esakal | गडहिंग्लज 27 कोटींची उलाढाल ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

27 Crore Turnover Jam Of In Gadhinglaj Kolhapur Marathi News

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन कडक पाऊल उचलत आहे. गर्दीची ठिकाणे निर्मनूष्य करण्याकडे त्यांचा कल आहे. यामुळे शहरासह तालुक्‍यात विविध गावांमध्ये होणारे आठवडा बाजार, यात्रा, जत्रा 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत. परिणामी तीन आठवड्यांतील बाजार रद्द झाले आहेत. यामुळे सुमारे 25 ते 27 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. कोरोनाच्या धसक्‍यामुळे लोकही बाजारपेठेत येत नसल्याने व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. 

गडहिंग्लज 27 कोटींची उलाढाल ठप्प

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन कडक पाऊल उचलत आहे. गर्दीची ठिकाणे निर्मनूष्य करण्याकडे त्यांचा कल आहे. यामुळे शहरासह तालुक्‍यात विविध गावांमध्ये होणारे आठवडा बाजार, यात्रा, जत्रा 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत. परिणामी तीन आठवड्यांतील बाजार रद्द झाले आहेत. यामुळे सुमारे 25 ते 27 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. कोरोनाच्या धसक्‍यामुळे लोकही बाजारपेठेत येत नसल्याने व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. 

गडहिंग्लज शहरासह नेसरी, महागाव, नूल, हलकर्णी या मोठ्या बाजारासह दुंडगे, बटकणंगले, हेब्बाळ कसबा नूल, हसूरचंपू, सांबरे, हेब्बाळ-जलद्याळ, कडगाव या खेडे गावातील आठवडे बाजारही रद्द झाले आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील मोठा बाजार म्हणून गडहिंग्लजचा आठवडा बाजार ओळखला जातो. जनावर खरेदी-विक्रीसह भाजीपाला, कडधान्ये, इतर छोट्या-मोठ्या वस्तूंचे विक्रेते या बाजारात येतात. एका बाजारात सुमारे चार कोटीहून अधिक रक्कमेची उलाढाल होते.

कोरोनामुळे या महिन्यातील तीन बाजार होणार नाहीत. त्या पटीतील उलाढालही थांबली आहे. याशिवाय नेसरी, महागाव, नूल, हलकर्णी या मोठ्या गावच्या आठवडा बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. येथील बाजाराचेही तीन आठवडे कोरोनाच्या संसर्गामुळे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. दुंडगे, बटकणंगले, हेब्बाळ, हसूरचंपू, सांबरे, कडगाव या छोट्या खेड्यातील बाजारांतूनही काही लाखांचे आर्थिक चक्र फिरत असते. या उलाढालीवर कोरोनाचा इफेक्‍ट होत आहे. आठवडा बाजार बंदमुळे कर्नाटक-महाराष्ट्रातील असंख्य विक्रेते व्यवसायाविना घरी थांबून आहेत. त्यांचा व्यापारच कोलमडत आहे. आठवडा बाजारात हातावर पोट असलेले लोकही येतात. त्यांच्या गुजराणीचा प्रश्‍न तयार झाला आहे. तसेच बाजारांच्या माध्यमातून आठवडा, महिन्याची बेगमी करून ठेवणाऱ्या कुटूंबांना कडधान्ये व इतर साहित्य मिळवण्यात अडचणी येत आहेत. असे लोक आता दुकानांमधून किराणा माल नेत आहेत. 

तालुक्‍यातील हिटणी, हसूरचंपू या गावच्या यात्रा रद्द झाल्या आहेत. माद्याळ कसबा नूल आणि अरळगुंडीतील यात्रेबाबत निर्णय नसला तरी त्यांना यात्रा रद्द करावे लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या सर्व गावच्या यात्रांच्या माध्यमातून होणारी चार ते पाच कोटींची उलाढालही ठप्प झाली आहे. खेळणी आणि इतर वस्तूंच्या विक्रीसाठी लांबहून येणाऱ्या विक्रेत्यांनाही या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. बहुतांशी गावच्या यात्रा जानेवारी-फेब्रुवारीत पार पडल्याने काही अशी व्यवसाय या विक्रेत्यांचा झाला असला तरी भविष्यात होणाऱ्या यात्रेतील त्यांचा व्यवसाय बुडणार आहे. यामुळे गुंतवणूक केलेली रक्कमही निघते की नाही, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यांच्यावरही बेरोजगाराचे संकट कोसळले आहे. 

मोठ्या गर्दीचे हे कार्यक्रम रद्द झालेच आहेत, शिवाय आता बाजारपेठेतील दुकानांवरही संकट कोसळते की काय असे चित्र तयार झाले आहे. शासनाने अर्ध्या दिवसासाठी दुकाने बंदचा निर्णय घेतला आहे. मुळात गेल्या आठवडाभरापासून कोरोनाच्या भितीने लोकच बाजारपेठेत यायचे थांबले आहेत. यामुळे बाजारपेठेतील व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. या व्यापाऱ्यांचेही नुकसान मोठ्या प्रमाणात होणार असून नुकसानीचा हा आकडाही काही कोटीच्या आसपास राहणार आहे. एका कोरोना व्हायरसमुळे अगदी लहानशा घटकांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत सारेच घटक अडचणीत आल्याने तालुक्‍यातील अर्थचक्र गाळात रूतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अजून एकही कोरोना बाधीत अगर संशयीत रूग्णही जिल्ह्यात सापडलेला नाही. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाने हे पाऊल उचलले असले तरी त्याचा परिणाम सामान्य माणसांपासून बाजारपेठांवर होत असल्याने सारेच हवालदिल झाले आहेत. 

संकटाने घेरले शेतकऱ्यांना... 
अतिवृष्टी आणि महापुरात शेतकरी पुरता पिचला गेला. त्यानंतर अवकाळी पावसामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना रब्बी हंगाम साधता आला नाही. ऊस गळीत हंगाम झाला. त्यातूनही जेमतेम पैसा शेतकऱ्यांच्या हाती पडला. त्यानंतर शेतकरी भाजीपाला उत्पादनाद्वारे चार पैसे मिळतील का यासाठी धडपडत होता. त्यातच कोरोना संसर्गाच्या भितीने आठवडी बाजार बंद केले. यामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली आशाही संपुष्टात आल्याचे चित्र आहे. मुळात भाजीपाला नाशवंत असल्याने शेतकऱ्यांकडे असलेला भाजीपाला मिळेल त्या भावाने गावांमध्ये देण्याची वेळ आली आहे. 

लग्न समारंभातून होणारी उलाढाल ठप्प 
सध्या लग्न समारंभांचा काळ आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नाचे मुहूर्त असतात. आता सार्वजनिक कार्यक्रमांसह लग्न समारंभांनाही बंदी घातल्याने यानिमित्त बाजारपेठेत होणारी उलाढाल ठप्प झाली आहे. कापड, सोने आणि किराणा व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. या व्यावसायिकांना कामगारांचे पगारही अंगावर पडत असल्याचे सांगण्यात येते.

loading image