कोल्हापूर : बहुमजली पार्किंगमध्ये भक्त निवास

प्रस्‍ताव ठेवणार मंजुरीसाठी; दुसऱ्या टप्प्यातील २५ कोटींमध्ये होणार काम
multilayer parking
multilayer parkingSakal

कोल्हापूर - शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यातील दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. अंबाबाई मंदिर परिसरातच भक्त निवास व पार्किंगची सुविधा झाली तर भाविकांची मोठी सोय होणार आहे. त्यासाठी सरस्वती टॉकिजजवळ सुरू असलेल्या बहुमजली पार्किंगच्या चार मजली इमारतीमध्येच आणखी दोन मजले वाढवून भक्त निवास साकारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तसेच बिंदू चौक ते भवानी मंडप या मार्गावर पदपथ, शहरात दिशादर्शक फलक या कामांचाही समावेश केला जाणार आहे.

बऱ्याच वर्षांपासून चर्चेत असलेल्या व केवळ सादरीकरणातच अडकलेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामांना सुरूवात झाली आहे. त्यामध्ये फारशी अडचण नसणाऱ्या सरस्वती टॉकीजजवळील जागेत बहुमजली पार्किंगचे काम सुरू करण्यात आले. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग नसल्याने तसेच शहरात पार्किंगची मोठी समस्या असल्याने हा प्रस्ताव शासनास सादर केला होता. मंदिर परिसरात असलेल्या या जागेमुळे भाविकांना मंदिराजवळ येता येईल व वाहनांचीही अडचण होणार नाही याचा विचार करून नियोजन केले. यासाठी सरकारकडून पूर्ण निधी मिळाला नाही. पुढील टप्प्यात निधी येत राहील याचा विचार करून महापालिकेने टेंडर काढून काम सुरू केले. न्यायालयीन बाबीमुळे मध्यंतरी काम थांबले होते; पण आता न्यायालयाचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला आहे. व्हीनस कॉर्नर येथील भक्त निवासचे प्रयोजन संयुक्तिक नसल्याने तेथील भक्त निवासचे मजले सरस्वती टॉकीज येथील इमारतीमध्ये वाढवण्याचा विचार केला आहे. त्यामुळे पार्किंग व भक्त निवास अशा दोन्ही सुविधा एकाच ठिकाणी मिळतील.

ही इमारत चार मजली असून, व्हीनस कॉर्नर येथेही पार्किंग व भक्त निवास असे कामाचे नियोजन केले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यासाठी महापालिकेला कामांची यादी बनवण्यास सांगितले होते. त्यानुसार प्रशासनाने प्राधान्यक्रम ठरवून कामांचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर ठेवून मंजुरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर निधी उपलब्धतेसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे.

कामांना अडथळेच जास्त

बिंदू चौकानजीक उभारण्यात येणाऱ्या पार्किंगच्या इमारतीसाठी सबजेलचा अडथळा आला. त्यामुळे इमारत उभी न करता रस्ते पातळीवरच पार्किंग सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. व्हिनस कॉर्नर येथील गाडी अड्ड्यात पुराचे पाणी येत असल्याने भक्त निवासचे प्रयोजन तूर्त थांबवले. तिथे केवळ पार्किंग केले जाईल. मंदिराजवळील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद झाला. त्यामुळे ते काम थांबले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com