इचलकरंजी, मुंबईनंतर कोल्हापुरात हनीट्रॅपचा पर्दाफाश; सहा जणांना अटक : Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

honey trap 4.jpg

एका मुलीने पंधरा दिवसापूर्वी शहरातील एका कापड व्यापाऱ्याच्या व्हॉटसवर चॅटींग करून मैत्री करण्याचा बहाणा केला.

इचलकरंजी, मुंबईनंतर कोल्हापुरात हनीट्रॅपचा पर्दाफाश

कोल्हापूर : इचलकरंजी, मुंबई (Ichlkarnji, Mumbai) पाठोपाठ कोल्हापुरातही (Kolhapur) हनीट्रॅपचा धकादायक प्रकार घडला. एका टोळीने शहरातील एका कापड व्यापाऱ्याला हेरून जाळ्यात अडकवले. या टोळीने त्यांच्याकडून अडीच लाखांची रक्कम उखळली आणि आणखी दहा लाख रूपयांचा तगादा लावला. बदनामीच्या भितीने संबधित कापड व्यापाऱ्याने किटकनाशक प्राशन केले. पण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सतर्कतेने हा प्रकार वेळीच उघडकीस आणला. याप्रकरणी एका महिलेसह आठ जणांवर गुन्हे दाखल करून सहा जणांना अटक केल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.

अटक केलेल्या संशयितांची नावे - सागर पांडुरंग माने (वय ३२, कात्यायनी कॉम्पलेक्स, कळंबा), सोहेल ऊर्फ अरबाज मुनाफ वाटंगी (२३, रा. जुना वाशीनाका), उमेश श्रीमंत साळुंखे (२३, रा. राजारामपुरी), आकाश मारूती माळी (३०, रा. यादवनगर), लुकमान शकील सोलापुरे (२७, रा. जवाहरनगर), सौरभ गणेश चांदणे (२३, रा. यादवनगर) अशी आहेत.

इचलकरंजी, मुंबईनंतर कोल्हापुरात हनीट्रॅपचा पर्दाफाश

इचलकरंजी, मुंबईनंतर कोल्हापुरात हनीट्रॅपचा पर्दाफाश

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,

एका मुलीने पंधरा दिवसापूर्वी शहरातील एका कापड व्यापाऱ्याच्या व्हॉटसवर चॅटींग करून मैत्री करण्याचा बहाणा केला. त्याचा विश्वास संपादन केला. त्या व्यापाऱ्याला भेटण्यासाठी ती त्याच्या फ्लॅटवर गेली. त्याचबरोबर तिचे साथिदार त्या फ्लॅमध्ये गेले. त्यानी व्यापाऱ्यास ‘तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर त्याला त्याच्याच मोटारीत घालून पन्हाळा रोडवरील केर्ली परिसरातील निर्जनस्थळी नेले. येथे त्यांना मारहाण करून डोक्यात दगड मारला. त्यांच्या गाडीतील दीड लाखांची रोकडसह तीन कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी करून घेतल्या. त्यानंतर त्यांना गाडीत घालून बागल चौक परिसरातील एका फायनान्स कंपनीत अंगावरील सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यास सांगून एक लाख रूपये घेतले. यानंतरही संबधित टोळी त्यांना वारंवार फोन करून आणखी दहा लाख रूपयांची मागणी करत होती. अशी फिर्याद संबधित व्यापाऱ्याने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा दिली.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला. त्यासाठी स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले. सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील संशयित सागर माने व त्याच्या साथिदाराने केला आहे. ते संभाजीनगर एसटी स्टॅन्ड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली. पथकाने येथे सापळा लावून संशयित सागर माने, सोहेल वाटंगी, ऊमेश साळुंखे, आकाश माळी, लुकमान सोलापुरे, सौरभ चांदणे या सहा जणांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला जांबीयासारखे शस्त्र, मोबाईलसंच, मोपेड असा ८१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चौकशीत संशयितांनी हा गुन्हा रेकॉर्डवरील संशयित विजय गौड आणि एका महिलेने मिळून केल्याची कबुली दिली. संशयितांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलिस अमंलदार विजय कारंडे, किरण गावडे, कुमार पोतदार, रवींद्र कांबळे, प्रदीप पोवार, संजय पडवळ, पांडुरंग पाटील, अनिल पास्ते, महिला पोलिस अमंलदार सुप्रिया कात्रट यांनी केली.

संशयितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. तक्रारदारांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे. त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.

प्रमोद जाधव (पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा)

loading image
go to top