Ladakh : लडाखमधील अपघातात कोल्हापूरच्या जवानाला वीरमरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident in Ladakh Trooper bus crashes into 50 feet deep river Basarge jawan killed Gadhinglaj

Ladakh : लडाखमधील अपघातात कोल्हापूरच्या जवानाला वीरमरण

गडहिंग्लज : लडाखमध्ये लष्करी जवानांना घेवून जाणारी बस ५० ते ६० फूट खोल नदीत कोसळून झालेल्या अपघातात बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील एका जवानाचा मृत्यू झाला. प्रशांत शिवाजी जाधव (वय २७) असे मृत जवानाचे नाव आहे. दरम्यान, खास विमामाने त्यांचा मृतदेह बेळगाव येथे येणार आहे. दुपारनंतर बसर्गे येथे अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात आले.

आज सकाळी सात वाजता लेह स्टेशनवरुन लष्करी जवानांना घेवून सियाचीनकडे बस जात होती. त्यावेळी लडाखमधील तुर्तुक भागातील श्योक नदीत ही बस घसरुन कोसळली. या बसमध्ये २२ जवान व चार अधिकारी होते. दुर्घटनेत त्यातील पाच जवान व दोन अधिकार्‍यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये बसर्गेतील प्रशांत जाधव यांचा समावेश आहे. आज दुपारी या दुर्घटनेची बातमी बसर्गेकरांपर्यंत पोहचली. त्यानंतर गावावर शोककळा पसरली आहे. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या कुटूंबांना या घटनेची माहिती दिली नव्हती. त्याचे वडील शिवाजी हे सुद्धा सैन्यात होते.

निवृत्तीनंतर ते सध्या शेती व्यवसाय सांभाळतात. वडीलांची प्रेरणा घेवून प्रशांत सैन्यात भरती होण्याच्या जिद्दीने तयारी केली. बारावीनंतर २०१४ मध्ये बेळगावमधील २२ मराठा लाईफ इन्फट्रीमध्ये भरती होवून आपले स्वप्न पूर्ण केले. प्रशांत सध्या लेह-लडाख परिसरात नाईक पदावर कार्यरत होते. जानेवारी २०२० मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांच्या मागे आई, वडील, तीन विवाहित बहिणी, पत्नी पद्मा व ११ महिन्याची नियती नावची मुलगी आहे. प्रशांत हे महिन्याभरासाठी सुट्टीवर गावी आले होते. सुट्टी संपवून पंधरा दिवसापूर्वी ते पुन्हा सेवेत हजर झाले होते. आज सकाळी ड्युटी बजावण्यासाठी नियुक्त ठिकाणी बसमधून जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातल्याच्या वृत्ताने शोककळा पसरली आहे.

सामाजिक कार्याची आवड

प्रशांत हे मनमिळावू होते. त्यामुळे त्यांचा गावात मित्रपरिवारही मोठा होता. ते नेहमी गावी आल्यानंतर सामाजिक कार्यात अग्रेसर असायचे. सुट्टीवर आल्यानंतर गावातील कार्यक्रमांमध्ये ते अग्रभागी असायचे. अनेक गरजूंना आर्थिक मदतीचा हातही त्यांनी दिल्याचे त्यांच्या मित्रपरिवारातून सांगण्यात आले. सामाजिक कार्यासाठी धडपडणार्‍या या तरुणावर अचानक ओढवलेल्या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Accident In Ladakh Trooper Bus Crashes Into 50 Feet Deep River Basarge Jawan Killed Gadhinglaj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top