कोविड केअर सेंटरवर आता ‘आरोग्य’ चा वॉच

covid center
covid centeresakal

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यात वाढत असलेले कोरोनाचे रुग्‍ण,(covid patients)तसेच मोठ्या प्रमाणात होत असलेले मृत्‍यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाने (Health Department) कोरोना उपचारासाठी दिलेल्या प्रोटोकॉलची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्व कोविड केअर सेंटरमध्ये दाखल कोरोनाच्या रुग्‍णांवर कशा पद्ध‍तीने उपचार करावेत?, कोणती औषधे कधी द्यावीत?, कोणती औषधे देणे टाळावे?, गृह विलगीकरणात असलेल्या रुग्‍णांबाबत काय निर्णय घ्यावा?, याबाबत सूचना जिल्‍हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत. आता त्यापुढेही खासगी रुग्‍णालयात कोरोनाचे उपचार सुरू आहेत, तिथेही अशाच पद्धतीने प्रोटोकॉलचे पालन होते की नाही?, याचीही चौकशी करण्याची मागणी लोकप्रतिनिधींतून होत आहे.(covid-care-center-watch-in-health-department-kolhapur-news)

जिल्‍ह्यातील कोरोना बाधितांची संख्‍या सव्‍वा लाखापर्यंत पोहोचली आहे. मेमध्ये ५० हजार रुग्‍ण सापडले आहेत. याच महिन्यात मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक आहे. मृत्युदर वाढण्याची कारणे आरोग्य विभागाकडून शोधली जात आहेत. रुग्‍णांवर जे उपचार केले जातात, त्यामध्येच काही कमतरता राहत असल्याचे आढळू्न येत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत व दुसऱ्या लाटेत उपचार पद्ध‍तीत अनेक बदल झाले आहेत. मात्र, हे बदल उपचार करणाऱ्या रुग्‍णालयापर्यंत पोहोचले का?, कोविड सेंटरपर्यंत गेले का? जर गेले असतील तर त्या पद्धतीने उपचार होतात का? आणि होत असतील तर मग मृत्‍युदर का वाढतो आहे?, असे अनेक प्रश्‍‍न निर्माण झाले आहेत. कोरोना प्रोटोकॉलचे पालन होत असलेबाबत आरोग्य विभाग काही प्रमाणात साशंक आहे. त्यामुळेच त्यांनी उपचारातील प्रोटोकॉलवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.

जो कोरोनाग्रस्‍त दाखल झाला आहे, त्‍याला रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शनची गरज आहे का, ते इंजेक्‍शन एम. डी. फिजिशियनच्या उपस्‍थितीत दिले जाते का? स्टिरॉईडचा वापर कितपत केला जातो, त्याचा अतिरिक्‍त वापर झाला, तर म्युकरमायकोसिसचा धोका वाढतो हे ओळखू्न उपचार केले जातात का?, याचीही पाहणी होणार आहे. सध्या रुग्‍णांना ऑक्सि‍जन द्यावा लागत आहे, तो ऑक्सिजन गरजेएवढा दिला जातो, की जादा दिला जातो, याची माहितीही घेतली जाणार आहे. एखादे औषध दिल्यानंतर त्‍यासोबत कोणती औषधे देऊ नयेत, याबाबतच्या सूचना प्रोटोकॉलमध्ये आहेत. मात्र, प्रोटोकॉलनुसार उपचार होतो किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्‍त केली आहे. पुढील उपचारात अडचणी येऊ नयेत, यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्‍न सुरू आहेत.

या गोष्टींची होणार पडताळणी..

रेमडेसिव्हिर द्यायची गरज आहे का?

इंजेक्‍शन एम.डी.च्या उपस्‍थितीत दिले जाते का?

प्रतिजैविके किती प्रमाणात दिली जातात

ऑक्सिजन गरजेप्रमाणे दिला जातो का?

स्‍टेरॉइडस्‌चा रुग्‍णांवर होणारा वापर

कोरोना उपचाराबाबत प्रोटोकॉल ठरवून दिला आहे. मात्र, त्यापलीकडे जाऊन उपचार सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. सर्व कोविड सेंटरना प्रोटोकॉलची माहिती पाठवली आहे. कोणती औषधे कधी वापरावीत?, कोणती वापरू नयेत?, औषधे देताना काय खबरदारी घ्यावी, याच्या सूचना दिल्या आहेत. याचे पालन होते किंवा नाही, याचीही पाहणी केली जाईल.

- डॉ. उषादेवी कुंभार, प्र. जिल्‍हा आरोग्य अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com