‘सतेज’ खेळीने भाजपचा ‘करेक्ट’ कार्यक्रम

जिल्ह्यात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध ; विरोधकांच्या चारीमुंड्या चीत
सतेज पाटील
सतेज पाटीलsakal

कोल्हापूर - निवडणूक कोणतीही असो, त्यात स्वतः उमेदवार असो किंवा अन्य कोणी त्यासाठी झोकून देऊन काम करण्याची पद्धत, रात्रंदिवस त्यासाठी झटण्याची तयारी, प्रभावी संपर्क यंत्रणा, भक्कम आर्थिक ताकद, विरोधकांच्या गुप्त हालचालींवर बारीक लक्ष ठेवून त्यांचा डाव उधळून लावण्याची रणनीती आणि जोडीला असलेली सत्तेची चावी या जोरावर ‘उत्तर’च्या पोटनिवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील हेच ‘किंगमेकर’ ठरले. त्यांनी भाजपचा ‘करेक्ट’ कार्यक्रम केला आणि विरोधकांना चारीमुंड्या चीतही केले.

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी श्री. पाटील पहिल्यापासून प्रयत्नशील होते. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली; पण त्यात यश येत नाही, असे लक्षात येताच त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली होती. यात मोठा अडथळा होता, तो महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा. या मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनीही शड्डू ठोकल्याने श्री. पाटील यांची पंचाईत झाली होती; पण ज्याचा आमदार त्याला पोटनिवडणुकीची जागा यावर ते नुसते ठाम राहिले नाहीत, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पातळीवर क्षीरसागर यांचे मन वळविण्यातही यशस्वी झाले. नंतर श्री. क्षीरसागर यांना प्रचारात सक्रिय करण्याचे आव्हानही त्यांनी पूर्ण केले. या पहिल्या टप्प्यात त्यांनी बाजी जिंकली होती.

श्री. पाटील कोणतीही निवडणूक ‘सीरियस’ घेतात. एकदा मैदानात उतरल्यावर रात्रंदिवस झटायची तयारी असते. त्यामुळे ‘गोकुळ’ची तयारी त्यांनी वर्षभर अगोदरच सुरू केली होती. त्यातूनच सत्तारूढ गटातील दिग्गज संचालकांना त्यांनी आपल्याकडे वळविले. श्री. महाडिक यांची ‘ताकद’ म्हणजे ‘गोकुळ’ आहे, हे ओळखून त्यांनी नियोजन केले आणि त्यात यशस्वी झाले. जिल्हा बँकेत त्यांनी अशी तयारी केली की विरोधकांकडून अर्जच दाखल झाला नाही. विधान परिषद निवडणुकीचीही आघाडीच्या माध्यमातून त्यांनी जय्यत तयारी केली होती. या निवडणुकीत राज्याच्या पातळीवर भाजप-काँग्रेस मिटले, त्यातून त्यांची बिनविरोध निवड झाली; पण निवडणूक लागली असती तरी त्यांच्याकडील क्षमता, त्यांचे नियोजन पाहता निकालात फारसा फरक पडला नसता. आता ही निवडणूक अनपेक्षितपणे लागली. त्यातही त्यांनी स्वतःला झोकून दिले.

पोटनिवडणूक जाहीर झाली, त्या वेळी विधानसभेचे अधिवेशन सुरू होते. शेवटचे दोन-तीन दिवस ते अधिवेशनाला गेलेच नाहीत. त्यानंतर मात्र त्यांनी कोल्हापुरातच तळ ठोकला. प्रत्येक आघाडीवर त्यांनी पुढाकार घेत विरोधी भाजपच्या पर्यायाने महाडिक गटाच्या सगळ्या चाली लीलया परतवून लावल्या. काँग्रेससह राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षातील सर्वांची मोट बांधून ठेवण्याची कसरत योग्यरीत्या हाताळली. सामान्य कार्यकर्ता नाराज असल्याचे समजल्यावर त्यांनी त्याची नाराजी दूर करून दगाफटका होणार नाही, याचेही नियोजन केले होते. या जोडीला त्यांच्याकडे सत्ता होती. त्यात गृह राज्यमंत्रिपद असल्याने चार राज्यांच्या निवडणूक निकालावर आत्मविश्‍वास वाढलेल्या भाजपचा कोल्हापुरात त्यांनी भ्रमनिरास केला.

कॅबिनेट मंत्रिपदी बढतीही होऊ शकते...

२०१४ च्या विधानसभेत श्री. पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्वच उमेदवार पराभूत झाले होते. त्या वेळी काँग्रेस संपली, असे वाटत असतानाच त्यांनी २०१६ मध्ये विधान परिषदेवर विजय मिळविला. २०१९ मध्ये पुतण्यासह काँग्रेसचे चार आमदार विजयी केले. त्या वेळीच राज्याच्या राजकारणाचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते. ‘उत्तर’च्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या एकतर्फी विजयाने त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केल्याचे बोलले जाते. यामुळे त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी बढतीही होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com