लग्नानंतर माहेरचे आडनाव ठेवण्याचा मुलींमध्ये ट्रेंड 

अमृता जोशी
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

"सकाळ'च्या सर्वेक्षणातील चित्र - सुशिक्षत, शहरी महिलांचा आग्रह; कायद्याची सक्तीही नाही 

कोल्हापूर - माहितीचा प्रचंड ओघ, विविध पातळ्यांवर होणाऱ्या नॉलेज शेअरिंगमुळे तरुणाईच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनांमध्येही वेगाने बदल होत आहेत. त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पना सांस्कृतिक, मानसिक बदल घडवून आणत आहेत. याचाच भाग म्हणून लग्नानंतर तरुणींच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत प्रचलित परंपरेला छेद जाऊन स्वतःच्या माहेरचे नाव, आडनाव लग्नानंतरही कायम ठेवण्याचा ट्रेंड आला आहे. 

लग्न झाले म्हणून फक्त "तिचे'च नाव-आडनाव का बदलायचे, याचे कोणतेही समर्पक कारण नाही. कायद्यानुसार मुलीने लग्नानंतर तिचे नाव, आडनाव बदलावे, सासरचे आडनाव लावावे, अशी सक्ती नाही. तरीही "लग्नानंतर माहेरच्या विश्‍वातून बाहेर पडून मुलीने सासर हेच सर्वस्व म्हणून स्वीकारावे. इच्छा असो, नसो, सर्व तडजोडी हसतमुखाने स्वीकाराव्यात,' अशा अपेक्षेचे संकेत अप्रत्यक्षरीत्या समाजाकडून आताच्या युगातही मुलींना दिले जातात. मात्र "सकाळ'तर्फे केलेल्या सर्वेक्षणात सुशिक्षित, शहरी महिलांमध्ये तरी "तिने तिची पूर्वायुष्यातील ओळख पुसून टाकावी आणि नव्या आयुष्याला सामोरे जावे अशी कल्पना' तरुणाईच्या प्रयत्नातून मागे पडत चालल्याचे दिसून येते. 

1. लग्नानंतर मुलीने माहेरचे नाव, आडनाव बदलून सासरचे नाव, आडनाव लावावे हे योग्य वाटते का? 
या प्रश्‍नाला तब्बल 90.4 टक्के मुली, महिलांनी "नाही' असे उत्तर दिले. तर केवळ 9.6 टक्के जणींनी "होकार' दिला. ज्या काळात लग्नानंतर मुलीचे नाव, आडनाव बदलण्याची परंपरा निर्माण झाली, त्या काळात महिलांवर कौटुंबिक, सामाजिक बंधने मोठ्या प्रमाणात होती. यामुळे राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर आदी मोजके अपवाद वगळता स्त्रियांचे स्वतंत्र कर्तृत्व, ओळख नव्हती. आताच्या काळात मात्र महिलांच्या कर्तृत्वासमोर लग्नानंतर नाव, आडनाव बदलण्याची परंपरा कालबाह्य ठरली आहे. "वंशाची पणती' म्हणून मुलीलाही कुटुंबाचा वारसा चालविण्याचा अधिकार आहे. 

2. लग्नानंतर मुलींवर सासरचे नाव, आडनाव लावावे अशी सक्ती केली जाते का? 
याचे उत्तर 71.2 टक्के मुलींनी "हो' असे दिले. 28.8 "नाही' असे उत्तर दिले. आताच्या जगात तरुणी, महिला पुरुषांच्या बरोबरीने, कधी कधी त्याहूनही प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असताना कौटुंबिक पातळीवर त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य नाकारले जाणे ही गंभीर बाब आहे, हेच यातून समोर येते. 

3. लग्नानंतर मुलीने नाव, आडनाव बदलावे किंवा बदलू नये याचा निर्णय ती स्वतः व्यक्तिस्वातंत्र्यानुसार घेऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? 
याचे उत्तर 63.5 टक्के मुली, महिलांनी "हो' असे दिले. 36.5 टक्‍के जणींनी याचे उत्तर "नाही' असे दिले. 63.5 टक्के महिला आपले अधिकार, कायद्याबाबत जागरूक असल्याचे यातून स्पष्ट होते. 

4. लग्नानंतर तुम्हाला तुमचे कोणते नाव, आडनाव राहावे अशी तुमची इच्छा आहे? 
याचे उत्तर देताना 65.4 जणींनी "माहेर'च्या नाव, आडनावाला तर "दोन्हीकडच्या' (शिंदे-जाधव अशा प्रकारे) नावांना 28.8 टक्के पसंती मिळाली. केवळ 5.8 टक्‍क्‍यांनी "सासरचे' नाव, आडनाव ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. लग्नानंतर फक्त सासरचे नाव, आडनाव लावण्याचा काळ मागे पडून सासर-माहेरचे किंवा केवळ माहेरचे नाव, आडनाव लावण्याचा ट्रेंड आला आहे. 

