आंबेओहळ प्रकल्प आमच्यामुळेच! तीन राजकीय पक्षांचा दावा

आंबेओहळ प्रकल्प आमच्यामुळेच! तीन राजकीय पक्षांचा दावा

उत्तूर (कोल्हापूर): उत्तूर (ता. आजरा) परिसरातील तीन राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्याच पक्षाच्या पाठपुराव्यामुळे आंबेओहळ प्रकल्पात पाणी खळाळू लागले आहे, असे छातीठोकपणे सांगत श्रेय घेण्यावरून सोशल मीडियावर भिडत आहेत. आरदाळ - उत्तूर दरम्यान साकारलेल्या आंबेओहळ मध्यम पाटबंधारे प्रकल्पात पहिल्या पावसात ४२.८४ टक्के पाणी साठले. हा प्रकल्प आमच्याच पक्षाच्या प्रयत्नामुळे पूर्ण झाला आहे.(ambeohal-project-case-political-marathi-news)

आमच्यामुळेच या विभागात हरितक्रांती होणार आहे; हे सांगण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल मीडियावर भिडले आहेत. राष्ट्रवादीने एक पोस्ट टाकून यामध्ये आमच्या पक्षाच्या नेत्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला; मात्र प्रकल्पाचे काम थांबवण्याचा खटाटोप तुम्ही केला, काही धरणग्रस्तांना न्यायालयात जाण्यासाठी फूस लावली, असा आरोप केला. याला भाजपतर्फे उत्तर देण्यात आले.

धरणग्रस्तांना जमिनीचा योग्य मोबदला न देता पोकळ आश्‍वासने मिळाली. एवढंच काम या सरकारने केले, असा आरोप केला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या वादात उडी घेत या प्रकल्पाला १९९८ मध्ये शिवसेनेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचे स्मरण करून दिले. फडणवीस सरकारने २२७ कोटी दिले इथंपासून केंद्र शासनाच्या नद्याजोड प्रकल्पापर्यंत चर्चा झडत आहे. तिन्ही पक्षांच्या समर्थकांत आरोप-प्रत्यारोपासह शाब्दिक खडाजंगी सुरू झाली आहे. त्यामध्ये वर्तमानपत्रातील जुन्या बातम्या व व्हिडिओ क्‍लिपचाही आधार घेतला जात आहे.

जनता दल सध्या अलिप्त

तब्बल २५ वर्षे याच प्रकल्पावर राजकारण सुरू आहे. या विभागातील ग्रामपंचायत निवडणुकीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत या प्रकल्पाचा विषय चर्चेत राहिला. अनेक वर्षे येथील शेतकरी आंबेओहळच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मात्र पाण्याच्या जीवावर राजकारण करणारे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले पाहिजे यासाठी काय उपाययोजना करता येईल, यावर मात्र काहीच बोलत नाहीत. जनता दल मात्र या चर्चेपासून सध्या अलिप्त आहे.

कुपेकर यांच्या योगदानाबाबत एकमत

विधानसभेचे माजी अध्यक्ष (कै.) बाबासाहेब कुपेकर यांनी सुरवातीच्या काळात या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध केला. या प्रकल्पासाठी त्यांचे योगदान आहे, याबाबत मात्र तिन्ही पक्षांचे सोशल मीडियावर एकमत होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com