
कोल्हापूर - गेला महिनाभर ओढ दिलेल्या पावसाने आज झिम्माड सुरुवात केली. जोरदार पावसाने शेतकरी सुखावला असून, खोळंबलेल्या रोप लावणीला गती आली. माळरानातील पिकांनाही जीवदान मिळाले. जिल्ह्यातील काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
गगनबावड्यात मुसळधार
असळज : आज दिवसभर गगनबावडा तालुक्यास मुसळधार पावसाने झोडपले. सकाळी ११ ते दुपारी ४ या ५ तासांत झालेल्या पर्जन्यवृष्टीने कुंभी नदीवरील रेव्याचीवाडी, मांडूकली, अणदूर (जुना बंधारा) बंधारे पाण्याखाली गेले. असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या पर्जन्य मापकात सकाळी ९ पासून सायंकाळी ५.३० पर्यंत तब्बल १६५ मिमी. पावसाची नोंद झाली. करुळ, भुईबावडा घाट, मोरजाई पठार, गगनबावडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.
करूळ घाटात माती रस्त्यावर
गगनबावडा - गेले चार दिवस गगनबावडा परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. याचा फटका करूळ घाटाला बसला. कोल्हापूर तरळे महामार्गावरील करूळ घाटात गटारे मातीने भरल्याने पाणी रस्त्यावरून वाहत होते. अतिपावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. जेसीबीच्या सहाय्याने ढासळलेली माती बाजूला केली जात होती.
पन्हाळ्यावर संततधार
पन्हाळा - कालच्या ऊन पावसाच्या खेळानंतर आज सकाळपासून तालुक्यात संततधार सुरू झाली. सकाळी दाट धुक्यासह उगवलेला दिवस आज दिवसभर संततधार पावसात आणि धुक्याच्या दुलईतच राहिला. दिवसभर पावसाच्या सरीवर सरी कोसळल्या. सध्या पडणारा पाऊस मुरवणीचा असल्याने शेतात पाणी दिसत नव्हते; पण खरिपाची उगवण झालेल्या शेतात बळीराजाने कुळवट करून घेतल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडेफार हसू उमटले आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसाने सायंकाळी मात्र उसंत घेतली; पण धुक्याचे साम्राज्य कायम राहिले.
बर्की बंधारा पाण्याखाली
करंजफेण ः शाहूवाडी तालुक्यात जोरदार वाऱ्यासह धुवाँधार पावसाने परिसराला झोडपून काढले. नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली असून बर्की, पाल बंधारे पाण्याखाली गेले. मुसळधार पावसामुळे कासारीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. रोप लावणीस गती आली आहे. वादळी वाऱ्यामुळे कोल्हापूर - अनुस्कुरा मार्गावर झाडे कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महसूल विभागाने जेथे पुराचे पाणी येते तेथील लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. करंजफेण परिसरातील पूरस्थिती पाहता बोटीची व्यवस्था केली आहे.
चंदगडला पावसाचा जोर
चंदगड ः तालुक्यात सर्वत्र आज पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला. सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजे पर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत होता. गेले महिनाभर या विभागात पावसाळी वातावरण असले तरी पावसाला जोर नव्हता. अध्ये-मध्ये झीरमीर तर एखादी सळक येत असे. पूर्व भागात टोकणणी केलेल्या भाताला तर पश्चिम भागात तरव्यांना आणि रोप लावणीसाठी मोठ्या पावसाची गरज होती. आज सकाळपासून झालेल्या पावसाने ही गरज काही प्रमाणात भरून काढली. परंतु अजूनही शेतवडीत पाणी होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. दरम्यान, आजच्या पावसाने वातावरणात थंडावा होता. गार वारे आणि पावसाचा जोर यामुळे जनजीवनावर परिणाम झाला.
