मराठा आरक्षणप्रश्नी क्रांतिदिनी कोल्हापूर बंदची हाक 

भुषण पाटील
रविवार, 22 जुलै 2018

कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती संघटनेच्यावतीने 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी सरकारविरोधात ठोक मोर्चा काढला जाणार आहे. या दिवशी कोल्हापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे.

कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती संघटनेच्यावतीने 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी सरकारविरोधात ठोक मोर्चा काढला जाणार आहे. या दिवशी कोल्हापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाप्रमुख परेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

तत्पूर्वी 31 जुलैला बंदच्या जागृतीसाठी ताराराणी चौक येथून मोटर सायकल रॅली काढून अंबाबाई देवीला साकडे घालण्यात येईल. तसेच ठोक मोर्चामध्ये सहभागी न होणाऱ्या सत्तेतील आमदारांना यावेळी श्रद्धांजली वाहणार असल्याचे भोसले यांनी सांगितले 

आरक्षणासह आपल्या विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने 58 मूक मोर्चे काढले मात्र शासनाने यावर अजूनही कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचा दुसरा भाग म्हणून यापुढील काळात ठोक मोर्चे काढण्यात येणार आहेत. आता संयमाने काही मिळणार नाही अशी मानसिकता मराठा समाजाची झाल्याने मराठा क्रांती संघटनेच्यावतीने 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी कोल्हापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे.

या दिवशी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठोक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे. दसरा चौकातून सकाळी 11 वाजता मोर्चाची सुरुवात होईल. या दिवशी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. आपले व्यवहार बंद ठेवून मोर्चात सहभागी होण्या संदर्भात व्यापारी संघटना वाहतूकदार संघटना तसेच शाळा महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी यापुढील काळात आक्रमक स्वरूपाचे आंदोलन करणार आहे. प्रसंगी मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्यांची तोडफोड केली जाईल, असा  इशाराही परेश भोसले यांनी दिला. 

यावेळी मराठा क्रांती संघटनेचे मोहन मालवणकर, नितीन लायकर, राहुल इंगवले,चंद्रकांत पाटील, सुनिता पाटील, निरंजन पाटील, राजू सावंत, सुधा सरनाईक, सुवर्णा मिठारी, अनिता जाधव आदी उपस्थित होते. 

महामंडळाकडे फक्त 11 मराठा लाभार्थी 
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास चारशे कोटी रुपयांची तरतूद केल्याचा दावा राज्य शासन करत आहे मात्र हे पैसे अद्याप महामंडळाकडे आलेले नाहीत.गेल्या वर्षी महामंडळासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली होती.राज्यातून दहा हजार युवकांनी अर्ज दाखल केले होते त्यातील 115 जणांच्या कर्ज मंजुरी देण्यात आली.यामध्ये मराठा समाजातील फक्त 11 जणांचा समावेश असल्याचे माहिती अधिकारातून उघड होत असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कांदेकर यांनी सांगितले. 

Web Title: Kolhapur News Maratha reservation issue Band on 9 Augest