esakal | Gokul Election 2021 Update: राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलात चुरशीने ९९ टक्के मतदान

बोलून बातमी शोधा

null

Gokul Election 2021 Update: राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलात चुरशीने ९९ टक्के मतदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कागल (कोल्हापूर) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी कागल तालुक्यात मोठ्या चुरशीने मतदान झाले. सकाळी बारापर्यंत ९९ टक्के मतदान झाले होते. ३८३ मतदारापैकी ३८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी कागल तालुक्याचे मतदान केंद्र येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी आठ मतदान केंद्रावर हे मतदान घेण्यात आले. सकाळी माजी आमदार संजय बाबा घाटगे, गोकुळचे विद्यमान संचालक रणजीतसिंह पाटील, अंबरीशसिंह घाटगे, तसेच विरोधी आघाडीचे नवीद मुश्रीफ व वीरेंद्रसिंह मंडलिक यांनी मतदान केले. पावणे नऊ वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व खा. संजय मंडलिक यांनी मतदान केले.

सव्वानऊ वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व खा. संजय मंडलिक यांचेसह पिवळी टोपी, पिवळा स्कार्प व पिवळा मास्क घातलेले राजर्षी शाहू पॅनेलचे मतदार केंद्रावर हजर झाले. हे सर्व मतदार मतदान केंद्रावर मतदान करून बाहेर पडल्यानंतर 'आमचं गोकुळ चांगलं चाललयं' असे छापलेली पांढरी टोपी घातलेले सत्तारूढ गटाच्या मतदारांसह साडेदहाच्या सुमारास भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील, अमरीशसिंह घाटगे हजर झाले.

दरम्यान मतदान केंद्राला माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी भेट दिली.यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तसेच बारानंतर मतदान केंद्र ओस पडले होते. तालुक्यात पॅनल टू पॅनल किती मते मिळणार कुणाची सरशी होणार याची गणिते कार्यकर्ते मांडत होते. निवडणुकीसाठी क्षेत्रीय आधिकारी शिल्पा ठोकडे, केंद्राध्यक्ष एम. एस. कुंभार, अरुण कांबळे, दिपक गवंडी, माधव व्हरकट, विकास जाधव, अनिकेत माने, दिपक कुराडे, सुरेश जंगली व कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.

केंद्रनिहाय एकूण मतदान, झालेले मतदान व टक्केवारी पुढीलप्रमाणे असे-

केंद्र क्र.१- ५० पैकी ४९ (९९ टक्के)

केंद्र क्र. २- ५० पैकी ५० (१०० टक्के)

केंद्र क्र. ३- ५० पैकी ५० (१०० टक्के)

केंद्र क्र. ४- ५० पैकी ५० (१०० टक्के)

केंद्र क्र. ५- ५० पैकी ४९ ( ९९ टक्के)

केंद्र क्र. ५- ५० पैकी ४८ (१०० टक्के)

केंद्र क्र. ७- ४० पैकी ४० (१०० टक्के)

केंद्र क्र. ८- ४३ पैकी ४३ (१०० टक्के)..

Edited By- Archana Banage