esakal | "गोकुळ' च्या शाहुवाडी तालुक्‍यातील एका ठरावदारांचा कोरोनाने मृत्यु; जिल्ह्यात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

covid19

'गोकुळ' च्या शाहुवाडी तालुक्‍यातील एका ठरावदारांचा कोरोनाने मृत्यु; जिल्ह्यात खळबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यातील नेत्यांसह काही जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच आज "गोकुळ' च्या शाहुवाडी तालुक्‍यातील एका ठरावदारांचा कोरोनामुळे शहरातील एका खासगी रूग्णालयात मृत्यु झाला. या घटनेने संबंधित तालुक्‍यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून हे ठरावदार एका बॅंकेत शाखाधिकारी होते, त्या शाखेतील त्यांच्या संपर्कातील आठ जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

"गोकुळ' ची निवडणूक ऐन रंगात आली आहे. मंगळवारी (ता. 20) अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असून त्याच दिवशी या निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी पाठिंबा मिळावा म्हणून आयोजित केलेल्या दक्षिणेतील एका तालुक्‍यातील मेळाव्यानंतर संबंधित मेळाव्याच्या आयोजक नेत्यांसह उपस्थित आठ-दहा जणांना कोरोनाची लागण झाली. यात एका माजी जिल्हा परिषद सदस्यांचाही समावेश आहे. ही घटना ताजी असतानाच आज शाहुवाडी तालुक्‍यातील एका 54 वर्षीय ठरावधारकांचाच कोरोनामुळे मृत्यु झाला.

संबंधित ठरावदार एका बॅंकेत शाखाधिकारी आहेत. या शाखेतील त्यांच्या संपर्कात आलेल्या आठ जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या शाखेचे कामकाज सद्या ठप्प आहे. "गोकुळ' च्या प्रचारार्थ उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या वाहनांचे जथ्थेच्या जथ्थे ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर धावत आहेत. संचारबंदीमुळे सद्या ठरावधारकांना सहलीवर पाठवता येत नाही, त्यामुळे बहुंताशी ठरावदार हे त्यांच्या मूळ गांवी आहे. त्यांना भेटण्याच्या निमित्ताने रोज उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी ठरावधारकांच्या घरी आहे. त्यातूनच कोरोनाची लागण अनेक जणांना झाल्याचे बोलले जाते. आज कोरोनामुळे मृत्यु झालेल्या ठरावधारकांनाही अशा संपर्कातून लागण झाल्याचे समजते.

Edited By- Archana Banage

"गोकुळ' चे अनेक ठरावदार हे वयस्कर आहेत, त्यामुळे त्यांना कोण कितीवेळ भेटतो याची काही गणती नाही. बाहेरून येणारा कोरोना संक्रमित आहे का नाही याची तपासणी करणारी यंत्रणा नसल्याने अशा लोकांकडून कोरोनाचे संक्रमण होत असल्याची चर्चा आहे. प्रचारातून होणारा हा संसर्ग थांबवणे मोठे आव्हान असणार आहे.