विद्यार्थ्यांनो, परीक्षांचा निकाल आहे ‘ऑन प्रोसेस’

संदीप खांडेकर
रविवार, 1 जुलै 2018

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून बी.ए, बी.कॉम, बी. एस्सी. अभ्यासक्रमांच्या निकालाचे गुणपत्रक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. शेवटच्या वर्षाचे गुणपत्रक मिळत नसल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा कसा?, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. गुणपत्रक मागायला गेल्यानंतर केवळ ‘रिझल्ट ऑन प्रोसेस आहे,’ या वाक्‍यावर विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून बी.ए, बी.कॉम, बी. एस्सी. अभ्यासक्रमांच्या निकालाचे गुणपत्रक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. शेवटच्या वर्षाचे गुणपत्रक मिळत नसल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा कसा?, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. गुणपत्रक मागायला गेल्यानंतर केवळ ‘रिझल्ट ऑन प्रोसेस आहे,’ या वाक्‍यावर विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

४५ दिवसांत निकाल लावण्याचा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा लौकिक आहे. राज्यातील अन्य विद्यापीठांपेक्षा निकाल लावण्यात काकणभर चढ असल्याने परीक्षा विभागाची पाठही थोपटली गेली आहे. बी.ए, बी.कॉम, बी. एस्सी.च्या विद्यार्थ्यांकडून मात्र हा विभाग आता टीकेचे लक्ष्य झाला आहे. सेमिस्टर चार, पाच व सहाच्या निकालाचे गुणपत्रक मिळत नसल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत. विद्यार्थ्यांनी गुणपत्रक का दिले जात नाही, अशी विचारणा केल्यावर विभागाकडून महाविद्यालयीन प्रशासनाकडे बोट दाखवले जात आहे.

उत्तरपत्रिका वेळेत मिळाल्या नसल्याचे सांगून वेळ मारून नेण्याच्या या परीक्षा विभागाच्या प्रकाराला वैतागलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मात्र नकारार्थी उत्तर देत आहे. केवळ गुणपत्रकासाठी विद्यार्थ्यांना कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील ग्रामीण भागातून विद्यापीठाकडे यावे लागत आहे.

जे विद्यार्थी २०१४ पूर्वीचे आहेत, ज्यांच्या मायग्रेशनची पूर्तता झालेली नाही, ज्यांना ऑड नंबर घेऊन परीक्षा द्यावी लागली, त्यांच्या त्रुटी दूर करून निकाल जाहीर केले जात असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. ते मान्य केले तरी २०१५ नंतर बी.ए. ला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय?, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या तारखा उलटून जात असल्याने त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे. एम.कॉम, एम.बी.ए.च्या प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली आहे. लॉच्या प्रवेश प्रक्रियेचा निकालही काल जाहीर झाला. प्रवेशासाठी कागदपत्रे पूर्ण असतील तरच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ज्यांच्याकडे तिन्ही वर्षांची गुणपत्रकेच नाहीत, त्यांना प्रवेश अर्ज भरता येत नसल्याचे चित्र आहे.

सुमारे २२०० विद्यार्थ्यांच्या मायग्रेशनचा प्रश्‍न होता. तो मार्गी लावला आहे. २०१४ पूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या त्रुटींचे पूर्तता केली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले नाहीत, ते लवकरच जाहीर केले जातील.
- महेश काकडे,

संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ.

सेमिस्टरचे निकाल वेळेवर जाहीर होणे आवश्‍यक आहे. विद्यापीठाकडे कितीवेळा चकरा मारायच्या? पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शेवटच्या टप्प्यात आहे. विद्यापीठाने प्रवेशाची प्रोव्हिजनल व्यवस्था करावी.
- तुषार कांबळे,

विद्यार्थी, पट्टणकोडोली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Shivaji University Result issue