कोल्हापूरला सहा दिवस विमानसेवा सुरू करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 डिसेंबर 2017

कोल्हापूर - नाशिक, जळगाव येथील विमानसेवा आठवड्यातील सहा दिवस सुरू केली; परंतु कोल्हापूरला केवळ तीन दिवस विमानसेवा सुरू करून पुन्हा एकदा दुजाभाव करण्यात आला आहे. विमानसेवा सहा दिवस सुरू राहिली तरच ती कायमस्वरूपी सुरू राहील, अशी शक्‍यता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे कोल्हापूरलाही सहा दिवस सलग विमानसेवा सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 

कोल्हापूर - नाशिक, जळगाव येथील विमानसेवा आठवड्यातील सहा दिवस सुरू केली; परंतु कोल्हापूरला केवळ तीन दिवस विमानसेवा सुरू करून पुन्हा एकदा दुजाभाव करण्यात आला आहे. विमानसेवा सहा दिवस सुरू राहिली तरच ती कायमस्वरूपी सुरू राहील, अशी शक्‍यता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे कोल्हापूरलाही सहा दिवस सलग विमानसेवा सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 

सहा वर्षांपासून खंडित असलेली विमानसेवा २४ डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. उडान योजनेंतर्गत ही सेवा सुरू होत असून पहिल्या टप्प्यात १९ प्रवासी वाहतूक करणारे विमान सुरू होणार आहे. आपल्याबरोबर नाशिक व जळगावलाही याच योजनेअंतर्गत ही सेवा सुरू होत असून त्या ठिकाणी मात्र सलग सहा दिवस ही सेवा सुरू केली आहे. नाशिक आणि जळगावला मुंबई विमानतळावर उड्डाणासाठीची वेळ कशी दिली गेली आणि फक्त कोल्हापूरला अशी वेळ उपलब्ध देण्यात अडचणी सांगितल्या गेल्या. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा मात्र मंगळवार, बुधवार आणि रविवार अशी तीन दिवस सुरू होईल. कोल्हापूरची विमानसेवा सुरू करताना सापत्नपणाची वागणूक कोणत्या कारणासाठी दिली गेली, याविषयी आता आवाज उठविण्याची आवश्‍यकता आहे. 

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेसाठी तिकीट बुकिंग सुरू होणार होते; मात्र अद्याप ते बुकिंग सुरू झालेले नाही. नाशिक व जळगाव येथील पुढील दिवसाचे बुकिंग सुरू झाले आहे. त्यामुळे आपले तिकीट बुकिंग कधी सुरू होणार, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. २४ डिसेंबरला विमानसेवा सुरू होणार असे जाहीर केल्यामुळे तिकीट बुकिंग अजून सुरू नाही. त्यामुळे पुन्हा संभ्रमावस्था तयार होत आहे. 

आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरू होणार ही सकारात्मक बाब असली तरी ही सेवा सहा दिवस सुरू राहिली तरच योग्य होणार आहे. आठवड्यातून तीन दिवसांची सेवा सुरू होऊन खंडित होऊ नये म्हणूनही प्रयत्न करण्याची गरज आहे. 

विमानसेवा यशस्वीपणे सुरू राहण्यासाठी आठवड्यातून सहा दिवस सुरू राहिली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे यांच्या प्रयत्नातून ही विमानसेवा सुरू होत आहे. नाशिक, जळगावला सहा दिवस आणि कोल्हापूरला तीन दिवस असा दुजाभाव करणे योग्य नाही. यासाठी आता आठवड्यातील सहा दिवस ही सेवा सुरू राहिली पाहिजे. विमानतळ प्राधिकरण आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला विनंती करण्यात येत आहे.
- ललित गांधी, अध्यक्ष कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News needs 6 days airplane facility