"अल्पसंख्याक' योजना प्रभावीपणे राबवा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

कोल्हापूर - अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी शासन राबवित असलेल्या योजनांची यंत्रणांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव शाम तागडे यांनी आज येथे बोलतांना दिले. 

कोल्हापूर - अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी शासन राबवित असलेल्या योजनांची यंत्रणांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव शाम तागडे यांनी आज येथे बोलतांना दिले. 

अल्पसंख्याकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत श्री. तागडे बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, पोलीस उपअधिक्षक सतीश माने, प्रकल्प संचालक डॉ. हरिश जगताप, जिल्हा प्रकल्प अधिकारी नितीन देसाई, राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जी. बुटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी.भालेराव यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

श्री. तागडे म्हणाले,"अल्पसंख्याक समुदायासाठीच्या योजनांचा दोन तीन महिन्यातून जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा. अल्पसंख्याक समुहासाठी शिक्षण, वसतीगृह, घरकूल, शिष्यवृत्ती , विविध बॅंकांकडील कर्जप्रकरणे, बचतगट अशा अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. बॅंकांनी अल्पसंख्याक समुहासाठीची कर्जप्रकरणे प्राधान्य क्रमाने मंजूर करावीत तसेच अल्पसंख्याकांसाठी घरकुलांचे प्रस्तावही प्राधान्य क्रमाने मार्गी लावावेत. अशी सूचनाही त्यांनी केली. 

ते म्हणाले,"मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळांने त्यांच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजना तसेच थेट कर्ज योजनेची अंमलबजावणी करुन अल्पसंख्याकांना सहाय्यभूत ठरावी या महामंडळाच्या सक्षमी करणासाठी शासनाने प्राधान्य दिले आहेत.' 

अल्पसंख्याक समुहातील मुलींसाठी राजाराम महाविद्यालय येथे वसतीगृह असून या वसतीगृह सुविधेचा जिल्ह्यातील अल्पसंख्याक समुहातील मुलींनी लाभ घ्यावा असे आवाहनही प्रधान सचिव शाम तागडे यांनी केले. या वसतीगृहाची क्षमता 100 मुलींची असून पात्र मुलींनी वसतीगृह प्रवेशासाठी प्राचार्य, राजाराम महाविद्यालय कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. अल्पसंख्याक 
समुहातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव वेळीच मार्गी लावावेत तसेच पोषण आहार योजनेचीही प्राधान्याने अमलबजावणी करावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

Web Title: kolhapur news Minority community