esakal | लस घ्या बिनधास्त! 40 वर्षाच्या वरील सर्वाना लसीकरण गरजेचे

बोलून बातमी शोधा

लस घ्या बिनधास्त! 40 वर्षाच्या वरील सर्वाना लसीकरण गरजेचे
लस घ्या बिनधास्त! 40 वर्षाच्या वरील सर्वाना लसीकरण गरजेचे
sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे; मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या लोकांपैकी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहेत. जिल्ह्यात सात लाख लोकांनी लस घेतली. त्यापैकी अवघ्या ५५ जणांनाच कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण केवळ ०.०१ इतके आहे.

लस घेतलेल्या लोकांना कोरोना झाला असला तरी त्यांना फारसा त्रास झालेला नाही. अगदी सौम्य लक्षणे असून, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे लस घेऊन कोरोना झालेले बहुतांश लोक ४५ वर्षांपुढील आहेत. लसीकरणाचा फायदा होत असल्याने लवकरात लवकर १०० टक्‍के लसीकरण पूर्ण व्हावे, यासाठी आरोग्य विभागाची धडपड सुरू आहे.

जिल्ह्यात दररोज ३६ ते ४० हजार लोकांना लस दिली जात आहे. सुरवातीला लस घेण्यासाठी लोक फारसे उत्सुक नव्हते; मात्र रुग्ण वाढतील, तसे लस घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. लस घेतलेल्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता फारच कमी असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. लस घेतल्यानंतर बाधित रुग्णांना कोणत्याही अत्यावश्‍यक सेवेची गरज भासलेली नाही. त्यामुळेच लस घेतलेल्यांनी फारशी भीती बाळगण्याची गरज नाही; मात्र प्रतिबंधात्मक उपायांची कडक अंमलबजावणी करावी लागणार आहे.

दृष्टिक्षेपात

कोणतीही तीव्र लक्षणे नाहीत

ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरची गरज भासली नाही

मृत्यूचा धोका फार कमी

डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार

हेही वाचा- Remdesivir चोरुन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कोल्हापूर-सोलापूरच्या दोघांना अटक

जिल्ह्यात ४० वर्षांवरील सुमारे १५ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जवळपास सात लाख लोकांनी लस घेतली आहे. त्या तुलनेत लस घेतलेल्या लोकांना कोरोना होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. लस घेतलेल्या लोकांची प्रतिकारशक्‍ती वाढली असल्याने कोरोना झाला तरी त्याचा फारसा त्रास होत नाही. त्यामुळेच कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी ४० वयावरील सर्वांनी लसीकरण करून घेणे आवश्‍यक आहे.

- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Edited By- Archana Banage