esakal | आजऱ्यात 1678 हेक्‍टर शेती पडिक

बोलून बातमी शोधा

1678 Hectare Agriculchar Land Unuse In Ajara Taluka Kolhapur Marathi News

आजरा तालुक्‍यात सतत सुरू असलेल्या वन्यप्राण्याच्या उपद्रवामुळे शेती पडिक पडत चालली आहे. तालुक्‍यातील सुमारे 1678 हेक्‍टर शेतीचे क्षेत्र पड पडले आहे. दरवर्षी पडिक क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती कृषी विभागातून पुढे आली आहे. याबाबत वनविभाग, कृषी विभाग व अन्य प्रशासकीय पातळीवर ठोस उपाय योजना राबविण्याची गरज आहे.

आजऱ्यात 1678 हेक्‍टर शेती पडिक
sakal_logo
By
रणजित कालेकर

आजरा : आजरा तालुक्‍यात सतत सुरू असलेल्या वन्यप्राण्याच्या उपद्रवामुळे शेती पडिक पडत चालली आहे. तालुक्‍यातील सुमारे 1678 हेक्‍टर शेतीचे क्षेत्र पड पडले आहे. दरवर्षी पडिक क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती कृषी विभागातून पुढे आली आहे. याबाबत वनविभाग, कृषी विभाग व अन्य प्रशासकीय पातळीवर ठोस उपाय योजना राबविण्याची गरज आहे. 

आजरा तालुक्‍यात 22 हजार 984 हेक्‍टर पिकाखालील क्षेत्र आहे, पण या वर्षी 21 हजार 306 हेक्‍टरवर पिकांची लागवड झाली आहे. उर्वरीत क्षेत्र पडिक आहे. पडिक पडलेले क्षेत्र जंगलाकडील असून सुमारे 1678 हेक्‍टर इतके आहे. दरवर्षी तालुक्‍यातील जमिनी पडिक होण्याचे प्रमाण वाढले असून वन्यप्राण्यांचा उपद्रव हेच प्रमुख कारण असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. 

तालुक्‍यात या पंधरा वर्षात हत्ती, गवे, वनगाई, सांबर, मोर, लांडोर, माकडे यासारख्या वन्यप्राण्यांचे प्रमाण वाढले आहे. गव्यांचे व वनगाईंचे कळप शेतात उतरून मोठ्या प्रमाणात पिकांची नुकसान करीत आहेत. या बारा वर्षापुर्वी हत्तीचे कळपांचे तालुक्‍यात आगमन झाले. त्यामुळे टस्कर व हत्तींच्या कळपाकडून होणारे पिकांचे नुकसान वाढले आहे. त्याचबरोबर सांबर, मोर, लांडोर, माकडे व अन्य वन्यप्राण्यांच्याकडूनही नुकसान होत आहे. सतत होणाऱ्या नुकसानीला कंटाळून शेतकऱ्यांनी जमिनी पड ठेवण्यास सुरवात केली आहे. शेती कसण्यासाठी झालेला खर्च व मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसेनासा झाल्याने आदीच बळीराजा घाईला आहे.

बेभरवशाचा पाऊस व बदलते हवामान याचाही परिणाम पिकावर होत असून उत्पादनात घट होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात वन्यप्राणी शेतात येवून धुडगूस घालू लागल्याने शेतातून उत्पन्न मिळण्याची शाश्‍वती उरली नसल्याने जमीन पड ठेवली जात आहे. दरवर्षी यामध्ये भर पडत असून बहुतांश जंगलाजवळील शेती पड पडली आहे. 

चार वर्षापासून शेती पड
गव्यांच्या उपद्रवाला कंटाळून सात एकर शेती पडिक पाडली आहे. जमीन जंगलालगत असल्याने पिकात गवे धुडगूस घालतात. वनविभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याने शेती मशागतीसाठी घातलेला खर्च व उत्पन्न यात ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळे गेली चार वर्षापासून शेती पड ठेवली आहे. 
- महादेव चांदेकर, शेतकरी, पेरणोली 

चक्र उलटे
जमिनी लागवडी खाल्यावर लोकांचे उत्पन्न वाढते. त्यांचे राहणीमान सुधारते, पण शेत जमीन पड पडल्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाबरोबर राष्ट्रीय उत्पन्नातही घट येते. येथे अर्थशास्त्राचे चक्र उलटे फिरत असून हे चांगले चित्र नाही. 
- प्रा. श्रीनिवास नाईक, आजरा महाविद्यालय