भीमा’ च्या आखाड्यात कोल्हापुरी पैलवानाविरोधात अनगरकर; पंढरपूरकरांचे शड्डू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

भीमा’ च्या आखाड्यात कोल्हापुरी पैलवानाविरोधात अनगरकर; पंढरपूरकरांचे शड्डू

सोलापूर : भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभावी ठरू पाहणारी मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक वेगळ्या निर्णयाक वळणावर पोचली असून, या निवडणूकीसंदर्भात राजकीय विश्‍लेषकांसह मुख्य पक्षातील काही नेते मंडळींनी व्यक्त केलेले अंदाज चुकीचे ठरले आहेत.

माजी आमदार राजन पाटील आणि सुपुत्र बाळराजे उर्फ विक्रांत पाटील अनगरकर यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर, भीमा परिवाराचे प्रमुख तथा भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांच्यामध्ये या कारखान्याच्या बिनविरोध निवडीसंदर्भात ‘सामंजस्याच्या तहाची’ एक्स्प्रेस धावेल. त्यातुन या कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल. या कारखान्यात मुळचे भाजपवासीय असलेल्या धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वासोबत पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि सध्या भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेले राजन पाटील यांचे नेतृत्व अर्थात धनंजय महाडिक आणि राजन पाटी अशी जोडगोळी या कारखान्यात दिसेल असे व्यक्त केले जात असलेले सगळे अडाखे चुकीचे ठरले आणि अखेर भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीचा महासंग्राम सुरु झाला आहे.

धनंजय महाडिक आणि राजन पाटील, प्रशांत परिचारक यांनी या कारखान्याच्या निवडणुकीसाठी ‘शड्डू’ ठोकत निवडणुकीच्या महासंग्रामात उडी घेतली आहे. कोल्हापूरचे महाडिक हे अनगरकर पाटील तसेच पंढरपूरकर प्रशांत परिचारक यांना आस्मान दाखवून या कारखान्यावर असलेले वर्चस्व पुन्हा सिध्द करणार का? याकडे केवळ मोहोळ तालुक्याचे नव्हे, तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.

महाराष्ट्राच्या ‘देवेंद्र’ यांनी घेतला कानोसा

कार्तिकी वारीच्या निमित्ताने, सोलापूर - पंढरपूर दौर्‍यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपाचे ‘देवेंद्र’ यांनी या दौर्‍यादरम्यान भीमा कारखान्याच्या निवडणूकीसंदर्भात त्यांनी कानोसा घेतला. तथापि, निवडणूक जिंकण्यासाठी महाडिक यांना कोणता कानमंत्र दिला, याचा तपशील कळू शकला नाही. मात्र या कारखान्याच्या निवडणूकीवर देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष असून त्यांच्याकडून निवडणूकीत ताकद दिली जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे या निवडणुकीवर लक्ष असल्याने या निवडणुकीला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.

‘फाईट टू फाईट’ सामन्यात स्टार प्रचारक कोण?

भीमा शेतकरी विकास आघाडीविरुध्द भीमा बचाव परिवर्तन आघाडी असा थेट ‘फाईट टू फाईट’ दूरंगी सामना भीमा कारखान्याच्या निवडणुकीसाठी लागला आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून कोणाला पाचारण केले जाणार याकडे लक्ष आहे. महाडिक गटाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेतेमंडळींची मोठी फौज या निवडणूकीच्या आखाड्यात येईल, असा अंदाज बांधला जातोय. तर दुसरीकडे, राजन पाटील गटाच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे त्यांचे राष्ट्रवादी पर्यायाने बारामतीकर पवारांशी अलिकडच्या काळात फारसे ‘सख्य’ राहिलेले नाही. त्यामुळे पवार परिवारातील कोणाला स्टार प्रचारक म्हणून आणण्याला त्यांना अडचणी आहेत. शिवाय या निवडणूकीसाठी राजन पाटील आणि परिचारक हे एकत्र येवून लढत देत असले तरी परिचारक हे भाजपात आहेत. त्यामुळे भीमा बचाव आघाडीसाठी स्टार प्रचारक म्हणून कोण आखाड्यात दिसणार? याची चर्चा आहे.

अवघे नऊ दिवस अन् दमछाक

या कारखान्याच्या निवडणुकीसाठी 13 नोव्हेंबरला असलेले मतदान लक्षात घेता, प्रचारासाठी अवघे नऊ दिवस मिळत आहेत. एवढ्या कमी कालावधीत कारखान्याच्या तब्बल 19 हजार 387 सभासद मतदारांपर्यंत पोचताना दोन्ही पॅनलवाल्यांची दमछाक होणार आहे. तगडी प्रचार यंत्रणा लावून मतदारांपर्यंत पोहचण्याचे मोठे आव्हान आहे.

उमेश पाटलांच्या धडाडणार्‍या तोफांचे काय?

राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांची या कारखान्याच्या निवडणुकीत काय भूमिका आहे? याचे प्रचंड मोठे औत्सुक्य आहे. या कारखान्याच्या महासंग्रामात उमेश पाटील यांच्या तोफा धडाडणार का? हा महत्वाचा मुद्दा आहे. या निवडणुकीसाठी राजन पाटील यांनी प्रशांत परिचारक यांच्याशी तह केला. राजन पाटील हे भाजपवाशी होण्याच्या तयारीत आहेत.

तर परिचारक हे मुळचेचे भाजपाच्या तंबुमधील आहेत. त्यामुळे या निवडणूकीत खास राष्ट्रवादीचा पॅनलच नाही. त्यामुळे उमेश पाटील यांचे कोणाच्या घोंगड्यावर प्रचाराचे किर्तन होणार? हा अधोरेखित मुद्दा आहे. शिवाय काही महिन्यांपूर्वी भीमाच्या निवडणुकीत शरद पवारांच्या विचारांचा खास पॅनल असे उमेश पाटील यांनी राजन पाटलांना आव्हान देताना सांगितले होते. पण तसा खास पॅनल तर नाही. मग उमेश पाटलांच्या धडाडणार्‍या तोफांचे काय? उमेश पाटील हे या निवडणूकीत अनगरकर पाटील यांना कसे ‘लक्ष्य’ करणार याबद्दलचे प्रचंड औत्सुक्य आहे. अनगरकर पाटील यांना ‘लक्ष्य’ करण्याची संधी उमेश पाटील सोडणार नाहीत असे मानले जात आहे.

-------- शिवाजी भोसले