राज्यातील १९ मोठ्या शहरांवर ६५ निमशहरातील मैल्यावर प्रक्रियेची जबाबदारी

सुधाकर काशीद
बुधवार, 30 मे 2018

कोल्हापूर - शहरातील सांडपाणी, मैल्याची विल्हेवाट लावता लावता घाम फुटलेल्या कोल्हापूर महापालिकेवर अन्य पाच निमशहरांतील मैल्याची प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याची जबाबदारी टाकली आहे. कोल्हापूरबरोबरच कागल, पन्हाळा, गडहिंग्लज, आष्टा व पेठवडगाव येथील उपसलेला मैला येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर टाकावा, असे परिपत्रक शासनाच्या नगरविकास विभागाने पाठवले आहे. 

कोल्हापूर - शहरातील सांडपाणी, मैल्याची विल्हेवाट लावता लावता घाम फुटलेल्या कोल्हापूर महापालिकेवर अन्य पाच निमशहरांतील मैल्याची प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याची जबाबदारी टाकली आहे. कोल्हापूरबरोबरच कागल, पन्हाळा, गडहिंग्लज, आष्टा व पेठवडगाव येथील उपसलेला मैला येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर टाकावा, असे परिपत्रक शासनाच्या नगरविकास विभागाने पाठवले आहे. 

अशाच प्रकारे राज्यातील १९ मोठ्या शहरांवर ६५ निमशहरांची जबाबदारी देण्यात आली आहे. मोठे एसटीपी प्लॅंट आहेत, तेथे त्यांच्या लगतच्या गावांतील मैला प्रक्रियेसाठी सोडला जाणार आहे. राज्याचा नागरी भाग हागणदारीमुक्‍त झाला, असे जाहीर झाले असताना छोट्या-छोट्या शहरांतील सेफ्टी टॅंकमधील मैल्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे खरोखर नागरी भाग हागणदारी मुक्‍त झाला, असे म्हणण्यावरच शंका 
उपस्थित होऊ लागली आहे; कारण अशा छोट्या शहरांतून बांधलेल्या नवीन घरांत सेफ्टी टॅंकमध्ये मैला साठतो व काही महिन्यांनी तो उपसला जातो. उपसलेला मैला हद्दीजवळ कोठे तरी ओतला जातो. त्यामुळे हागणदारी मुक्‍त गाव या संकल्पनेलाच छेद मिळतो. 

वास्तविक या मैल्यावर प्रक्रिया करून त्याचे खत केले जाते; पण ही व्यवस्था छोट्या छोट्या नगरपालिकांत नाही. कोल्हापुरात ही व्यवस्था आहे; पण ७६ दशलक्ष लिटरची सध्याची यंत्रणाच अपुरी पडते. त्यात आता कागल, पन्हाळा, गडहिंग्लज, आष्टा व पेठवडगावचा मैला आला, तर परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे. या सर्व मैल्यावर प्रक्रिया करणे व त्यातील जड भाग खतासाठी बाजूला काढणे अशक्‍य होणार आहे. 

सध्या केंद्रावर शहरातला उपसा केलेला मैला येतो; पण त्यावर प्रक्रिया होते. जड भाग बाजूला होतो. अजिबात दुर्गंधी नसलेला हा भाग खत म्हणून मोठ्या प्रमाणात वापरला जातो. असे सर्वच ठिकाणी होणे अपेक्षित आहे; पण एस. टी. पी. प्लॅंट उभारणीचा खर्च मोठा असल्याने होत नाही. त्यामुळे पालिका हद्दीतील उपसलेला मैला टॅंकरद्वारे उपसून गावालगत आडबाजूला सोडला जातो. किंबहुना हाच मार्ग पालिकांसमोर उरतो. 

मुख्य शहर ः मैला आणून सोडणारी शहरे
वसई-विरार ः डहाणू, पालघर
अंबरनाथ ः माथेरान
पनवेल ः अलिबाग, खोपोली, कर्जत, रोहा, पेण
पिंपरी चिंचवड ः तळेगाव, लोणावळा, आळंदी
पंढरपूर ः सांगोला, करमाळा, माळशिरस, अक्कलकोट
कऱ्हाड ः विटा, इस्लामपूर, तासगाव
सोलापूर ः दुधणी, मैंदर्गी
नाशिक ः सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबक, सटाणा, मनमाड, येवला
शिर्डी ः कोपरगाव, राहता, राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर
नागपूर ः मौंदा, रामटेक, महादुला, सावनेर, खापा, काटोल, पवनी, तुमसर, कळमेश्‍वर, उमरेड, देवळी, सिंधी
नांदेड ः हिंगोली, परळी, कळमनुरी, उमरी
औरंगाबाद ः पैठण, वैजापूर, सिल्लोड, गेवराई, भोकरदन
अमरावती ः दर्यापूर, अंजनगाव सुरजी, चिखलदरा, अचलपूर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, शेंदूरजना घाट
शेगाव ः जळगाव जामोद, बुलडाणा, अकोला
वाशीम ः उमरखेड

जयसिंगपूर, कुरुंदवाड जोडले इचलकरंजीला 
इचलकरंजी पालिकेचा एस. टी. पी. प्लॅंट आहे. तेथे आता शासनाच्या परिपत्रकानुसार जयसिंगपूर व कुरुंदवाड येथील मैला सोडला जाणार आहे; तर कऱ्हाडला विटा, इस्लामपूर आणि तासगाव ही शहरे जोडण्यात आली आहेत. 

उपसलेला मैला गावालगतच पुन्हा सोडणे म्हणजे हागणदारी मुक्‍ततेला छेद देणे आहे. त्यामुळे शासनाने सर्व गावांतील मैला प्रक्रिया केंद्रावर सोडण्याचे परिपत्रक काढले आहे.
-डॉ. विजय पाटील,
मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिका.

Web Title: Kolhapur News sewage treatment planning special