Kolhapur : संविधान दिन विशेष; संविधान अभ्यासक्रमाला वाढता प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संविधान दिन विशेष; संविधान अभ्यासक्रमाला वाढता प्रतिसाद

संविधान दिन विशेष; संविधान अभ्यासक्रमाला वाढता प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास विकास केंद्रामार्फत दोन वर्षापूर्वी सुरू झालेल्या ‘सर्टिफिकेट कोर्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन'' या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रतिसाद वाढत आहे. यंदा तिसऱ्या बॅचसाठी प्रवेश सुरू झाले असून तीस नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करता येणार आहेत.

सहा महिने कालावधीचा हा अभ्यासक्रम असून दहावी उत्तीर्ण व्यक्तीला प्रवेश घेता येतो. संविधानाची मूलभूत ओळख व अभ्यास करता यावा, या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू झाला. पहिल्या वर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू होताच काही दिवसातच प्रवेश संपले. गेल्या वर्षी कोरोनामुळे कमी प्रतिसाद मिळाला. मात्र, यंदा या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पहिल्या पन्नास जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे. भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भविष्यातील महत्त्‍व, भारतीय संसदीय लोकशाही, संविधानातील विशेष तरतुदी अशा चार प्रमुख विषयांवर आधारित हा अभ्यासक्रम आहे.

केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी माहिती देताना सांगितले, ‘‘दोन वर्षापूर्वी सुरू झालेल्या अभ्यासक्रमाला यंदाही चांगला प्रतिसाद आहे. याशिवाय ‘पी.जी.डिप्लोमा इन डॉ. बी. आर. आंबेडकर थॉट’ हा अभ्यासक्रमही शिकवला जातो. त्याचा कालावधी एक वर्षे असून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. त्याचीही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.’’

संविधान दिन का?

संविधान सभेने घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अंतिम मसुदा स्वीकारला. त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या संविधान दिनानिमित्तही शहर आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

loading image
go to top