esakal | देवा, मम्मी पप्पांना कुठे शोधू! दोन चिमुकल्यांची केविलवाणी साद

बोलून बातमी शोधा

देवा, मम्मी पप्पांना कुठे शोधू! दोन चिमुकल्यांची केविलवाणी  साद
देवा, मम्मी पप्पांना कुठे शोधू! दोन चिमुकल्यांची केविलवाणी साद
sakal_logo
By
अमर पाटील

बांबवडे (कोल्हापूर) : देवा मम्मी पप्पांना शोधू कुठं... अशी दोन चिमुकली केविलवाणी साद घालत आहेत. काल शाहूवाडी तालुक्‍यातील एका गावात पुण्याहून आलेल्या दांपत्याचा कोरोमुळे मृत्यू झाल्याने ही दोन मुले अनाथ झाली. 13 एप्रिलला संबंधित दांपत्य गावाकडे आले. पती-पत्नी दोघेही पुण्यातील एका कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होते.

कोरोना संसर्गामुळे कंपनीचे काम बंद ठेवल्याने पाडव्याला गावी जाऊन सण साजरा करावा या हेतूने ते गावी आले. चार दिवसांनी त्यांना व पत्नीस ताप आला. कोरोना चाचणीते दोघेही पॉझिटिव्ह आले. ते तत्काळ कोल्हापूरला दवाखान्यात दाखल झाले. दरम्यान पत्नीचा 28 एप्रिलला मृत्यू झाला. पाठोपाठ आज पतीचाही मृत्यू झाला. दांपत्याने दोन्ही मुलांना दवाखान्यातून लगेच परत येतो सांगितले होते. "बाळाची काळजी घे, त्याला एकट्याला सोडू नको, आम्ही दवाखान्यातून लगेच आलो' असे आईने मुलीला सांगितले होते. मात्र वाटेकडे डोळे लावून बसलेल्या चिमुकल्यांचे आई-वडील इहलोकीच्या यात्रेला निघून गेले.

पत्नीच्या मृत्यूचा धक्का

पत्नीच्या मृत्यूची बातमी नातेवाइकांनी सांगितली नव्हती; पण त्याच रात्री मित्रांच्या व्हॉट्‌स ऍप ग्रुपवर आमचे मित्र .... यांच्या सौभाग्यवतीचा मृत्यू झाला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली' असा मेसेज टाकला आणि तो त्यांच्या वाचनात आला. पत्नीच्या मृत्यूचा धक्का बसल्याने त्यांची तब्येत खालावत गेली. काही काळातच पत्नीच्या विरहाने त्यांचाही मृत्यू झाला.

Edited By- Archana Banage