ऊर्जेचा उत्सव - देवीनवरात्र

योगेश प्रभुदेसाई
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

आपल्याकडे नवरात्र परंपरा अखंडित जपली गेली आहे. जसजसा शक्तीचा संप्रदाय वाढीला लागला, तसतसा तंत्राचाराचा प्रभावही वाढत गेल्याचे दिसते. त्या अनुषंगाने कित्येक तांत्रिक ग्रंथ, पुराणे विकसित झाली. या सर्वांमध्ये सर्वात लोकप्रिय झाला तो दुर्गासप्तशती ग्रंथ. देवींच्या संदर्भात माहिती आणि विधान सांगणारा हा ग्रंथ आजही भारतीय लोकमानसात वंदनीय आहे. देवीनवरात्र हा रात्री साजरा करायचा उत्सव आहे. त्यासाठीच देवीचा जागर केला जातो. नवरात्र हा ऊर्जेचा उत्सव आहे

आपण महिषासुरमर्दिनी अथवा दुर्गादेवी म्हणून पुजतो. अशा दुर्गापूजनाचे संदर्भ आपल्याला महाभारत काळापासून दिसतात. दुर्गा म्हणजेच शक्तिदेवता. शक्तीची उपासना करणारे ते शाक्त. मग त्या अनुषंगाने अनेक शाक्त ग्रंथ विकसित झाले. शक्तीची उपासना म्हटलं की तंत्राची जोड ओघाने आलीच. शैव आणि वैष्णवांच्या वाढत्या स्पर्धेमध्ये कधी शैवांच्या बाजूने, तर कधी वैष्णवांच्या तर कधी दोहोंचा समन्वय साधत; तर कधी कधी आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवत शाक्त संप्रदाय वाढत राहिला.

देवीची सौम्य आणि उग्र अशी दोन्ही रूपे. मार्कंडेय पुराणांतर्गत दुर्गासप्तशती ग्रंथामध्ये अनेक देवीस्वरूपांची माहिती मिळते. सर्वच एका दुर्गेचे अवतार. परंतु भांडारकरांच्या मते या सर्व देवता भिन्न कालखंडातील, स्वतंत्र देवता होत्या. ज्यांना मागाहून अवतारवादामध्ये आणले गेले आणि एकाच देवतेशी संलग्न करण्यात आले (वैष्णवीजम, शैवीजम अँड मायनर रिलिजिअस सिस्टिम्स. पृ. १४३-१४४). अशा या देवीच्या उपासनेचा महत्त्वाचा काळ म्हणजे नवरात्र.

वास्तविक देवीनवरात्र वर्षातून चार वेळा म्हणजे चैत्र, आषाढ, अश्‍विन व माघ महिन्यात शुक्‍ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत होत असे. कालांतराने चैत्र व अश्‍विन ही दोनच नवरात्रे राहिली आणि इतर दोन मागे पडली (प्रभुदेसाई. देवी कोश. खं. पृ. २३५). चैत्र आणि अश्‍विन महिन्यांमध्ये अनुक्रमे वसंत आणि शरद ऋतूंची चाहूल लागलेली असते. देवीभागवत ग्रंथामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, वसंत व शरद हे दोनच महाघोर व मनुष्यांना रोग उत्पन्न करणारे ऋतू आहेत. त्यामुळे प्राज्ञजनांनी चण्डिकेचे पूजन या काळामध्ये करावे (स्कंध. पृ. १६०). यावरून आपल्याला समजते की, दुर्गेची उपासना रोगहरणासाठी करत असत.

वास्तविक पाहता या दोन्ही ऋतूंमध्ये धरणीमातेला नवचैतन्य प्राप्त होत असते. त्यामुळे या कालखंडात उत्साह, ऊर्जा असते. परंतु त्याचबरोबर ऋतू बदलत असल्याने रोगराईही पसरत असते. त्यासाठीच प्राचीन काळी दुर्गादेवीची आराधना करत असत, हे दिसून येते. इतिहास काळात प्रदीर्घ दुष्काळाला ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ म्हणत असत (गॅझेटिअर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी. नाशिक. पृ. १०५). दुर्गासप्तशतीमध्ये अशा प्रदीर्घ दुष्काळात दुर्गेचीच आराधना केल्याचा उल्लेख आहे (शाकंभरी आख्यान). आज आपल्याकडे नवरात्र परंपरा अखंडित जपली गेली आहे; पण आता त्यामागचा उद्देश बदलला आहे. 

जसजसा शक्तीचा संप्रदाय वाढीला लागला, तसतसा तंत्राचाराचा प्रभावही वाढत गेल्याचे दिसते. त्या अनुषंगाने कित्येक तांत्रिक ग्रंथ, पुराणे विकसित झाली. या सर्वांमध्ये सर्वात लोकप्रिय झाला तो दुर्गासप्तशती ग्रंथ. देवींच्या संदर्भात माहिती आणि विधान सांगणारा हा ग्रंथ आजही भारतीय लोकमानसात वंदनीय आहे.

वास्तविक देवीनवरात्र हा रात्री साजरा करायचा उत्सव आहे. त्यासाठीच देवीचा जागर केला जातो; परंतु इतके दिवस शक्‍य नाही झाले तर महाअष्टमी आणि महानवमी या दोन रात्री तरी जागल्या जातात आणि संधीकाळात देवीची पूजा, मंत्रानुष्ठान केले जातात. दुर्गादेवीचा आणि संधीकाळाचा घनिष्ट संबंध दिसून येतो. त्यामुळेच दोन ऋतूंच्या संधीकाळातच देवीचे नवरात्र साजरे केले जाते. 

दुर्गादेवीचा संबंध भूमातेशी
दुर्गादेवीचा संबंध सुफलन, पोषण आणि रक्षणाशी येतो. म्हणूनच तिला मातृक संबोधले जाते. कारण हे सर्व गुण मातृत्वाचे प्रतिनिधी आहेत. दुर्गासप्तशतीमध्ये येणारे शाकंभरी आख्यान हे या गुणांचेच प्रतीक आहे. त्यामुळे दुर्गादेवीचा संबंध भूमीशी अथवा भूमातेशी येतो. म्हणूनच श्रीसूक्तामध्ये गायलेली श्री ही सुजलाम सुफलाम भूमी अथवा भूदेवी आहे. म्हणजेच दुर्गादेवीचा संबंध हा जल, भूमी, पोषण आणि रक्षण यांच्याशी येतो आणि म्हणूनच तिला ऊर्जा अथवा शक्ती मानली जाते. 

Web Title: kolhapur news navaratri special article