सावधान, चीन भारताला घेरतोय 

सावधान, चीन भारताला घेरतोय 

कोल्हापूर - ""आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताच देश सध्या आपला मित्र नाही. त्याचवेळी चीन देशाला घेरतो आहे आणि शेजारील देशांना लागेल ती मदतही देतो आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये भारतासमोर चीनचेच मोठे आव्हान असेल,'' असे स्पष्ट मत प्रसिद्ध संरक्षण विश्‍लेषक नितीन गोखले यांनी व्यक्त केले.

"सकाळ'च्या 39 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. दरम्यान, उत्स्फूर्त गर्दीच्या साक्षीने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हा दिमाखदार सोहळा रंगला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महापौर माधवी गवंडी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. 

"बालाकोट हल्ल्यानंतर भारतासमोरील सुरक्षिततेची आव्हाने' या विषयावर श्री. गोखले यांनी संवाद साधला. एकूण 55 मिनिटांच्या संवादात त्यांनी बालाकोट हल्ल्यापूर्वीचे देशभरातील अतिरेकी हल्ले, कारगिल युद्धापासून ते उरीपर्यंतच्या विविध हल्ल्यांविषयी विस्तृत विवेचन केले. बालाकोट हल्ल्याचे नियोजन कसे झाले इथपासून ते सद्यस्थितीत भारतासमोर कोणती आव्हाने आहेत आणि नेमक्‍या काय उपाययोजना कराव्या लागतील, अशा विविध अंगांनी त्यांनी हा संवाद खुलवला. 

श्री. गोखले म्हणाले, ""पाकिस्तान सैन्याचे अस्तित्वच भारताला शत्रूत्व मानण्यात आहे. त्यामुळे सीमेबरोबरच 2014 पर्यंत देशभरातील विविध शहरांत अतिरेकी हल्ले झाले. मात्र, पाकिस्तावर पलटवार करण्याचे धाडस सरकारने केले नाही. उरी हल्ल्यानंतर मात्र चित्र बदलले. सरकार आणि भारतीय सैन्य दलाने "डिफेन्सिव्ह माईंडसेट' बाजूला फेकून देत थेट पाकिस्तानमध्ये घुसून हल्ल्याचा धाडसी निर्णय घेतला. बालाकोट हल्ल्यामुळे 1971 नंतर पहिल्यांदा भारताने सीमा ओलांडून कारवाई केली.'' 

पाकिस्तान हे अगदी छोटे आव्हान आहे. मात्र, चीनने भारताला घेरणे आणि शेजारील इतर देशांना मदतीचा हात देणे, सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर एकही बलाढ्य देश भारताचा मित्र नसणे, चीनकडून पाकिस्तानला होणारा अण्वस्त्रांचा पुरवठा, तुटपुंज्या संरक्षण निधीतून स्मार्ट पर्याय शोधून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, भविष्यातील सायबर धोके ओळखून उपाययोजना करणे हीच मोठी आव्हाने भारतासमोर आहेत, असेही त्यांनी नमूद केले. सैन्य दलातील जुनी शस्त्रे, लढाऊ विमानांबरोबर राफेल, देशांतर्गत नक्षलवाद आदी विषयांवरही त्यांनी भाष्य केले. 

"सकाळ' माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते श्री. गोखले आणि कर्तृत्ववंतांचा गौरव झाला. "सकाळ' माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी "सकाळ'च्या वाटचालीची माहिती दिली. सकाळ-कोल्हापूरचे निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. 

कर्तृत्ववंतांचा गौरव 
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सलीम मुल्ला, आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू नीलम पाटील, दिव्यांगांचे आधारवड महेश सुतार, मार्गदर्शक अरण्यपुत्र भागोजी ढवण, रोबो रायटरचा निर्माता धनेश बोरा यांचे मुख्य सोहळ्यात सत्कार झाले.

वर्धापनदिनानिमित्त नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर कलादालनात "जैवविविधता' आणि "रंग वारीचे' या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. तीन ऑगस्टपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com