत. सध्या देशातील वाढलेली महागाई भेदून अच्छे दिनचे स्वप्न साकारण्यातील अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी तिथे उपाययोजनांचा पूल बांधण्याची कशी गरज आहे, यावर ‘नेमकं’ भाष्य करणारे हे व्यंगचित्र चर्चेचं ठरतंय.

गेल्या काही वर्षांत राजकीय नेत्यांकडून ऊठसूट आश्‍वासनांचा पाऊस पाडला जातोय; पण पूर्वीच्या सत्ता काळात भिक्षेकरी होतेच, ते आजच्या बदलत्या तंत्रज्ञान युगातही कायम आहेत. त्यांच्या जवळून जाणारा नेता म्हणतो ‘काळजी करू नका, आपल्या बॅंकेच्या खात्यात थेट पैसेच पैसे टाकणार आहे’, असे विनय चानेकर यांचे आश्‍वासन देणारे व्यंगचित्र मार्मिक आहे.  

राज, उद्धव बंधू गाडी-गाडी खेळताना दोघांच्या चेहऱ्यावरील भाभडे भाव ‘बरंच काही’ सांगून जातात. या दोन्ही भावंडांनी हे चित्र पाहिले, की एकमेकांना नक्की आलिंगन देतील, याची खात्री देणारे हे चित्र प्रभाकर वाईकर यांनी लक्षवेधी रेखाटले आहे.

परराज्यांतील व्यंगचित्रकार 
शेखर गुरेरा (हरियाना), कार्तिश भट (दिल्ली), इस्माईल लहरी (मध्य प्रदेश), सतीश आचार्य (कर्नाटक), शाम जगोता (दिल्ली), मनोज कुरील (दिल्ली), सागर कुमार (मध्य प्रदेश), हरिओम तिवारी (मध्य प्रदेश), त्र्यंबक शर्मा (छत्तीसगड), माधव जोशी (दिल्ली), पवन (बिहार), चंद्रशेखर हाडा (राजस्थान), कप्तान (मध्य प्रदेश), मंजूल.

व्यंगचित्रकार असे 
विकास सबनीस, प्रभाकर वाईरकर, मनोहर सप्रे, खलील खान, प्रभाकर झळके, अनिल डांगे, घनश्‍याम देशमुख, विनय चरेकर, संजय मेस्त्री, विनय चानेकर, अलोक, नीलेश खरे, नीलेश जाधव, जगदीश कुंटे, राजीव गायकवाड, गणेश काटकर, भटू बागले, दिनेश धनगव्हाळ, अतुल पुरंदरे, योगेश भगत, गजानन घोंगडे, गौरव यादव, उदय मोहिते, राधा गावडे, अशोक बुलबुले, विश्‍वास सूर्यवंशी, धनराज गरड, राहुल सावे, सिद्धेश देवधर, शौनक संवत्सर, अनंत दरडे, राम माहुरके, रणजित देवकुळे, गणेश भालेराव, अविनाश जाधव, संतोष घोंगडे, सिल्केश वऱ्हेकर, आशुतोष वाळे, भरत सावंत, रवींद्र राणे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News cartoon exhibition