सावर्डेतील माय-लेकाचे दहावीत लख्ख यश

सागर पाटील
मंगळवार, 19 जून 2018

पणुत्रे - शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते. दहावीच्या परीक्षेत मुलाच्या बरोबरीने अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची किमया सावर्डे (ता. पन्हाळा) येथील जयश्री संभाजी कापडे या मातेने केली आहे. त्यांनी तब्बल ८० टक्के गुण मिळविले; तर मुलगा प्रथमेश याला ७४ टक्के गुण मिळाले.

जयश्री कापडे यांचे माहेर गडमुडशिंगी. लहानपणापासूनच त्या अभ्यासात हुशार. पण, आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले. नववी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. त्यांचा विवाह सावर्डे येथील संभाजी कापडे यांच्याशी झाला. त्यांना प्रथमेश व प्रणव हे दोन मुलगे. त्यातील प्रथमेश हा जलतरणपटू. त्याने राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. तो चालू वर्षी दहावीला होता. सौ. कापडे गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात परिचर म्हणून कंत्राटी नोकरी करतात. नोकरीत कायम होण्यात व पदोन्नती होण्यात त्यांना अल्पशिक्षणाचा अडसर वाटत होता. त्यामुळे मुलगा दहावीला गेल्यावर त्यांनीही दहावीची परीक्षा देण्याचा चंग बांधला. पती संभाजी यांनीही संमती दिली. त्यांनी पणोरे येथील मंदार माध्यमिक विद्यालयात १७ क्रमांकाचा अर्ज भरला. संसार व नोकरी यात ताळमेळ घालत सौ. कापडे यांनी मुलाच्या बरोबरीने अभ्यास करून परीक्षा दिली. निकाल हाती पडला, त्या वेळी त्यांना ८० टक्के गुण मिळाले. एकूणच, मायलेकाच्या यशाने सारे घर आनंदात न्हाऊन निघाले. 

‘पती व मुलांच्या प्रोत्साहनामुळे दहावीची परीक्षा देऊ शकले. नोकरी व घरकाम यातून वेळ काढून चार तास अभ्यास करून यश मिळविले. यापुढे पदवीधर होऊन आरोग्य विभागात कायम होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- जयश्री कापडे,
सावर्डे

Web Title: Kolhapur News Mother and son success in SSC