
शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज; मतदारांकडून घोषणाबाजी
कोल्हापूर : बघतोय काय मोजून घे, एकच वादा साहेब आमचा, अशा जोरदार घोषणा देत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, भैय्या माने व माजी आमदार के. पी. पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करत कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. पालकमंत्र्यांच्या ठरावदारांनी लाल फेटे, तर यड्रावकर यांच्या ठरावदारांनी कापशी पांढऱ्या टोप्या घालून शक्तिप्रदर्शन करत मुख्य कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केले.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘गगनबावडा तालुक्यातील ६६ पैकी ४६ मतदार आज सोबत आहेत. ३ ठरावदार लग्न समारंभानिमित्त बाहेर गेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदारांचा आणखी आकडा वाढणार आहे. गगनबावडा तालुक्याने २० वर्षांपासून आपल्यावर विश्वास ठेवला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वच ठिकाणी मदत केली आहे. काल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे, खासदार संजय मंडलिक यांची चर्चा झाली. यामध्ये ज्या ज्या तालुक्यात बिनविरोध करता येईल, त्या त्या ठिकाणी निवडणूक बिनविरोध केली जाईल. बॅंकेची पायरी चढल्यानंतर राजकारण केले जाणार नाही. बिनविरोधसाठी निश्चित प्रयत्न केले जातील. कॉंग्रेसमधील सहा जागा आहेत. याबद्दल आमदार विनय कोरे हे आमदार प्रकाश आवाडे यांच्यासोबत चर्चा करतील. त्यानंतर अंतिम फॉर्म्युला निश्चित होईल.’’
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी, प्रा. संजय मंडलिक व भैय्या माने यांनी अर्ज दाखल केले. जिल्हा बॅंक शेतकऱ्यांची अर्थ वाहिनी आहे. यात राजकारण नको. जास्तीत जास्त जागा बिनविरोध झाल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्हा बॅंकेत सहा वर्षांपासून पक्षविरहित काम केले.
बॅंक राज्यात आणि देशात सर्वश्रेष्ठ करायचा प्रयत्न केला. यावर्षीच्या निवडणुकीत सर्व घटकांशी चर्चा केली जात आहे. यामध्ये एकोपा निर्माण केला जात आहे. प्रशासक मंडळ गेल्यानंतर संचालकांनी बॅंकेचा कारभार स्वीकारला. दोन वर्षांत १५० कोटींपेक्षा जास्त नफा कमवला आहे. पाच लाखांपर्यंत कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्वाधिक प्राप्तिकर भरणारी बॅंक म्हणून बॅंकेकडे पाहिले जात आहे. खासदार संजय मंडलिक, संजय घाटगे व आपण एकत्र असल्यामुळे ९० टक्के मतदान आपल्यासोबत आहे. महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये कागल तालुका आघाडीवर राहील.’’
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, ‘‘सहा वर्षांपासून जिल्हा बॅंकेचा कारभार सामंजस्याने सुरू आहे. सहा वर्षात बॅंकेने प्रगती केली आहे. शिरोळ विकास सेवा संस्थांमधून १५० पैकी ११० सभासद अर्ज दाखल करायला आले आहेत. बिनविरोध निवड झाली तर चांगलेच आहे. माजी खासदार संस्था गटातून इच्छुक आहेत, असे नाही. ते भटक्या विमुक्त जाती-जमातीमधून इच्छुक असल्याचे समजते.
नोटबंदीचा फटका
नोटबंदीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. पावणेतीनशे कोटींच्या नोटा रिझर्व्ह बॅंकेने स्वीकारल्या नव्हत्या. सध्या २५ कोटी रुपये अद्यापही बॅंकेत आहेत. यावरही आम्ही मात केल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
हेही वाचा: Bank Election : वर्चस्वासाठी मंत्री, आमदार, खासदारांच्याच उड्या
मुख्यमंत्री ठाकरेंचा गौरव
महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. आघाडी स्थापन झाल्यानंतर कोरोना आल्याने विकास कामांवर परिणाम झाला. दोन वर्षात ३४ लाख शेतकऱ्यांची २३ हजार कोटीची थकबाकी माफ केली. वादळग्रस्तांना २१ हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. वास्तविक महाराष्ट्रात शांत आणि संयमी असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यामुळे कोरोनाला आळा बसला आहे. देशातील सर्वाधिक चांगला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचेच नाव अग्रेसर असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
सरकार भक्कम
सुशांतसिंह राजपूतसह इतर घटना, महापुराची भरपाई, एसटी कर्मचारी आंदोलन अशा अनेक ठिकाणी विरोधकांनी सरकारला घेरले; पण अजूनही तीन वर्षे त्यांना असेच प्रयत्न करावे लागतील; पण सरकार भक्कम राहील, यात शंका नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
देवदर्शन करून अर्ज
मुश्रीफ यांनी कागल येथील गहिनीनाथ गैबीपीराचे दर्शन घेऊन दर्ग्यातच उमेदवारी अर्जावर सही केली. लिंगनूर दुमाला येथे हनुमानाची आरती केली. श्रीरामाचे दर्शन घेऊन त्यांनी जिल्हा बॅंकेत येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
Web Title: Demonstration Of Candidature Application Proclamation From Voters
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..