मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 May 2018

कोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ते फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देत होते.

कोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ते फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देत होते.

दैनिक सकाळचे निवासी संपादक श्रीरंग गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार विजय जाधव, चारुदत्त जोशी यांनी मंत्री पाटील यांच्याशी फेसबुक लाइव्हवर गप्पा मारल्या. त्यातून मंत्री पाटील यांनी अनेक विषयांना स्पर्श करून भाजप सरकार सरसच असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. 

कृषी, ऊस उत्पादक, पर्यटन, सहकार, भूविकास बॅंकेसह राजकारणावर त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय?’ यावर मंत्री पाटील म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. न्यायालयात लढण्यासाठी मागासवर्गीय आयोग राज्यभर जनसुनावणी घेत आहे. ॲड. साळवी यांच्याशी आमची चर्चा झाली आहे. जनसुनावणी पूर्ण झाल्यावर ताकदीनिशी न्यायालयात बाजू मांडू. सद्यःस्थितीत कोल्हापुरातील सदरबाजार येथे ७२ मुलांसाठी वसतिगृह होत आहे.’’ 

ते म्हणाले, ‘‘मराठा समाजातील मुलांना ६०५ अभ्यासक्रमांत वैद्यकीयसह इतर शिक्षणासाठी १०० टक्के शुल्क भरावे लागत होते. नंतर सरकार त्यापैकी ५० टक्के परत करत होते; मात्र आम्ही हा निर्णय बदलला आहे. आता केवळ ५० टक्के शुल्क भरून मुलांना शिक्षण घेता येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक ते सर्व काही देण्याचा प्रयत्न आम्ही शासन म्हणून करीत आहोत.’’ लिंगायत आणि धनगर समाजासाठीही आरक्षण देण्याची मानसिकता सरकारकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान कोल्हापुरात येणार
देशातीलच नव्हे, तर जगातील पर्यटक कोल्हापुरात येतील, असा फ्लॉवर पार्क कणेरी मठावर साकारला जात आहे. त्याचे काम सुरू आहे. त्याचे उद्‌घाटन करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी कणेरी मठावर येणार असल्याचेही संकेत त्यांनी या वेळी दिले.

... तर मीही  निवडणूक लढवेन
पाकिटावर ज्याचे नाव असेल, पत्ता असेल तिकडे ते जाते. तशीच माझी अवस्था आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मला सांगितले, ‘निवडणूक लढवा,’ तर मी ही विधानसभा निवडणूक लढवेन, असेही मंत्री पाटील एका प्रश्‍नावर म्हणाले. उत्तर मधून लढणार की अन्य कोणत्या मतदारसंघातून यावर ते काहीच बोलले नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Chandrakant Patil comment