विधवांना सन्मान सामाजिक सुधारणेची नवी चळवळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Widow

विधवांना सन्मान सामाजिक सुधारणेची नवी चळवळ

कोल्हापूर : जिल्ह्यातील हेरवाड (ता. शिरोळ) या गावाने पति- निधनानंतरच्या सामाजिक अवहेलनेच्या जाचातून विधवांना मुक्त करण्यासाठी व त्यांचा मानसन्मान वाढण्याचा निर्णय ४ मे २०२२ रोजीच्या ग्रामसभेत ठराव क्रमांक ०४ नुसार घेतला. ठरावाच्या सूचक आहेत सौ. मुक्ताबाई संजय पुजारी; तर अनुमोदक होत्या सौ. सुजाता केशव गुरव. सरपंच आहेत सुरगोंडा पाटील, तर ग्रामविकास अधिकारी आहेत कोंडिग्रेच्या पल्लवी कोळेकर. असा निर्णय घेणारी हेरवाड ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. सामाजिक न्यायासाठी झटलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातून चळवळीच्या नव्या पर्वाला सुरवात झाली आहे.

बंगालच्या राजा राममोहन राय यांनी सतीची चाल बंद करण्यासाठी प्रथम प्रयत्न केला; तर महात्मा जोतिबा फुले यांनी विधवांना शिक्षणातून सन्मान देण्यासाठी पाऊल उचलले. त्याच पावलावर पाऊल ठेवून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या राज्यात, देशात सर्वप्रथम आरक्षणाचा कायदा केला. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. मंदिर व मशिदींना नाही, तर त्या-त्या धर्माच्या अनुयायींसाठी शिक्षणाची सोय केली; तीही स्वतंत्र वसतिगृहे उभारून.

त्यांच्याच राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाडने पतिनिधनानंतर महिलांना दागिने घालण्यास प्रतिबंध करणारी प्रथा संपुष्टात आणण्यासाठी ग्रामसभा घेऊन ठराव केला. त्यानुसार आता पतीचे निधन झाले असले, तरी संबंधित महिलेचे मंगळसूत्र, बांगड्या, कर्णफुले, जोडवी आदी सौभाग्य अलंकार कोणीही उतरवू शकणार नाही. तसेच त्या महिलेला मिळणारा सन्मान कोणी नाकारू शकणार नाही.

शिवाजी महाराजांनंतर रयतेच्या काळजात स्थान मिळवणाऱ्या राजर्षी शाहूंच्या पवित्र भूमीत ही नवी चळवळ सुरू झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातीलच हातकणंगले तालुक्यातील माणगावनेही या क्रांतीच्या पाऊलवाटेवर पाऊल टाकले आहे. हेरवाडप्रमाणेच विधवांचा अवमान करणाऱ्या प्रथा उखडून टाकण्याचा निर्णय घेतला. विधवांना सन्मान देणारं हे सामाजिक सुधारणेचं वादळ महाराष्ट्रभूमीतून वाहत देशभर जाईल.

अशा सुधारणेचं स्वप्न पाहिलेला एक माणूस आहे, तो सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील. त्यांचं नाव प्रमोद नामदेव झिंजाडे. व्यवसाय शेती आणि सन १९८५ पासून सामाजिक कार्य. सन १९८५ पासून ‘महात्मा फुले सामाजिक सेवा मंडळ’ नावाने स्वयंसेवी संस्था स्थापन करून ते सामाजिक काम करीत आहेत. सांगली, कोल्हापूर भागातील शेकडो गावांत त्यांनी महापूर आणि कोरोना काळात मदतीचा हातभार लावला आहे. त्यानिमित्ताने शेकडो गावांशी त्यांचा संपर्क झाला. त्यातूनच शिरोळ तालुक्यातील हेरवाडकरांनी त्यांच्या संकल्पनेतील चळवळ सुरू केली आहे.

झिंजाडे यांचा एक मित्र कोरोनाच्या लाटेत हे जग सोडून गेला. त्याच्या पत्नीचे सौभाग्य अलंकार ज्या पद्धतीने पतिनिधनाच्या दु:खातही प्रथा, परंपरा म्हणून ओरबाडून काढण्यात आले, ते पाहून त्यांनी या प्रथेच्या उच्चाटनाचा निर्धार केला. पत्नीला सोबत घेऊन स्वत: तहसीलला गेले. ‘माझ्या मृत्यूनंतर पत्नीचे सौभाग्य अअलंकार काढून घेऊ नयेत,’ असे शपथपत्र तयार केले. ते करतानाही प्रशासकीय अडथळ्यांशी लढावे लागले. अखेर ते शपथपत्र तयार झाले. हे अनोखे शपथपत्र समाजमाध्यमांतून महाराष्ट्रभर गेले. शेकडो नव्हे, तर हजारो गावांच्या सरपंचांनी पाठिंबा दिला. चांगला विचार एका माणसाने जरी पेरला, तरी त्याचं पीक कसं दमदार येतं, हे यानिमित्ताने दिसून

आले आहे.

विचार आणि कृतीचा संगम साधण्याचं काम हेरवाडने केले. या हेरवाडशी त्यांचा संबंध २००५, २०१९, २०२०, २०२१ च्या महापूर काळात मदतीवेळी आला. झिंजाडे यांची कल्पना ग्रामसभेत ठराव करून लोकांसमोर आणण्याचे काम ग्रामपंचायतीने केले. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षाच्या प्रारंभी हा निर्णय झाल्याने त्याला वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सुधारणेचा हा वारा महाराष्ट्रभर नेण्याचे आवाहन करून पुढाकारही घेतला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात तो दिवसही लवकरच दिसेल, यात शंका नाही. चला, तर मग आपल्या गावातही विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क

मिळवून देऊया.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाडने पतिनिधनानंतर महिलांना दागिने घालण्यास प्रतिबंध करणारी प्रथा संपुष्टात आणण्यासाठी ग्रामसभा घेऊन ठराव केला. त्यानुसार आता पतीचे निधन झाले असले, तरी संबंधित महिलेचे मंगळसूत्र, बांगड्या, कर्णफुले, जोडवी आदी सौभाग्य अलंकार कोणीही उतरवू शकणार नाही; तसेच त्या महिलेला मिळणारा सन्मान कोणी नाकारू शकणार नाही. शिवाजी महाराजांनंतर रयतेच्या काळजात स्थान मिळवणाऱ्या राजर्षी शाहूंच्या पवित्र भूमीत ही नवी चळवळ सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातीलच हातकणंगले तालुक्यातील माणगावनेही या क्रांतीच्या पाऊलवाटेवर पाऊल टाकले आहे...

- धोंडिराम पाटील

Web Title: Kolhapur Respect Widows New Movement Social Reform

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top