esakal | लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यायची? वाचा डॉक्टरांचा सल्ला

बोलून बातमी शोधा

लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यायची? वाचा डॉक्टरांचा सल्ला
लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यायची? वाचा डॉक्टरांचा सल्ला
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे लसीकरणाचा फायदाही समोर येत आहे. त्यामुळे लसीकरणासही मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र गंभीर, एकापेक्षा अधिक आजार, तसेच ॲलर्जीचा त्रास होणाऱ्या व्यक्‍तींनी वैद्यकीय सल्ला आणि प्रमाणपत्राशिवाय लस घेण्याचे धाडस करू नये, असा सल्ला वैद्यकीय यंत्रणेने दिला आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर ३० दिवसांत मोठी प्रतिकारशक्‍ती तयार होते. त्यातूनही कोरोना झाला तर मृत्यू वा रुग्ण गंभीर होण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. त्यामुळे लस घ्या, नियम पाळा आणि बिनधास्त राहा, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे.

दोन्ही डोस घेतल्यावर...

 • कोरोनाचा धोका ९९ टक्‍के नाही

 • कोरोनामुळे मृत्यू होणार नाही

 • कोरोना झाला तरी तीव्र वेदना होणार नाहीत

 • बहुतांश रुग्ण हे घरीच उपचाराने बरे होतील

 • पहिल्या लसीनंतर दुसरी लस सहा ते आठ आठवड्यांनी घेतल्यास फायदा

हे अजिबात करू नका...

लस घेतल्यावर कमीत कमी ४५ दिवस मद्यपान आणि धूम्रपान थांबविणे आवश्‍यक आहे. मद्यपानाचा थेट प्रतिकारशक्‍तीशी संबंध आहे. मद्यपानाने प्रतिकार शक्‍तीस हानी पोचते. त्यामुळे मद्यपान टाळण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. लस घेतल्यावर शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही, याची खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे.

लस घेतल्यावर त्रास कोणाला..?

ज्या लोकांना मधुमेह, उच्च रक्‍तदाब आहे, एखादी लस घेतल्यावर ॲलर्जी होणाऱ्या व्यक्‍तींनी तज्ज्ञ डॉक्‍टरांशी चर्चा करूनच लस घेणे उपयुक्‍त ठरणार आहे. ॲलर्जीचा त्रास असणाऱ्यांना विविध प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. त्यानंतरच लस देण्याचा निर्णय घेतला जातो. एकपेक्षा अधिक आजार असणाऱ्यांनाही वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे.

पहिल्या लसनंतर...

पहिली लस घेतल्यावर १४ दिवसांनी त्याचे परिणाम दिसण्यास सुरवात होते. पहिली लस घेतल्यावर दुसरी लस सहा ते आठ आठवड्यांनी घेणे आवश्‍यक आहे. दुसऱ्या लसीला बूस्टर डोस म्हणतात. दोन्ही डोस घेऊन ३० दिवसांची प्रतीक्षा केल्यावर ९५ टक्‍क्‍यांपर्यंत प्रतिकारशक्‍ती वाढते. त्यामुळे कोरोनाचा धोका ९९ टक्‍के टळतो. त्यातूनही कोरोनाची लागण झाली तर मृत्यू वा प्रकृती गंभीर होण्याचीही अजिबात शक्‍यता नाही. घरात उपचार घेऊनही रुग्ण बरे होऊ शकतात, असा दावा संशोधक करीत आहेत.

लस घेण्यापूर्वी...

 • लस घेण्यापूर्वी किमान आठवडाभर अगोदर तरी

 • अतिरिक्‍त मद्यपान करू नये

 • लसीकरणाच्या भीतीने ताप किंवा अंगदुखीच्या गोळ्या खाऊ नयेत

 • मानसिक दडपण घेऊन लस घेऊ नये

लस घेतल्यावर...

 • दोन दिवसांत सर्व काही नॉर्मल होते

 • लसीकरणानंतर विश्रांती घ्यावी

 • उन्हाळा असल्याने भरपूर पाणी प्यावे

 • लस घेतल्यावर काही काळ ताप येणे, अंगदुखी शक्‍य

 • ॲलर्जीमुळे अंगावर पुरळ उठण्याची शक्‍यता

 • दंड दुखणे, इंजेक्‍शनची जागा लाल झाली तरी काळजी नाही

 • लस घेतल्यावर मोठा प्रवास, अवजड कामे काही दिवस टाळा