
Kolhapur News : केवळ २५ मिनिटांत पूर्ण करा फेरी
कोल्हापूर : रस्त्यावर वाहतुकीची कोंडी, ठिकठिकाणी झालेले सिग्नल, प्रवाशांचे चढ-उतारचे वाढलेले प्रमाण अशा अडचणींची भर पडलेली असताना केएमटी बसच्या फेरीच्या वेळा अजूनही जुन्या जमान्यातीलच आहेत.
जुन्या वेळेची फेररचनाच झाली नसल्याने जवळपास १३ विविध मार्गांची फेरी केवळ ३० मिनिटांत पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. ते पूर्ण करण्यासाठी चालकांना बस वेगाने पळवण्याशिवाय पर्यायच राहिलेला नसून अपघाताच्या भीतीबरोबर बसचे नुकसानही होत आहे.
शहराची बससेवा म्हणून मिरवणाऱ्या केएमटीला नागरिकांच्या सोयीसाठी अशा रस्त्यावरूनच प्राधान्याने बस सोडावी लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, महापालिका, पानलाईन, लुगडी ओळ, राजाराम रोड, शिवाजी रोड, न्यू महाद्वार रोड, मंगळवार पेठ मुख्य रस्ता, शाहूपुरी, पाडळकर मार्केट ते रंकाळा टॉवर अशा काही वर्दळीच्या रस्त्यावरून बस जातात.
या मार्गावरून चालक सकाळी व सायंकाळी बस कशा चालवत असतील याचा विचार प्रवासी करतात. यातील अनेक रस्त्यांवर दुतर्फा वाहनांचे पार्किंग, शाळेची मुले, व्यावसायिकांची गर्दी असते; पण तिथून जाणाऱ्या बहुतांश बसची एक फेरी किमान २० ते ३० मिनिटाच्या आतच पूर्ण व्हायला हवी, असे वेळापत्रक आहे.
हे वेळापत्रक पूर्वी शहरात वाहतुकीची कोंडी वा वाहने कमी असतानाचे आहे. त्यात बदल केलेला नाही. अनेक फेऱ्या या गर्दीच्या रस्त्यावरून तसेच लांब अंतराच्या आहेत. त्यामुळे गर्दीत जाणारा वेळ भरून काढण्यासाठी चालकांना रस्ता मोकळा मिळाल्यानंतर सुसाट जाण्याशिवाय पर्याय रहात नाही. त्यातून मग ते खड्डे, स्पीडब्रेकर काहीच बघत नसल्याचे दिसून येते. यामुळे अपघात होण्याचा धोका आहेच, त्यातून तज्ज्ञ संस्थेकडून वेळापत्रक बनवून घेण्याचा विचार केला होता. अजून तरी त्याबाबत काही झालेले नाही.
चालक वैतागतात
सकाळी वा सायंकाळी शहरातील बहुतांश मार्गावर वाहतूक कोंडी असते. त्यातच प्रवाशांचे चढ-उताराचे प्रमाण जास्त आहे. यामुळे चालक बस चालवताना वैतागतो. वेळेत फेरी पूर्ण झाली नाही तर पाठोपाठ बस येण्याचे प्रकार होतात. त्यातून प्रवासी संतापतात. दुसरीकडे वरिष्ठ जाब विचारतात. या कारणांनीच अनेक रोजंदारी चालक कामावर येण्याचेच टाळतात.
काही फेऱ्यांच्या वेळा तत्काळ वाढवून देण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही केली जाईल. त्यानंतर सर्वच फेऱ्यांच्या वेळापत्रकाची फेररचना केली जाईल.
-टीना गवळी, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक, केएमटी