मुख्यमंत्रीसाहेब, रोज या..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहर चकचकीत करण्यात येत आहे. श्री. फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा ज्या रस्त्यावरून जाणार आहे, ते रस्तेही गुळगुळीत केले आहेत. काही दिवसांपूर्वी खड्ड्यांनी भरलेले हेच का ते रस्ते? असा प्रश्‍न पडावा इतक्‍या झपाट्याने ही कामे केली. त्यामुळे मुख्यमंत्रीसाहेब रोजच कोल्हापुरात यावेत, अशीच प्रतिक्रिया सामान्यांतून उमटत आहे. 

विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने श्री. फडणवीस शुक्रवार-शनिवारी सांगली-कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी (ता. २४) दुपारी तीन वाजता त्यांचे कोल्हापुरात आगमन होईल. विमानतळावरून ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरी जातील. तेथून सावली केअर सेंटर, ॲपल सरस्वती हॉस्पिटल या ठिकाणी भेट देणार आहेत.

ॲपल सरस्वती हॉस्पिटल येथून ते वारणानगर येथे माजी मंत्री विनय कोरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. शुक्रवारी श्री. फडणवीस यांचा कोल्हापुरात मुक्काम आहे. शनिवारी कराड, शिराळा व कागल येथील कार्यक्रम संपवून ते दुपारी मुंबईला रवाना होतील. 

श्री. फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा सतर्क झाली. राज्याचे प्रमुख म्हणून श्री. फडणवीस येत असल्याने त्यांच्यासाठी केल्या जाणाऱ्या सुविधा ही चांगलीच गोष्ट आहे. पण अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामांकडे संबंधित यंत्रणांचे आताच कसे लक्ष गेले? हाही प्रश्‍न आहे. कदमवाडी ते ॲपल हॉस्पिटलमार्गे कसबा बावड्याकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्याचा थोडासाच भाग डांबरीकरण न झालेला आहे. राजकीय वादात हे काम प्रलंबित होते. या मार्गाने मुख्यमंत्री जाणार म्हटल्यावर रस्ता गुळगुळीत केला. 

श्री. फडणवीस सावली केअर सेंटरलाही भेट देणार आहेत. या केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यांचीही नुसती डागडुजी नाही तर नवा रस्ताच केला आहे. फुलेवाडी ते गगनबावडा मार्गावरील शिंगणापूर फाट्यावर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती, हा रस्ताही चकचकीत केला. रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल संपण्याच्या ठिकाणी असलेल्या स्पीडब्रेकरची उंची कमी करून त्यावर पांढरे पट्टेही मारले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहर व परिसरात तातडीने केलेल्या उपाययोजना पाहता मुख्यमंत्री रोजच कोल्हापुरात यावेत, अशीच प्रतिक्रिया उमटत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Chief Minister on Tour special story