5. माहेरचे नाव, आडनाव लावावे, असे आपणास का वाटते? 
याचे उत्तर देताना तरुणी, महिलांनी "आपण निर्माण केलेली ओळख, नाव-आडनावाशी जवळीक, सुलभता, स्वतःचे नाव-आडनाव आवडणे, आई-वडिलांचा अभिमान, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता, कुटुंबाचे प्रतिनिधीत्व, वारसा चालविण्याची इच्छा' असल्याचे सांगितले. तर सासरचे नाव-आडनाव लावण्यामागे "परंपरा, नातेसंबंधात तणाव नको, सासरच्या व्यक्तींच्या विरोधात जावे लागू शकते, ते आपल्याला समजून घेतील किंवा नाही' या कारणांनी याबाबत बोलणे टाळल्याचे सांगितले. दोन टक्के जणींनी सासरी "सून' म्हणून नव्हे, तर "मुलगी' म्हणून कौतुक झाल्याने स्वेच्छेने, आनंदाने सासरचे नाव-आडनाव स्वीकारल्याचे सांगितले. 

6. आपले मत इतरांनाही पटवून द्यावे, असे वाटते का? 
या प्रश्‍नाचे उत्तर देताना 76.9 टक्के जणींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तर 23.1 जणींनी यामध्ये रस नसल्याचे सांगितले. 

"निवड करण्या'च्या मूलभूत अधिकाराच्या वापराबाबत तरुणी अधिक सजग झाल्या आहेत. अनेक मुलेही स्वतःच्या पत्नीचा स्वातंत्र्याचा हा अधिकार मान्य करत आहेत. काही मुले स्वतःहून यासाठी पुढाकार घेताना दिसतात. यातून मुलगी हे "परक्‍याचे धन' ही मानसिकता कमी होऊन "मुलगीही घराण्याचा वारसा चालविण्यास तितकीच समर्थ आहे' या विचाराला निश्‍चतपणे बळ मिळणार आहे. 

संविधानातील आर्टिकल 21 नुसार मिळणाऱ्या "जगण्याच्या अधिकारा'त "निवड करण्याचा अधिकार'ही समाविष्ट आहे. यानुसार लग्नानंतर मुलीने तिचे नाव बदलायचे की नाही, हा निर्णय पूर्णतः त्या मुलीवर अवलंबून आहे. "लग्नानंतर मुलीने नाव बदलावेच' अशी कायद्याने सक्ती नाही. 
- ऍड. दिपाली कदम 

माझ्या माहेरच्या नाव, आडनावाने मी आधारकार्ड, पासपोर्ट, इतरही कागदपत्रे तयार केली. त्यामध्ये "-----यांची पत्नी म्हणून' असा पतीच्या नावाचाही स्वतंत्र उल्लेख केला. भारतीय कायद्यानुसार असे करण्याचा मुलींना पूर्ण अधिकार असूनही संबंधित कर्मचाऱ्यांकडून "तुला कुमारी असल्याचे दाखवून ही कागदपत्रे हवीत का?,' पासपोर्टसाठीच्या पोलीस व्हेरीफिकेशनवेळी "पतींना कल्पना न देताच तुम्ही पासपोर्ट काढत आहात का?' असे प्रश्‍न विचारले. यामागे त्या व्यक्तींचे कायद्याबाबतचे अज्ञान, मानसिकताही असू शकते. 
- प्रा. अदिती बर्वे 

कोणत्याही मुलीला कुटुंबाचा, आई-वडिलांचा अभिमान असतोच. "वारसा चालविण्याची धुरा तिच्या खांद्यावर आल्या'मुळे स्त्री-भ्रुण हत्या कमी होण्यासही मदत होईल. तिच्या लग्नापूर्वीच्या कर्तृत्वातून तयार झालेली तिची ओळख, तिचे स्वत्व पुसले जाणार नाही. नाव, आडनाव बदलण्याचे किंवा न बदलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मुलींनी खंबीर पुढाकार घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. 
- मृणालिनी बेलवलकर 

लग्नानंतर आडनाव न बदलणाऱ्या मुलींना रेशन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, होणाऱ्या मुलांचे बर्थ सर्टिफिकेट मिळविताना अनेक अडचणी येत असत. संबंधित शासकीय कार्यालयातील व्यक्तींकडून ताशेरे, असहकार्याचा अनुभव येतो. संथ गतीने का असेना यामध्ये बदल घडत आहे, हेच खूप महत्त्वाचे. 
- निकिता कुलकर्णी 

Web Title: kolhapur news Trend in girls surname after marriage