कोल्हापूर सकाळ वर्धापन : विधायक, रचनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव

कोल्हापूर सकाळ वर्धापन : विधायक, रचनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव

‘सकाळ’च्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी (ता. १) विधायक व रचनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव होणार आहे. आवर्जून दखल घ्यावी, अशा व्यक्तिमत्त्वांचा गौरव करताना त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा आणि त्याचवेळी त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, हाच त्यामागील उदात्त हेतू. यंदाच्या सत्कारमूर्तींविषयी...

जंगलातला साहित्यिक
सलीम सरदार मुल्ला मूळचे हातकणंगले तालुक्‍यातील तळंदगे गावचे. त्यांचे वडील सरदार व आई रजिया दोघेही शिक्षक. नोकरीच्या निमित्ताने सलीम मुल्ला यांची कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांत नोकरी झाली. त्यात त्यांनी नित्याच्या कामाबरोबरच साहित्य विश्वातही आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या पुस्तकाला साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्काराने गौरवण्यात आले. सलीम मुल्ला सिव्हिल व इंटिरियर डिझाईनचा डिप्लोमा होल्डर. दहा-बारा वर्षे बांधकाम व्यवसायात काम केले; पण मन सारखे निसर्गाशी संबंधित गोष्टीतच रमत होते. वयाच्या तेहतिसाव्या वर्षी वनरक्षकाची जाहिरात वृत्तपत्रात वाचली आणि अर्ज केला. सरकारी नोकरी आणि तीही जंगलात. त्यामुळे ही नोकरी मिळाली तर मिळाली म्हणून अर्ज केला आणि वेळ चांगली मला नोकरी मिळाली. आता वनखात्यात नोकरीची बारा वर्षे झाली. जंगलात फिरताना प्रत्येक झाड, प्रत्येक पक्षी, त्याचा आवाज, त्यांच्या हालचाली, तिन्ही ऋतूंत त्यांच्यात होणारे बदल यावर लक्ष ठेवले. बारकावे टिपले व ते एका पुस्तकाद्वारे त्यांनी शब्दबद्ध केले आणि साहित्य अकादमीनेही या पुस्तकाची नोंद घेत पुरस्काराने गौरव केला. 

मार्गदर्शक अरण्यपुत्र
पन्हाळा तालुक्‍यातील पडसाळी मानवाडमधले भागोजी ढवण म्हणजे जंगलातल्या अद्‌भुत माहितीचा खजाना. जंगलात फिरताना अचानक ते दीर्घ श्‍वास घेतात आणि सांगतात जवळ कोठेतरी गवा आहे, जवळ भेकर आहे, अस्वलाचा वावर आहे. केवळ वासावरून प्राण्यांचे अस्तित्व ओळखण्याचे त्यांचे कसब आहे. गेली पंचवीसहून अधिक वर्षे ते जंगल भ्रंमती करणाऱ्या विविध संस्था व निसर्गप्रेमींसाठी वाटाड्या म्हणून मार्गदर्शन करत आहेत. एकदा अनावधानाने भर जंगलात उडालेल्या तब्बल नऊ गोळ्या त्यांच्या शरीरात घुसल्या. त्यातील सात गोळ्या बाहेर काढल्या. मात्र, अजूनही दोन गोळ्या शरीरातच आहेत आणि वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी आजही ते तितक्‍याच उत्साहाने सर्वांना जंगलाचा अनुभव देत आहेत. अनेक व्यक्ती, संस्था, समूह त्यांच्या त्यांच्या पातळीवर जंगल भ्रमंती, गड-किल्ल्यांची वाट तुडवत असतात. मार्गावरची वैशिष्ट्ये अनुभवत असतात. विराण अवस्थेत असलेल्या गड-किल्ल्यावर रात्र काढतात. एका वेगळ्या अंगाने इतिहास, भूगोल व वर्तमान अनुभवतात. मात्र, या साऱ्या प्रवासात भागोजी ढवण यांच्यासारख्या अरण्यपुत्रांचे मार्गदर्शनच मोलाचे ठरत असते.

