कोल्हापूर-पुणे रेल्वेसेवा अजुनही ठप्पच; गाड्याच उपलब्ध नाहीत

संतोष भिसे
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

17 ऑगस्टपासून वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा
17 ऑगस्टला पुणे-मुंबई सेक्शन सुरु होईल, तोपर्यंत -मिरज-कोल्हापूर मार्गही खुला होईल. त्यानंतरच खोळंबलेल्या सर्व एक्सप्रेस मार्गस्थ होतील अशी अपेक्षा आहे. 

मिरज : मिरज-पुणे रेल्वेसेवा सुरु झाली असली तरी मोठ्या संख्येने गाड्या बंदच आहेत. महापुरामुळे आणि मुंबई-पुणेदरम्यानच्या मेगाब्लाॅकमुळे बहुतांश एक्सप्रेस गाड्या विविध स्थानकांत अडून पडल्या आहेत. 

सांगली-कोल्हापूर व साताऱ्यातील महापुरामुळे संपुर्ण पश्चिम महाराष्ट्राची पूरकोंडी झाली. रस्ते बंद राहीले. या स्थितीत रेल्वेचा मोठा आधार प्रवाशांना होता; मात्र रेल्वेसेवेलादेखील पुराचा ऐतिहासिक फटका बसला. मिरज जंक्शनमधून पुणे, सोलापूर, बेळगाव आणि कोल्हापूर हे चारही मार्ग बंद ठेवण्याचे ऐतिहासिक संकट ओढवले. सध्या कोल्हापूरव्यतिरिक्त अन्य मार्गांवर गाड्या धावू लागल्या आहेत, पण सेवा पुर्ण क्षमतेने सुरु नाही. कोल्हापूर स्थानकात अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. रुकडीजवळ लोहमार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद आहे. त्यामुळे कोल्हापूर ते पुणे रेल्वेसेवा तुर्त बंदच आहे. रुकडीजवळ रुळांखालील खडी वाहून गेली आहे. रेल्वेचे अधिकारी बाॅबीयन यंत्राद्वारे खडी पसरण्याचे काम करत आहेत. त्यानंतर पंचगंगेच्या पुलाची चाचपणी करुन गाड्या सुरु केल्या जातील. 

कोल्हापुरातून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या सध्या मिरजेतून सोडल्या जात आहेत. पुणे-मुंबई मार्ग शुक्रवारपर्यंत (ता. 16 ) बंद राहणार आहे, त्यामुळे कोयना,सह्याद्री आणि महालक्ष्मी एक्सप्रेस बंदच आहेत. जोधपूर-अजमेर, यशवंतपूर-अजमेर, यशवंतपूर-गांधीधाम, बेंगलुरु-जयपूर इत्यादी लांब पल्ल्याच्या काही गाड्या मिरजएेवजी दाैंड-मनमाडमार्गे वळवल्या आहेत, त्यामुळे मिरजेतून पुण्याला जाण्यासाठी पुरेशा गाड्या तुर्त उपलब्ध नाहीत. काही पॅसेंजर गाड्या व महाराष्ट्रसारख्या मोजक्याच एक्सप्रेस उपलब्ध आहेत. 

17 ऑगस्टपासून वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा
17 ऑगस्टला पुणे-मुंबई सेक्शन सुरु होईल, तोपर्यंत -मिरज-कोल्हापूर मार्गही खुला होईल. त्यानंतरच खोळंबलेल्या सर्व एक्सप्रेस मार्गस्थ होतील अशी अपेक्षा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Pune railway transport still not open due to flood situation