जनवाडच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; गावावर शोककळा

महेश घाटगे यांचे चंदीगडला निधन : गावावर शोककळा
जनवाडच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; गावावर शोककळा

निपाणी : जनवाड येथील सुपुत्र, भारतीय सैन्यदलात हवालदार म्हणून सेवा बजावत असलेल्या महेश महादेव घाटगे यांचे चंदीगड येथे सेवा बजावत असताना गुरुवारी (ता. १९) आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी (ता. २०) जनवाड (ता. चिक्कोडी) येथे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर चिक्कोडी तालुका प्रशासन व जनवाड ग्रामपंचायत वतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेश घाटगे हे २००४ साली सैन्य दलात दाखल झाले. हवालदार म्हणून ते गेल्या १६ वर्षांपासून सैन्यदलात सेवा बजावत होते. चंदीगड येथे सेवा बजावत असताना अल्पशा आजाराने त्यांचे लष्करी इस्पितळात निधन झाले. शुक्रवारी (ता. २०) सकाळी चंदीगड येथील विशेष विमानाने पुणे येथील आर्मी हेडक्वाटरमध्ये त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्या ठिकाणी बटालियनकडून मानवंदना दिल्यानंतर पुणे येथून जनवाड येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले. येथील प्राथमिक शाळेमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. गावातील मुख्य रस्त्यावरून फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी फुलांची उधळण, देशभक्तीपर गीते व वीर जवान अमर रहेचा जयघोष झाला.

जनवाडच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; गावावर शोककळा
मित्रानेच केला मित्राच्या मुलाचा घात ; 'त्या' बालकाचा खूनच

मराठा रेजिमेंट बेळगावचे जेलाविंग, राजपुताना रायफल व महार रेजिमेंटच्या नंबर वन डेमो पथकाने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर वीरपत्नी महादेवी घाटगे यांना आर्मी पथकाने तिरंगा देऊन त्यांना सलामी दिली. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी महादेवी, सात वर्षाचा मुलगा पृथ्वीराज असा परिवार आहे. जवानाच्या अंत्ययात्रेवेळी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

सुभेदार प्रमोद चव्हाण, हवालदार महिपाल सिंग, ग्रेनेडियार इम्रान खान, बाळकृष्ण कुंभार, रायफल नायक बसवराज, महसूल निरीक्षक आर. आय. नाईक, बसवप्रसाद जोल्ले , पोलिस उपनिरीक्षक रवींद्र अज्जनावर, ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, हालशुगरचे संचालक रामगोंडा पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य समीर चाउस, ग्रामतलाठी पी. बी. कलगे, ग्राम विकास अधिकारी शुभलक्ष्मी दाभोळ, ग्रामपंचायत उपाध्यक्षा छकुली कांबळे, सदस्य सनातन मगदूम, जोतिबा मोकाशी, उदयकुमार पाटील, महेंद्रकुमार मुधाळे, काशीबाई चौगुले, सुरेखा कोरे, धनश्री वंजारे, मल्लाव्वा पूजारी यांच्यासह गावातील विविध संघ, संस्थांचे पदाधिकारी, युवक मंडळ, महिला मंडळ, विद्यार्थी , पोलिस अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com