
गेल्या अनेक महिन्यांपासून कारखान्याचे राजकारण तापत आहे. सत्तारुढांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करुन 12 संचालकांनी राजीनामे दिले.
Political: 12 संचालकांचा राजीनामा,...अखेर गडहिंग्लज कारखान्यावर प्रशासक
गडहिंग्लज (कोल्हापूर) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज (Gadhinglaj)साखर कारखान्याची (गोडसाखर) सूत्रे (Sugar Factory) आता प्रशासक मंडळाकडे आले आहेत. प्रशासक मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय सहनिबंधक अरुण काकडे (Arun Kakade) यांच्यासह जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे व विशेष लेखापरीक्षक किरणसिंह पाटील यांनी आज पदभार स्वीकारुन कामकाजाला प्रारंभ केला.
गेल्या अनेक महिन्यांपासून कारखान्याचे राजकारण तापत आहे. सत्तारुढांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करुन 12 संचालकांनी राजीनामे दिले. त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना ऊत आला आहे. उर्वरित सहा संचालक अल्पमतात असल्याने कारखान्यावर प्रशासक का नेमू नये, अशी कारणे दाखवा नोटीस प्रादेशिक साखर सहसंचालकांनी देवून म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसाची मुदतही दिली होती. गुरुवारी (ता. 3) ही मुदत संपली. दरम्यान, सत्तारुढ संचालकांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. मात्र त्याचा विचार झाला नसल्याचे आजच्या प्रशासक मंडळ नियुक्तीवरुन स्पष्ट झाले आहे. कालच (गुरुवारी) प्रशासक मंडळ नियुक्तीचा आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक ए. व्ही. गाडे यांनी दिले. विशेष म्हणजे कारखाना संचालक मंडळाची मुदत गतवर्षी एप्रिलमध्येच संपुष्टात आली आहे. कोरोनामुळे निवडणुका पुढे गेल्याने अस्तित्वातील संचालक मंडळाकडेच कारभार होता.
हेही वाचा: 'मराठा डे' ला संभाजीराजेंची पोस्ट; मराठा सैनिकांचा दरारा अन् आदर...
दरम्यान, सूत्रे स्वीकारल्यानंतर काकडे म्हणाले, साखर सहसंचालकांच्या आदेशानुसार आज कारखान्याची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यानंतर कारखान्यातील विभागप्रमुखांची बैठक घेवून गळीत हंगामाचा आढावा घेतला. आज अखेर 63 हजार 930 मे. टन उसाचे गाळप झाले असून सरासरी 11.68 टक्के उतार्याने 69 हजार 900 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 2 लाख 65 हजार 468 लिटर स्पिरीटची निर्मिती झाली आहे. शिल्लक साखर विक्रीतून शेतकर्यांची बिले देणार आहे. विस्कळीत झालेली तोडणी-ओढणी यंत्रणेचे नियोजन करुन अधिकाधिक गाळप करण्याचा मानस आहे. 35 दिवसापासून कारखाना सुरळीत सुरु असून सरासरी गाळप सुरु झाले आहे.
Web Title: Appasaheb Nalawade Gadhinglaj Sugar Factory Conveyance Board Of Governors Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..