साखरपेरणी, गुगली आणि तोफगोळे!

साखरपेरणी, गुगली आणि तोफगोळे!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दक्षिण महाराष्ट्र दौरा व त्या निमित्ताने उभय नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली मुरब्बी राजकीय खोचक टिप्पणी, हे पाहता आगामी निवडणुकीचे जणू पडघम वाजू लागले असून, याची चाहूल मतदारांना लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यात शरद पवारांनी केलेली राजकीय गुगली अधिक लक्षवेधी ठरली. या निमित्ताने सहकारातील दिग्गज व्यक्तिमत्त्व यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, तात्यासाहेब कोरे आणि विक्रमसिंह घाटगे यांच्या सहकारातील कर्तृत्वाला उजाळा मिळाला.

वास्तविक, पश्‍चिम महाराष्ट्र म्हणजे सहकार व साखरेचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील सत्ता व अर्थकारण हे सहकारी संस्थांच्या माध्यमातून सुरू असते. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला राहिला आहे. गेली कित्येक वर्षे या साखर पट्ट्यात आपले स्थान निर्माण करण्यासाठी शिवसेना-भाजप धडपडत होती. गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत येथे शिरकाव करण्याची त्यांना संधी मिळाली. आता हाच राजकीय खुंटा अधिक बळकट करण्यासाठी साखर पोत्यांचे पूजन, बॅंकेचे नामकरण, इथेनॉल प्रकल्प शुभांरभ, शेतकरी व 
व्यापारी संवाद या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली, कोल्हापूर दौऱ्याची संधी साधली. पूर्वी मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हटले की, त्या जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा, प्रलंबित प्रश्‍नांची 
माहिती, त्यासाठीच्या बैठका होत होत्या; पण फडणवीस, ठाकरे यांचा शनिवारचा दौरा त्याला अपवाद ठरला, हे मात्र निश्‍चित. हा दौरा खऱ्या अर्थाने राजकीय टोलेबाजीने गाजला.

यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या आधारे आमचे सरकार काम करत आहे, असा निर्वाळा मुख्यमंत्री फडणवीस यांनी देताच शरद पवार यांनी अचूक राजकीय टायमिंग साधत यशवंतरावांच्या विचारांचा आपला राष्ट्रवादी पक्ष खरा वारसदार असल्याचे बजावले. यातून पवार यांनी भाजप आणि यशवंतरावांच्या विचारधारेत अंतर असल्याचे दाखवून दिले. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे वर्षातील सर्वांत मोठा विनोद असल्याचा टोला हाणत खिल्ली उडवली. कै. नागनाथअण्णा नायकवडी यांनी स्थापन केलेल्या हुतात्मा साखर कारखान्यावरील मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर शरद पवार यांनी टीका करताना आयुष्यभर जातीयवादी पक्षाच्या नेत्यांना बाजूला ठेवणाऱ्या अण्णांच्या आत्म्याला आज काय वाटत असेल, असाही सवाल उपस्थित केला. 

वारणानगर येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात नियोजित प्रश्‍नांव्यतिरिक्त काही नव्हते. दोन दिवसांच्या दौऱ्यात फडणवीस यांनी सरकारच्या विरोधकांचा समाचार घेतला. एका बाजूला उद्धव ठाकरे सरकारचे वस्त्रहरण करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेवर जास्त टीका न करता बचावात्मक पवित्रा घेत दोन्ही काँग्रेसलाच लक्ष्य केले.

उद्धव ठाकरे यांनी मात्र कोल्हापुरात आगमन झाल्यापासून ते माघारी फिरेपर्यंत भाजप सरकार, मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेचा भडिमार केला. त्यांच्या भाषणातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही सुटले नाहीत. मग पवार यांनीही ‘शिवसेनेचा पाय सत्तेच्या ‘फेविकॉल’मध्ये अडकून बसला आहे,’ अशी टीका करत उद्धव यांना डिवचले. यावर ‘पवार हे दुसऱ्याचा संसार मोडण्याची वाट पाहतात,’ असा प्रतिहल्ला करत काहीही झाले तरी शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार नाही, हेच संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. सहकार आणि पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा असणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रात वर्चस्वासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजप-सेनेच्या नेतृत्वाला रोखण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी आपल्या वक्तव्यातून केला, तर आपलीही पाळेमुळे येथे रुजविण्याच्या प्रयत्नांत असलेल्या भाजपपेक्षा आमची रेघ वेगळी आहे, हे दाखविण्याचा शिवसेनेचा खटाटोप दिसून आला. त्यामुळे या रंगलेल्या जुगलबंदीमागचे आपापला पाया विस्तारण्याचे राजकारण लपून राहात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com