तलाठी मगदूम लाच घेताना पुन्हा जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

गडहिंग्लज - तालुक्‍यातील एक तलाठी आज सायंकाळी सातच्या सुमारास लाच घेताना दुसऱ्यांदा जाळ्यात अडकला. भीमराव कृष्णा मगदूम (मूळ गाव पिंपळगाव, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. तो सध्या जरळी (ता. गडहिंग्लज) सज्जात कार्यरत होता.

गडहिंग्लज - तालुक्‍यातील एक तलाठी आज सायंकाळी सातच्या सुमारास लाच घेताना दुसऱ्यांदा जाळ्यात अडकला. भीमराव कृष्णा मगदूम (मूळ गाव पिंपळगाव, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. तो सध्या जरळी (ता. गडहिंग्लज) सज्जात कार्यरत होता.

सात-बारा उतारा देण्यासाठी पाच हजार लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला येथील ओंकार ड्रायव्हिंग स्कूलसमोर रंगेहाथ पकडले. चन्नेकुप्पी येथील विशाल सावंत यांची जरळीच्या हद्दीत जमीन आहे. सावंत भावकीच्या शेतीजवळच रामू शिप्पुरे यांची शेती आहे.

शिप्पुरे यांना शेतात जाण्यासाठी रस्ता हवा होता. सावंत भावकीचा रस्त्यास विरोध होता. यामुळे शिप्पुरे यांनी सावंत यांच्याविरुद्ध त्यांच्या शेतातून रस्ता मिळण्याबाबत तहसीलदारांकडे दावा दाखल केला. १८ सप्टेंबर २०१७ ला तहसीलदारांनी सावंतच्या बाजूने निकाल दिला. सावंत यांना संबंधित जमिनीचे सातबारा उतारे लागणार होते. त्यासाठी सावंत यांनी तलाठी मगदूमची भेट घेतली. त्या वेळी ‘पूर्वीच्या दाव्याचे काम तुमच्या बाजूने केले आहे. त्याचे आधी दहा हजार रुपये द्या, मग सातबारा उतारे देतो,’ असे मगदूमने सावंत यांना सांगितले. त्यानंतर १३ मार्चला सावंत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 

तडजोडीअंती व्यवहार पाच हजारांत ठरला. ही रक्कम आज सायंकाळीच ओंकार ड्रायव्हिंग स्कूलसमोर घेऊन येण्यासाठी मगदूमने सावंत यांना सांगितले. सायंकाळी सातच्या सुमारास रक्कम स्वीकारतानाच मगदूमला पकडले. पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्यासह सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, नाईक शरद पोरे, संदीप पावलेकर, पोलिस कॉन्स्टेबल रूपेश माने, चालक विष्णू गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दुसऱ्यांदा लाच.. पहिलीच वेळ
१९ डिसेंबर २०१४ ला सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी चार हजार लाच स्वीकारताना मगदूमला पकडले होते. त्या वेळी तो गडहिंग्लज सज्जात कार्यरत होता. या प्रकरणात त्याला सहा महिने निलंबित केले होते. त्यानंतर तो चंदगड तालुक्‍यात हजर झाला. गडहिंग्लजमधील घटना घडण्यापूर्वी काही वर्षे त्याने जरळीत काम केले होते. गडहिंग्लजच्या लाचप्रकरणानंतर त्याला पुन्हा जरळी सज्जाच दिला होता. येथेही त्याची लाचखोरी उघडकीला आली. पहिले प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच दुसऱ्यांदा लाच घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Talathi Magdum arrested in bribe case