आंबेओहोळ प्रकल्पात ५२.७२ टक्के साठा
उत्तूर ः येथील आंबेओहळ मध्यम प्रकल्पात ५२.७२ टक्के साठा झाला आहे. गतवर्षी प्रकल्पात पाणी साठविण्यास सुरुवात झाली. ४ जून २०२१ पर्यंत ४६.८५ टक्के साठा होता. ३० जून २०२२ अखेर प्रकल्पात ६४१ दशलक्ष घनफूट ५१.७२ टक्के साठा शिल्लक होता. सध्या पाणीपातळी ६७९.९५ मीटर आहे. परिसरात १५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
राधानगरीत धुमाकूळ
राशिवडे बुद्रुक : आज सकाळपासून राधानगरी तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला. भात रोप लागणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याला यामुळे फायदा झाला आहे तर डोंगरमाथ्यावर पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. सकाळपासूनच पावसाचा जोर होता. टोकन केलेल्या व उगवलेल्या भाताच्या खाचरांमध्ये पाणी तुंबून बांध फुटले. डोंगर उतारावरील खोळंबलेल्या भात रोप लागणीला पावसाचा फायदा होणार आहे. तालुक्यातील धरणांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून नद्यांची ही पाणीपातळी वाढलेली आहे.
आजऱ्यात रिपरिप
आजरा ः आज दिवसभर तालुक्यात पावसाची रिपरिप होती. भात, नागली, भूईमुग उगवणीला पाऊस चांगला असल्याची शेतकरीवर्गातून सांगण्यात आले. आंबोली परिसरात जोरदार पाऊस सुरू असून आजऱ्याच्या पश्चिम भागात उसंत घेत पाऊस सुरू आहे. हिरण्यकेशी व चित्रा नदीला पाणी आले आहे. त्यामुळे रामतीर्थ धबधबा प्रवाहित झाला आहे. रोपलावण व अन्य कामासाठी मुसळधार पावसाची गरज आहे.
इचलकरंजीत सरीवर सरी
इचलकरंजी : जवळपास महिन्यानंतर पावसाने आज शहरात दमदार हजेरी लावली. दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. सकाळीच संततधार झाली. त्यानंतर उसंत घेतली नाही. दुपारी पावसाचा जोर वाढला. पावसामुळे ठिकठिकाणी छत्री असूनदेखील नागरिक पूर्णत: भिजून गेले. हातगाडे, पथविक्रेते मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर आधीच तयारीने सज्ज होते. त्यामुळे त्यांची आजच्या पावसाने फारशी धावपळ उडाली नाही.
कोगे बंधारा पाण्याखाली
कुडित्रे ः करवीर तालुक्याच्या पश्चिम परिसरात आज दिवसभर पावसाने हजेरी लावली. परिसरात भात, भुईमूग आणि सोयाबीनची पेरणी झाली असून पिके तरारून आली आहेत. पावसाअभावी पिके हातची जाण्याची भीती होती. भोगावती नदीवरील कुडित्रे-कोगे बंधारा पाण्याखाली गेला आहे. नवीन पूल झाल्याने वाहतूक सुरळीत आहे.
जिल्ह्यात आज सकाळी पावणेअकरापर्यंत संपलेल्या २४ तासांत पडलेल्या एकूण पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये ः हातकणंगले ०.८, शिरोळ २.७, पन्हाळा २.६, शाहूवाडी १२.६, राधानगरी २.५, गगनबावडा १३.९, करवीर ०.५, कागल १.५, गडहिंग्लज २.४, भुदरगड १५.४, आजरा ४.९, चंदगड - ६.
धरणांमधील साठा दलघमीमध्ये ः तुळशी ३८.८८, वारणा ३०७.९९, दूधगंगा १८७.२६, कासारी २७.१९ , कडवी २२.०६, कुंभी ३०.१८, पाटगाव ३७.५६, चिकोत्रा १९.३५, चित्री १७.०६, जंगमहट्टी १३.९९, घटप्रभा २५.९६, जांबरे ८.४८, आंबेआहोळ १८.५१, कोदे (ल.पा) १.९८.
सकाळी दहा वाजता बंधाऱ्यांची पातळी फुटांमध्ये ः राजाराम १५.०४, रुई ४३, इचलकरंजी ४०, तेरवाड ३७.०६, शिरोळ २७, नृसिंहवाडी २०.०६, राजापूर १०. सांगली जिल्ह्यातील ४.०६ फूट व अंकली ४.०५ फूट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.