रंकाळ्‍यातील संध्यामठाचं सौंदर्य...!

संभाजी गंडमाळे 
मंगळवार, 30 मे 2017

कोल्हापूर - प्राचीन कोल्हापूरचा इतिहास पाहिला, तर येथील स्वतंत्र सहा खेड्यांपैकी रंकाळा हे एक खेडंच. येथे दगडाची खाण खोदली गेली आणि राजा गंडरादित्याने बांधलेल्या साडेतीनशेहून अधिक मंदिरासाठी त्यातील दगड वापरले गेले. नवव्या शतकातल्या भूकंपानंतर खाणीचा विस्तार वाढला आणि नैसर्गिक जलस्रोतातून रंकाळा नावाचा भला मोठा तलाव कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालू लागला. त्यातही संध्यामठाचं सौंदर्य इतकं की, अनेक चित्रकारांना त्यानं भुरळ घातली. रंकाळा असो, संध्यामठ असो किंवा हा सारा परिसर म्हणजे कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आहे आणि तो जपण्यासाठी गेल्या आठ वर्षांत लोकचळवळही अधिक व्यापक झाली आहे.

कोल्हापूर - प्राचीन कोल्हापूरचा इतिहास पाहिला, तर येथील स्वतंत्र सहा खेड्यांपैकी रंकाळा हे एक खेडंच. येथे दगडाची खाण खोदली गेली आणि राजा गंडरादित्याने बांधलेल्या साडेतीनशेहून अधिक मंदिरासाठी त्यातील दगड वापरले गेले. नवव्या शतकातल्या भूकंपानंतर खाणीचा विस्तार वाढला आणि नैसर्गिक जलस्रोतातून रंकाळा नावाचा भला मोठा तलाव कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालू लागला. त्यातही संध्यामठाचं सौंदर्य इतकं की, अनेक चित्रकारांना त्यानं भुरळ घातली. रंकाळा असो, संध्यामठ असो किंवा हा सारा परिसर म्हणजे कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आहे आणि तो जपण्यासाठी गेल्या आठ वर्षांत लोकचळवळही अधिक व्यापक झाली आहे. त्यातून काही कृती कार्यक्रमही यशस्वी झाले; मात्र महापालिका पातळीवरच आता अधिक प्रयत्न होणे आवश्‍यक आहे.    

रंकाळा तलावातील पाणी यंदाही कमी झाल्याने संध्यामठ खुला झाला आहे. साहजिकच केवळ कोल्हापूरकरच नव्हे, तर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांनाही संध्यामठ पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. 

रंकाळा तलावाच्या पूर्वेला असणारी ही एक एक मंडपवजा भव्य दगडी वास्तू. संध्यामठात मुख्य मूर्ती नंदीची आणि त्याच्यासमोर शिवलिंग आहे.

आठ कोरीव खांबांच्या तीन पूर्व-पश्‍चिम रांगा, त्यांना समांतर असा मध्यभागी दक्षिणाभिमुखी दरवाजा असलेली भिंत आणि तीनही बाजूंनी मंडपात येण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग. किमान आठशे ते अकराशे वर्षांपूर्वी बांधलेला हा मठ आजही साऱ्यांनाच भुरळ घालतो, मात्र त्याचे खिळखिळे झालेले दगड सर्वांनाच वेदना देतात. मुळात उन्हाळ्यात संध्यामठ खुला झाला की त्याच्या डागडुजीची चर्चा होणे, हे कोल्हापूरला आणि महापालिकेलाही आता नवीन राहिलेले नाही; मात्र हा वारसा जपला नाही, तर भविष्यात रंकाळ्याच्या सौंदर्यातील एक मुख्य हिरा गमावून बसण्याशिवायही पर्याय राहणार नाही.

मानवी साखळी ते लोकचळवळ...!
जलपर्णीने रंकाळ्याचा श्‍वास गुदमरत असताना ‘सकाळ’ने २००९ ला कोल्हापूरकरांना आवाहन केले आणि रंकाळ्याभोवती प्रचंड मोठी मानवी साखळी उभारली.कोल्हापूरकरांच्या या दबावामुळेच महापालिकाही खडबडून जागी झाली आणि पुढे जलपर्णीमुक्त रंकाळ्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. रंकाळा जलपर्णीमुक्त झाला आणि त्यानंतर मग रंकाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणावर भर दिला गेला. त्यातून हा परिसर रंकाळा पक्षीतीर्थ म्हणून नावारूपाला आला. गणेशोत्सवात शंभर टक्के पर्यावरणपूरक विसर्जन येथे होऊ लागले. त्याशिवाय लोकसहभागातून विविध कृती कार्यक्रमांवरही आजही भर दिला जात आहे.

Web Title: kolhapur news sandhyamath beauty in rankala