दिव्यांगांचा आधारवड 
हे पंक्‍चर काढायचे दुकान आहे का, खुळ्याची चावडी, असे काही लोक मुद्दाम चेष्टेने म्हणायचे...पंक्‍चर काढणाऱ्यांच्या हालचाली चेहऱ्यावरचे भाव पाहून कुत्सितपणे हसायचे; पण हे आठ जण मात्र समोरच्याकडे लक्ष न देता, काम करत राहायचे. एकजण पंक्‍चर झालेले चाक काढायचा. दुसरा पंक्‍चर शोधायचा. तिसरा पंक्‍चर काढायचा. चौथा हवा भरायचा. सुरवातीला ते थोडे गोंधळायचे. हळूहळू त्यांचा जम बसला आणि आज पंक्‍चर काढायचे हे दुकान एकदम फास्ट आहे. विशेष हे की, येथे काम करणारे हे आठही जण मतिमंद, गतिमंद, मूकबधिर आहेत. पंक्‍चर काढण्याच्या वेगळ्या दुकानाची ही कथा आहे, फुलेवाडी पहिल्या बसस्टॉपजवळच्या श्रावम टायर अँड सर्व्हिसिंग सेंटरची. या सेंटरचे मालक महेश शामराव सुतार हे स्वतः एमए बीपीएड आहेत. नोकरी मिळत नाही म्हटल्यावर त्यांनी वडिलांच्या व्यवसायात लक्ष घातले आणि दुकानात मूकबधिर, अपंग व मतिमंदांना प्राधान्य द्यायचे ठरवले. 

रग्बीतील रणरागिणी
ॲथलेटिक्‍स, कुस्ती ते आंतरराष्ट्रीय रग्बी प्लेयर हा प्रवास सहज शक्‍य नव्हता. शरीराचा कस पाहणाऱ्या रब्बी खेळात खेडेगावातल्या मुलीला स्थान मिळेल का, हा प्रश्न मनात घोळत होता. म्हशींच्या धारा काढून सराव करणाऱ्या माझ्यासारख्या मुलीच्या वाट्याला अडचणींचा डोंगर होता. कुटुंबात आर्थिक चणचण होती. भावाच्या अचानक झालेल्या निधनामुळे दुःखाचे ओझे होते. मात्र, आयुष्यात हरायचे नाही, असा निर्धार तिने केला. एक आंतरराष्ट्रीय, नऊ राष्ट्रीय व सहा राज्यस्तरीय रब्बी स्पर्धा कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने खेळल्या आणि यशही मिळवले. आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू नीलम पाटीलची ही यशोकथा. नीलम कागल तालुक्‍यातील बामणी गावची. कबड्डीच्या मैदानावर कौशल्य सादर केल्यानंतर कुस्तीमध्ये राष्ट्रीय स्तरावर तिने झेंडा फडकवला. या खेळानंतर ती रग्बीची खेळाडू म्हणून अल्पावधित प्रसिद्ध झाली. सुरुवातीला हा खेळ खेळतात कसा, हेसुद्धा तिला माहीत नव्हते. यू ट्यूबवर खेळाचे व्हिडिओ पाहून तिने या खेळाची माहिती घेतली. म्हशीच्या धारा काढल्या की किणी-वाठारचे प्रशिक्षक दीपक पाटील यांच्याकडे सरावासाठी कोल्हापूर गाठायचे, असा तिचा नित्यनेम सुरू झाला आणि बघता बघता ती रग्बीच्या क्षितिजावरही झळकली.  

रोबो रायटरचा निर्माता
अंध आणि हात नसलेल्या विद्यार्थ्यांना लेखनिकाची गरज भासते. शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर लेखनिकाचा पर्याय संबंधितांसाठी खुला करून देण्यात आला आहे. बऱ्याचदा लेखनिकाची लेखनशैली, त्याची आकलन क्षमता यावर संबंधित विद्यार्थ्यांचे परीक्षेतील गुण अवलंबून असतात. काही वेळा लेखनिक न मिळाल्याने अशा विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागते. अंध आणि अपंग विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी इस्त्रोमध्ये काम करणारे धनेश बोरा, वैभव जाधव, प्रवीण गाडे आणि विनय गडा हे चार जण एकत्र आले. त्यांनी रोबो रायटर तयार केला. ज्याद्वारे अंध, अपंगांना लेखनिक मिळेल, शिवाय संपूर्ण शैक्षणिक वर्षांत तो त्यांच्याकडून अभ्यास करून घेईल, अवांतर वाचन करून घेईल. या रोबोला जगभरातील सर्व भाषांचे ज्ञान आहे. रोबोचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी परीक्षेदरम्यान त्याची मेमरी चिप 
बदलून नवीन चिप टाकण्यात येते. जेणे करून विद्यार्थ्यांकडून नकल होण्याचा धोका टळेल. परीक्षेत विद्यार्थी सांगतील आणि रोबो रायटर प्रश्नपत्रिका लिहिणार आहे. या रोबोचा वापर सुरू झाल्यास देशातील तीस लाख अंध-अपंगांना याचा फायदा 
होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com