महिला आयोगाने जोडले ६८९ संसार

नंदिनी नरेवाडी
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

महिलांना सध्या सर्वच स्तरावर होणाऱ्या त्रासाचे प्रमाण वाढले आहे. अशा त्रासातून त्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य महिला आयोग काम करते. त्यासाठी समुपदेशन व संवाद अशी प्रभावी सूत्रे वापरून अनेक महिलांचे व संसाराचे रक्षण करण्यात हा विभाग यशस्वी झाला आहे.  

कोल्हापूर - लग्नानंतर काही वर्षांतच पती - पत्नीची भांडणे व्हायला लागली. त्यांना एक लहान मुलगा होता; पण सततच्या भांडणामुळे संसार मोडला. दोघे वेगळे राहायला लागले. एके दिवशी मुलाने आईला विचारले. आईलाही वाटले मुलाला वडिलांचे प्रेम मिळत नाही. तिने महिला आयोगाशी संपर्क केला.

तेथील समुपदेशनानंतर पतीने पुन्हा पत्नीला सन्मानपूर्वक घरी बोलावले. अशा प्रकारे १६ वर्षांपूर्वी मोडलेला संसार राज्य महिला आयोगाच्या मध्यस्तीने सावरला. असे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ६८९ विस्कटलेल्या संसाराची घडी बसविण्यात राज्य महिला आयोगाला यश आले आहे. 

महिलांना सध्या सर्वच स्तरावर होणाऱ्या त्रासाचे प्रमाण वाढले आहे. अशा त्रासातून त्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य महिला आयोग काम करते. त्यासाठी समुपदेशन व संवाद अशी प्रभावी सूत्रे वापरून अनेक महिलांचे व संसाराचे रक्षण करण्यात हा विभाग यशस्वी झाला आहे.  

महिला आयोगाकडून प्रत्येक तालुक्‍यात वर्षाला सरासरी पाच ते सहा कार्यक्रम घेतले जातात. तेथील महिलांना आयोगाच्या कामाविषयी जागृत केले जाते. अंगणवाडी सेविका - मदतनीस यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम घेतले जातात. संकटात असलेल्या महिलांना याचा उपयोग तर होतोच; शिवाय त्रासातून मुक्त होण्याचा नवा मार्ग मिळतो. संकटात असलेल्या महिलेला आधार देण्यासोबतच त्यांचे समुपदेशन केले जाते. शिवाय सर्व सुरळीत झाल्यानंतरही पाठपुरावा करून महिलेला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, याची खात्री करून घेतली जाते.

याबाबत राज्य महिला आयोगाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक आनंदा शिंदे म्‍हणाले, ‘‘महिलांना होत असलेल्या त्रासाच्या घटना सध्या वाढत आहेत. कित्येक संसार अशा गोष्टींमुळे मोडतात. ते मोडू नयेत, संसाराची घडी नीट रहावी याकरिता महिला आयोग प्रयत्न करत आहे.’’

अशा असतात तक्रारी ः
चारित्र्याचा संशय, शारीरिक व मानसिक त्रास, आर्थिक छळ, व्यसनाधीनतेमुळे होणारा त्रास, नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मज्जाव, मुलगीच झाली व मूल होत नाही म्हणून छळ, अनैतिक संबंध, शिक्षण घेण्यास मज्जाव, सासू-सासऱ्यांचा संसारातील हस्तक्षेप.

गेल्या वर्षातील आकडेवारी
दाखल झालेल्या तक्रारी - ७४७
तडजोड केलेल्या तक्रारी - ६८९
चौकशी स्तरावरील तक्रारी - ४७

जिल्ह्यातील केंद्रे 
राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज, हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, कागल येथील पंचायत समिती व कोल्हापूर जिल्हा परिषद.

Web Title: Kolhapur News Women commission specail