Kolhapur : तिहेरी खुनातील संशयितास कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Crime News

Kolhapur : तिहेरी खुनातील संशयितास कोठडी

कागल : काल मंगळवारी येथील गणेशनगर घरकुलमध्ये चारित्र्याच्या संशयावरून येथील एकाने पत्नी, मुलगा व मुलगी अशा तिघांचा गळा आवळून निर्घृण खून केला. खून करून तो पोलिस ठाण्यात हजर झाला होता. प्रकाश धोंडिराम माळी (वय ४२) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी प्रकाशला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, आज दिवसभर घरकुल परिसरात सन्नाटा पसरला होता. याप्रकरणी प्रकाशचे मेहुणे प्रकाश शंकर माळी (रा. तळंदगे) यांनी कागल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार प्रकाशसह त्याचा भाऊ अमोल, वहिनी अंजना, बहीण शारदा सुरेश माळी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास होणार

तिहेरी हत्याकांडाची घटना घडल्यानंतर आज दिवसभर घरकुलजवळ पोलिसांनी कडा पहारा ठेवला आहे. प्रकाशने तिघांचा खून केल्याचे स्वतः पोलिसांना सांगितले असले, तरी या खुनात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास केला जाणार आहे, असे पोलिस निरीक्षक अजितकुमार जाधव यांनी सांगितले.

दुपारपासून रात्रीपर्यंत खुनाच्या घटना

काल दुपारपासून रात्रीपर्यंत खून झाले आहेत. त्या काळात घरकुल अपार्टमेंटमधील अनेकजण जिन्यावरून आले-गेले; पण कोणालाही काहीही कल्पना आली नाही, हे विशेष आहे. ज्यावेळी प्रकाशने पोलिस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली आणि पोलिसांची गाडी घरकुलमध्ये आली. त्यावेळेला सर्वांना ही दुर्घटना कळाली व सुरू असलेला दांडिया सोडून लोकांनी घटना पाहण्यासाठी गर्दी केली.