कोल्हापूर : चित्रनगरीसाठी लागेल तेवढा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State drama Compitition inaugration

कोल्हापूर : चित्रनगरीसाठी लागेल तेवढा निधी

कोल्हापूर - ‘‘मुंबई चित्रनगरीच्या धर्तीवर कोल्हापूरची चित्रीनगरीही विकसित व्हावी, २४ तास चित्रीकरण सुविधा सुरू व्हावी जेणेकरून मराठी हिंदीच नव्हेतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण होऊ शकेल अशा सुविधा देण्यासाठी मंजुरी देत आहोत. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही,’’ अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिली. सांस्कृतिक कार्य संचनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या हिरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी केशवराव भोसले नाट्यगृहात आजपासून सुरू झाली. श्री. देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले.

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘राज्य नाट्य स्पर्धांना ६० वर्षांची परंपरा आहे. स्पर्धेने अनेक कलावंत दिले. ही परंपरा सांस्कृतिक कार्य संचनालय जोपासत आहे. मराठी नाट्य क्षेत्राला नवे काय देता येईल याचा विचार करताना अंतिम फेरीत जे नाटक अव्वल ठरेल अशा नाटकाच्या प्रयोगाला व्यासपीठ दिले जाईल. अभिनय, दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा आदी कलात सरस ठरणाऱ्या कलावंताना मुंबईतील मनोरंजन क्षेत्रात संधी देण्यासाठी त्यांच्या ऑडिशनही घेतल्या जातील.’’ पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘चित्रतपस्वी भालाजी पेंढारकर, व्ही. शांताराम अशा दिग्गज कलावंतांपासून कोल्हापूरची चित्रपट परंपरा सुरू आहे. नव्या काळात चित्रपटनिर्मिती भक्कम करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. चित्रनगरीत मराठी हिंदी चित्रपट मालिकांचे चित्रीकरण होत आहे तरीही गगनबावडा, विशाळगड, पारगड, पन्हाळा आदी भागात चित्रीकरण व्हावे अशी स्थळे विकसित करण्यात येत आहेत. येथे चित्रीकरण पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास रोजगारालाही बळ मिळेल.’’

म्हणून स्पर्धा कोल्हापुरात

अंतिम फेरी सोलापूर, औरंगाबाद, लातूर, मुंबई, येथून आमंत्रणे आली होती; मात्र कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून अंतिम फेरी कोल्हापुरात घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Cultural Minister Amit Deshmukh State Drama Competition Inaugration Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top