esakal | शाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर

शाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - मशीन माणसाला टेकओव्हर करत असताना आता पुन्हा "शिक्षण हेच भवितव्य' हा राजर्षी शाहूंचा विचार देशभरात रुजणे आवश्‍यक आहे. प्रस्थापित शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल गरजेचे असून ते तंत्रज्ञानाधारित असायला हवे आणि त्याची बीजंही शाहूकार्यात आवर्जून दिसतात, असे गौरवोद्‌गार पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे काढले. 

राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे आज त्यांना राजर्षी शाहू पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांनी केवळ 30 मिनिटेच सर्वांशी संवाद साधला. मात्र या अभ्यासपूर्ण संवादातून त्यांनी शाहूकार्य, वर्तमान परिस्थिती आणि जग, असा तौलनिक अभ्यास मांडला. दरम्यान, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. राजर्षी शाहू स्मारक भवनात पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. 

पुरस्कार स्वीकारताना आज मला शब्द कमी पडत नाहीत; मात्र भरून आले आहे. कारण राजर्षी शाहूंच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वोच्च असल्याची कृतज्ञता व्यक्त करून डॉ. माशेलकर यांनी संवादाला प्रारंभ केला. ते म्हणाले, ""कोल्हापूर हे स्वातंत्र्यपूर्ण काळापासून जगाच्या कैक पटीने पुढे राहिले. कारण राजर्षी शाहूंच्या दूरदृष्टीचा पाया या जिल्ह्याला लाभला आणि विज्ञान-तंत्रज्ञानावर आज जगभरात चर्चा होत असताना त्यांनी शंभर वर्षांपूर्वी आपल्या संस्थानात असे प्रयोग यशस्वीपणे राबवले होते. जपानमध्ये प्रशिक्षित एका रसायनतज्ज्ञांची नेमणूक त्यांनी 1904 ला करवीर संस्थानात केली होती.'' 

डॉ. माशेलकर पुढे म्हणाले, ""ज्ञानाच्या कक्षा आता रुंदावल्या आहेत. किंबहुना सर्व ज्ञान आता आपल्या खिशातील एका मोबाईलमध्ये उपलब्ध झाले आहे. त्याशिवाय रोबोटिक्‍स आणि "सर्व काही ऍटोमेटिक' अशा जमान्यात रोजगार कमी होणार आहेत. येत्या काळात अमेरिकेत 47 टक्के तर भारतात 69 टक्के रोजगार कमी होतील, असे एक सर्वेक्षण सांगते. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर तंत्रज्ञानाधारित शिक्षण हेच खरे भवितव्य असेल.'' अमेरिकेत आयफोन करणाऱ्या एका कंपनीला एका आयफोनसाठी दहा डॉलर मिळतात आणि एका आयफोनमागे डिझाईन करणारी कंपनी साडेतीनशे डॉलर मिळवते. भारताचा विचार केला तर येत्या काळात मेहनत तर आपण करूच; पण बौद्धिक संपत्तीही समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी निर्मिती आणि त्यासाठीचे संशोधन या दोन्ही गोष्टींवर भर द्यायला हवा, असेही ते म्हणाले. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ""नुकताच कर्जमाफीचा निर्णय झाला. त्यामुळे गेल्या आठवड्यात बरेच काही शिकायला मिळाले. दर आठ वर्षांनी आपल्याकडे कर्जमाफी करावी लागते आणि कमी उत्पादकता हेच त्यामागचे प्रमुख कारण आहे. राजर्षी शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात शेतीत विज्ञान-तंत्रज्ञान आणले. धरणे उभारली आणि शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठेसाठी बाजार समित्याही स्थापन केल्या. त्यांच्या या साऱ्या निर्णयांची वर्तमानाशी सांगड घालून अंमलबजावणी जरी केली तर भविष्यात कर्जमाफीचा प्रश्‍नच राहणार नाही.'' 

एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने सन्मानित केले. "मेक इन इंडिया'सारखी संकल्पना डॉ. माशेलकर यांनी यापूर्वीच मांडली असल्याचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले. 

व्यासपीठावर महापौर हसीना फरास, वैशाली माशेलकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे आदी होते. ट्रस्टचे विश्‍वस्त डॉ. अशोक चौसाळकर यांनी आभार मानले. शाहीर आझाद नायकवडी यांनी शाहू गौरव गीत सादर केले. 

आपल्या बाहूतील ताकद 
1998 ला पोखरण अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध घातले. मात्र त्यानंतर दहा वर्षांनी त्यांनी अणुकरारावर सही केली. अमेरिकेने आपले स्वागत केले म्हणजे त्यांनी आपल्या बाहूतील ताकद ओळखली होती आणि दरम्यानच्या काळात विज्ञान-तंत्रज्ञानात भारताने मोठी प्रगती केली होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना अमेरिका कितीही निर्बंध घालू दे. मात्र आपण आपल्या बुद्धी, विचारांवरचे निर्बंध काढून झपाटून कामाला लागलो तर ती नक्कीच झुकेल, असे मी जिद्दीने सांगितले होते, अशी आठवणही डॉ. माशेलकर यांनी सांगितली. 

"ई प्लस एफ' फॉर्म्युला 
वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत अनवाणी फिरलो. रात्री चौपाटीवरच्या दिव्याखाली अभ्यास केला. पुढे टाटा ट्रस्टची साठ रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आणि मी शिकलो. त्यानंतर एका टप्प्यावर अमेरिकेतील ऍकॅडमी ऑफ आर्टस्‌ अँड सायन्सेसने फेलो म्हणून माझी नियुक्ती केली. अशी नियुक्ती होणारा मी सातवा भारतीय आणि माझ्यापूर्वी हा बहुमान मला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिलेल्या टाटा ट्रस्टचे सर्वेसर्वा रतन टाटांना मिळाला होता. नियुक्तीनंतर एकाच पुस्तकात आम्ही दोघांनी सह्या केल्या. "शिक्षण हेच भवितव्य' हाच सर्वात मोठा सिद्धांत आहे आणि त्यासाठीचा हा ढळढळीत पुरावा आहे. 

शैक्षणिक क्रांती दिन 
प्राथमिक शिक्षण सक्‍तीचे केल्यानंतर 21 सप्टेंबर 1917 ला राजर्षी शाहू महाराजांनी एक हूकूमनामा काढला. त्यात जे पालक मुलांना शाळेत घालणार नाहीत, त्यांच्यासाठी एक रुपयाचा दंड आकारला आणि काही इतर निर्णयही घेतली. या एक रूपयाची आजची किंमत सोळा हजार तीनशे ब्यान्नव रूपये इतकी होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय इतिहासाचा विचार केला तर हिच मोठी शैक्षणिक क्रांती आणि भारतीय स्वातंत्र्याची नांदी आहे. या हुकूमनाम्याला येत्या सप्टेंबरला शंभर वर्षे पूर्ण होत असून हा दिवसही शिक्षणविषयक विविध उपक्रमांनी साजरा व्हायला हवा, अशी अपेक्षा डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केली. 

loading image
go to top