इंद्रजित देशमुख यांच्या स्वेच्छानिवृत्तीवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

कोल्हापूर - राज्याच्या ग्रामविकास विभागातील वेगळा अधिकारी, अशी ख्याती असलेले जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या स्वेच्छानिवृत्ती अर्जाने ग्रामविकास विभागात उलसुलट चर्चा सुरू आहे. सामाजिक कामाचा वाढता व्याप असल्याचे कारण सध्या पुढे करण्यात येत आहे.

कोल्हापूर - राज्याच्या ग्रामविकास विभागातील वेगळा अधिकारी, अशी ख्याती असलेले जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या स्वेच्छानिवृत्ती अर्जाने ग्रामविकास विभागात उलसुलट चर्चा सुरू आहे. सामाजिक कामाचा वाढता व्याप असल्याचे कारण सध्या पुढे करण्यात येत आहे. मात्र, आयएएससाठी वारंवार डावलणे आणि सन्मानजनक पोस्टिंग मिळत नसल्यानेच त्यांनी हा मार्ग निवडल्याचे मत त्यांचे सहकारी व्यक्‍त करत आहेत. त्यांच्या या अर्जावर शासन काय निर्णय घेणार, याकडे ग्रामविकास विभागाचे लक्ष लागले आहे.

एमडीएस केडरचे असलेल्या देशमुख यांच्या अनेक सहकाऱ्यांना प्रमोशन मिळून ते आयएएस झाले. मात्र, देशमुख यांना सातत्याने डावलल्याचे सांगण्यात येत आहे. देशमुख यांचे काही सहकारी व त्यांना ज्युनिअर असणारे काही अधिकारी आयएएस झाले आहेत. या पदोन्नतीसाठी सर्व पात्रता असताना वारंवार डावलल्याची खंत असली तरी त्यांनी या विषयावर नेहमीच 
मौन पाळले.

एकीकडे पदोन्नती मिळत नसली तरी दुसऱ्या बाजूने त्यांनी शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कामाचा व्याप मोठा केला आहे. देशभरातील अनेक समाजसेवक, लेखकांसोबत ते विविध प्रकल्पांवर काम करत आहेत. विशेषत: ग्रामविकास, पाणी प्रश्‍नावर ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, अभिनेता आमिर खान, सलमान खान, नाना पाटेकर यांच्याबरोबर काम करत आहेत. तसेच व्याख्यान, प्रवचनांच्या माध्यमातून ते सामाजिक परिवर्तनाचा जागर करत आहेत. स्वेच्छानिवृत्तीने त्यांच्या या कामाला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा शिवमचे कार्यकर्ते व्यक्‍त करत आहेत.

राजकारणातही संधी
मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले देशमुख यांना घरातूनच राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे अनेक पै-पाहुणेही राजकारणात सक्रिय आहेत; पण त्यापेक्षाही देशमुख यांनी कामाच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यामुळेच त्यांचे राज्यातील अनेक राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्याशीही त्यांची जवळीक आहे. देशमुख यांच्या ग्रामविकासाच्या ज्ञानाचा उपयोग करण्याच्या दृष्टीने त्यांना विधानपरिषद किंवा राज्यसभेवरही संधी मिळू शकते, अशी शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

Web Title: Kolhapur News Indrajeet Deshmukh Discussion on voluntary retirement