esakal | निर्णयापूर्वीच कोल्हापुरात किराणा दुकाने बंद करण्याची घाई

बोलून बातमी शोधा

निर्णयापूर्वीच कोल्हापुरात किराणा दुकाने बंद करण्याची घाई
निर्णयापूर्वीच कोल्हापुरात किराणा दुकाने बंद करण्याची घाई
sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : सकाळी अकरापर्यंतच किराणा दुकाने बंद करण्याचा निर्णय अद्याप झालेला नसतानाही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज त्यांची अंमलबजावणी सुरू केल्यामुळे दुकानदारांकडून नाराजी व्यक्त झाली आहे. याबाबत काही दुकानदारांनी थेट अतिरिक्त आयुक्तांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केल्यानंतर असे आदेश आमच्याकडे नसल्याचेही त्यांनी मान्य केले.

संचारबंदीतही वाहनधारक रस्त्यांवर येत आहेत. किराणा दुकानदारांकडे आणि भाजीपाला विक्रेत्यांकडे गर्दी होत असल्यामुळे नवीन नियम तयार करण्याची प्रक्रिया मंत्रालयस्तरावर सुरू आहे. त्यामध्ये सकाळी अकरापर्यंतच किराणा दुकान सुरू ठेवण्यासाठी मुदत दिली जाण्याची शक्‍यता आहे. मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. तोपर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थेट दुकाने बंद करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. याबाबत किराणा दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली. काही दुकानदारांनी दुकाने बंद करणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे खरी कॉर्नर परिसरात वाद झाला.

काही दुकानदारांनी थेट तहसिल कार्यालय आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. धान्य लाईन मधील एका होलसेल आणि रिटेल व्यापाऱ्याने थेट अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांच्याशी संपर्क साधला. तुमच्याकडे कोणता नवीन आदेश आला असला तर पाठवा, असे सांगण्यात आले. यानंतर त्यांनी असा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे दुकाने बंद केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीतच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना निर्णयापूर्वीच कारवाईची घाई झाल्याची प्रतिक्रीया दुकानदारांनी दिली.