esakal | घरीच मिळवा आता ऑक्‍सिजन; लावा ही झाडे

बोलून बातमी शोधा

null

घरीच मिळवा आता ऑक्‍सिजन; लावा ही झाडे

sakal_logo
By
सुयोग घाटगे

कोल्हापूर : कोरोनाने ऑक्‍सिजनचे महत्त्व जाणवून दिले आहे. नियमित, कोणत्याही त्रासाविना, फुकट मिळणाऱ्या ऑक्‍सिजनसाठी आटापिटा करावा लागत आहे. स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी आवश्‍यक असलेली शुद्ध हवेची गरज घरात, परिसरात थोडे काम केले की भागवता येऊ शकते. घरच्या घरी शुद्ध हवा मिळवण्यासाठी बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये, बाल्कनीत ऑक्‍सिजन देणारी झाडे ठेवता येऊ शकतात. ती आपल्याला स्वच्छ हवेची सेवा देताना आपल्या घराचीही शोभा वाढवतील, यात दुमत नाही.

स्पायडर प्लांट

घरात उजेडाच्या ठिकाणी ठेवले जाणारे हे झाड कमी पाण्यावर जगते. थेट सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घेतल्यास आपल्या लिव्हिंग रूमची शोभा वाढवेलच. तसेच वातावरणातील कार्बन मोनॉक्‍साइडची तीव्रता कमी करून ऑक्‍सिजन उत्सर्ग वाढवते.

इंग्लिश आयव्ही

या झाडाचा उपयोग विशषेतः घर सुशोभीकरणासाठी होतो. ते आपले घर आकर्षक बनवतेच आणि हवेतील हानिकारक रसायने आणि धूळ कण काढून टाकण्याचे काम ही वनस्पती आश्‍चर्यकारकपणे करते. वेलवर्गीय असल्यामुळे आपल्या इच्छेनुसार आकार देऊ शकतो.

फर्न

पाळीव प्राणी असलेल्या घरात ही वनस्पती अधिक लाभदायक आहे. हवेतील फॉर्मलडिहाइड काढून टाकण्याचे महत्त्वाचे काम करते. घरांमधील लहान धूळ कण काढून टाकू शकते आणि हवा शुद्ध करू शकते. ती सर्वांसाठी आरोग्यदायी ठरते.

बेबी रबर प्लांट

हवेतील विषाणूंची तीव्रता कमी करून वातावरण नियंत्रित करणारी ही वनस्पती आहे. बेडरूममध्ये हवा शुद्ध करण्यासाठी ही वनस्पती असणे अधिक गरजेचे आहे. ती भरपूर प्रमाणात ऑक्‍सिजन उत्सर्जित करते. हवेतील रसायने काढून टाकण्यास देखील ती प्रभावी आहे.

चायनिस एव्हरग्रीन

केमिकलमुळे तयार होणारे विषाणू हटवण्यास सर्वाधिक सक्षम अशी ही वनस्पती आहे. हवेच्या शुद्धीकरणाबरोबरच सुंदर दिसणारी वनस्पती घरामध्ये प्रकाशाच्या ठिकाणी ठेवता येते. ती वनस्पती १०० मीटरचा परिसर स्वच्छ करते. घरात पाळीव प्राणी असल्यास ही वनस्पती घेणे टाळा.

जर्बेरा डेझी

ट्रायक्‍लोरोइथिलीन, बेंझिन सारख्या हानिकारक तत्त्वांना हटवण्याची ताकद असणारी ही सुंदर वनस्पती आहे. या वनस्पतीची लाल फुले घराची शोभा आणखी वाढवतात.

पीस लिली

घरातील बुरशीजन्य बीजांसह, अनेक घरगुती रसायने प्रभावीपणे काढून टाकण्यास सक्षम अशी ही वनस्पती आहे. ती बाथरूम, कपडे धुण्यासाठीची खोली किंवा स्वयंपाकघरात ठेवू शकता, जेणेकरून हवेतील अतिरिक्त ओलावा काढून टाकू शकतील आणि अशा भागात मूस आणि बुरशी होण्यापासून टाळता येते.

स्नेक प्लांट

टॉयलेट क्‍लिनर, टिश्‍यू, टॉयलेट पेपरद्वारे आपल्या घरात प्रवेश करणारा फॉर्मलॅडिहाइड स्वच्छ करण्यासाठी आपण ही वनस्पती घेऊ शकता. ही वनस्पती बाथरूममध्ये ठेवण्यास अधिक प्राधान्य दिले जाते.

बांबू पाम

घरातील सर्वोत्तम वनस्पती म्हणून बांबू पाम सर्वाधिक फायद्याचा आहे. अनेक घरांमध्ये तो शोभा वाढवतही आहे. सुंदर दिसण्याबरोबरच घरामधील हवा शुद्ध करण्यास मदतगार आहेत. ती हवेतील फॉर्मलडिहाइड आणि बेंझिन काढून टाकते आणि प्रत्येक श्वास सुखदायक बनवते.

कोरफड

आयुर्वेदिक महत्त्व असणारी ही वनस्पती सर्वपरिचित आहे. घरातील हवा स्वच्छ करू शकणारी ही वनस्पती घरातील हवेमध्ये फॉर्मलडिहाइड असेल, तर ते काढून टाकण्यासाठी सर्वाधिक मदतगार आहे. तसेच फर्निचरमध्ये असलेले केमिकल, डिटर्जंट नष्ट करून हवा शुद्ध करते.

लॅव्हेंडर

बेडरूममध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये वापरता येणाऱ्या या वनस्पतीची फुले सुगंधाने प्रफुल्लित करतात. लॅव्हेंडर वनस्पतीची कुंडी, तेजस्वी आणि थेट सूर्यप्रकाशाखाली ठेवा. याच फुलांच्या वासामुळे फुफ्फुसाचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते.

ब्रोमेलीएड

घरामधील हवेतील प्रदूषक, धूळ कण आणि रसायने काढून टाकण्याचे काम करणारी ही वनस्पती आहे. एका अभ्यासानुसार ब्रोमेलीएड्‌स, बेंझिन आणि एसीटोनसह सहा प्रकारचे वायू प्रदूषक हवेतून काढून टाकू शकते. ब्रोमेलीएड्‌स १२ तासांच्या आत आपल्या खोल्यांमधून सुमारे ८०% प्रदूषक काढून टाकू शकते.

तुळस

प्रत्येकाच्या अंगणातील तुळस सर्वात प्रभावी आहे. हवेतील कार्बनचे प्रमाण कमी करून ऑक्‍सिजनचे प्रमाण वाढवण्यास अधिक सक्षम अशी ही वनस्पती आहे. तुळशीच्या पानाच्या सेवनाने रक्ताभिसरण प्रक्रिया देखील अधिक सुलभ होते.

Edited By- Archana Banage