बटकणंगलेत "व्हॉटस ऍप'ने बांधला एकीचा धागा 

अजित माद्याळे
बुधवार, 30 मे 2018

गडहिंग्लज - उद्याचे भविष्य वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होते, हा विचार बटकणंगले (ता. गडहिंग्लज) ग्रामस्थांच्या श्रमदानाला चपखलपणे लागू होत आहे. "व्हॉटस ऍप'सारख्या सोशल मिडीयाला अनेकजण दुषणे देत असले तरी हेच माध्यम या गावच्या ग्रामस्थांमध्ये एकीचा धागा गुंफण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.

गडहिंग्लज - उद्याचे भविष्य वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होते, हा विचार बटकणंगले (ता. गडहिंग्लज) ग्रामस्थांच्या श्रमदानाला चपखलपणे लागू होत आहे. "व्हॉटस ऍप'सारख्या सोशल मिडीयाला अनेकजण दुषणे देत असले तरी हेच माध्यम या गावच्या ग्रामस्थांमध्ये एकीचा धागा गुंफण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.

ग्रामस्थ "पाणी प्रतिष्ठान'च्या पुढाकाराने "पाणी अडवा-पाणी जिरवा' ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीद्वारे अंमलात आणत आहेत. 
साडेतीन हजार लोकसंख्येचे बटकणंगले सत्यशोधक विचारांचे. शिक्षण, नोकरीनिमित्त बाहेर असणारे तरूण आज गावच्या जलसमृद्धीचा पताका खांद्यावर घेतला आहे. बटकणंगलेत दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागते. गावात येणाऱ्या चाकरमान्यांनाही पाण्यासाठी जुंपून घ्यावे लागते. ही अवस्था तरूणांना सतावत होती. हिवरे बाजार, राळेगणसिद्धी येथील पाण्याविषयीच्या यशकथा त्यासाठी प्रेरणादायी ठरल्या. यातूनच मग व्हॉटस ऍपवर "पाणी प्रतिष्ठान'चा ग्रुप तयार झाला. याद्वारे पाचशे जण एका छताखाली एकवटले. त्यांच्यात एकीचा धागा गुंफला अन्‌ श्रमदानातून गाव जलसमृद्ध करण्याचा विडा उचलला. 

 

गावालगतच्या भैरी डोंगर व त्याच्या पायथ्याला चार एकर गायरान आहे. पहिल्यांदा गायरानात श्रमदानाने चार चरींची (सीसीटी) खुदाई केली. वळीव पावसात या चरी पाण्याने तुडूंब भरल्याची प्रेरणा तरूणांना मिळाली अन्‌ भैरीच्या डोंगरातही चरी खोदण्यासाठी सर्वजण सरसावले. डोंगर परिसरात आजअखेर 12 फूट लांब, 2 फूट रूंदी व 2 फूट खोलीच्या 45 हून अधिक चरी खोदल्या आहेत. पाणी अडवा-पाणी जिरवा यासाठी या चरी उपयुक्त ठरणार असून भूजल पातळी सुधारण्यास मदत होणार आहे. याशिवाय भैरी डोंगर परिसरात आठ दगडी बांध घातले आहेत.

या सर्व बांधांची लांबी पाचशे फूटाहून अधिक आहे. तसेच भैरीचा ओढा खोलीकरणाचेही काम हाती घेतले आहे. तत्पूर्वी गेले चार दिवस या ओढ्याच्या परिसरात असलेली काटेरी झुडूपे श्रमदानातून हटविली आहेत. इच्छाशक्ती दांडगी असली की लोकही मदतीला येतात, याचा अनुभव या गावात येत आहे. श्रमदानासाठी कोणी कोणालाही निमंत्रण देत नाही. सकाळी व सायंकाळची वेळ श्रमदानासाठी ठरली आहे. व्हॉटस ऍपवरच उद्याच्या श्रमदानाचे नियोजन दिले जाते. सुट्टीसाठी गावी आलेले मुंबई, पुण्यातील चाकरमानीही श्रमदानात सहभागी होत आहेत. पाणी प्रतिष्ठाणला ग्रामपंचायतींसह विविध शासकीय अधिकारी, तरूण मंडळे, महिला मंडळे, गावकऱ्यांची साथ मिळाल्याने गावची वाटचाल जलसमृद्धीकडे सुरू आहे. 

2000 सीड बॉल 
भैरीच्या डोंगरावर येत्या पावसाळ्यात सीड बॉल टाकण्याचे नियोजन आहे. संदीप शिंदे यांनी मुंबईहून आणलेले 200 सीड बॉल आता डोंगरावर टाकले आहेत. सौरभ व राजेश पाटील या भावंडांकडून दोन हजार सीडबॉल तयार होत असून पावसाळ्यात ते डोंगरावर फेकण्यात येणार आहेत. तसेच या भावंडांनी ग्लासमधील रोपेही तयार केली आहेत. 

नियोजित कामे 
बटकणंगलेचा समावेश जलयुक्त शिवार योजनेत झाला आहे. त्याअंतर्गत गावची शिवारफेरी झाली आहे. गावसभा घेवून कामांची निश्‍चितीही झाली असून त्यात तळीच्या माळावर वनतळे, डोंगराच्या पायथ्याला हत्ती प्रतिबंधक चर, सीसीटी, डीप सीसीटी, गावतळे, शोषखड्डे, ओढा खोलीकरण या कामांचा समावेश आहे. डोंगरावर ज्या ठिकाणी यंत्र जाणार नाही, तेथे श्रमदानातूनच काम करण्याचा निर्धार गावकऱ्यांचा आहे. 
 

Web Title: Kolhapur News Panidar Bakanagale whatsapp group