
कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासंदर्भात दिवाळीनंतर मंत्रालयात व्यापक बैठक घेऊ, हद्दवाढ करण्यात असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करू, असे आश्वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी आज हद्दवाढ समर्थन कृती समिती शिष्टमंडळाला दिले. विविध कार्यक्रमानिमित्त ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असता मंगरायाची वाडी येथील दिलीप मोहिते यांच्या हेलिपॅडवर त्यांची हद्दवाढ समर्थन कृती समिती शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी राज्य (Chandrakant Jadhav) कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार आदींनी हद्दवाढ ही काळाची गरज असल्याचे सांगत काही झाले तरी हद्दवाढ करा, असा आग्रह धरला. भरगच्च कार्यक्रम आणि धावता दौरा असल्यामुळे अत्यंत आटोपशीर बैठक घेण्यात आली. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावेळी मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘कोल्हापूरकरांच्या भावना मला समजल्या आहेत. दिवाळीनंतर कोल्हापूरच्या हद्दवाढीसंदर्भात आपण मुंबई येथे मंत्रालयात व्यापक बैठक घेऊ. हद्दवाढ करण्यात ज्या तांत्रिक अडचणी येतात, त्या तांत्रिक अडचणी दूर करून कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करू'. या आश्वासनानंतर बैठक आटोपती घेण्यात आली. दहा महिन्यांपूर्वी ८ जानेवारी ला मंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.
गेल्या दहा महिन्यांपासून यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या जात आहेत. कोल्हापूर शहरात हद्दवाढ समर्थन कृती समितीच्या ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांनी शहरातील विविध संस्था संघटनांशी संवाद साधून हद्दवाढीच्या बाजूने मोठे जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कृती समितीचे निमंत्रक म्हणून आर. के. पोवार, बाबा पार्टे यांनीदेखील यामध्ये सहभाग घेत आंदोलनाची व्याप्ती वाढविली. या पार्श्वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर येणार म्हटल्यावर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याशी समन्वय साधून कृती समितीने एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज बैठकीचे आयोजन केले होते.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘मंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ कमी आहे तरीदेखील ही बैठक आयोजित केली आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी मी विधिमंडळात उपोषण केले होते. त्यावेळी हद्दवाढीचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असताना काहींचा विरोध लक्षात घेऊन हा निर्णय थांबवला. आता हद्दवाढ व्हायलाच पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत.’
आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, ‘हद्दवाढ नसल्याने कोल्हापूर मागे पडत आहे. अनेक शहरे कोल्हापूरच्या पुढे गेली. त्यामुळे आता हद्दवाढ व्हायलाच हवी. हद्दवाढीशिवाय पायाभूत सुविधा निर्माण होणार नाहीत, स्थानिक तरुणांना नोकऱ्या मिळणार नाहीत.’
आर. के. पोवार म्हणाले, ‘हद्दवाढ नसल्याने अनेक अडचणी येतात. कोल्हापूरला मागूनही हद्दवाढ मिळेना. हे दुर्दैव आहे. आपण काही झाले तरी हद्दवाढीचा निर्णय घ्या.’ महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेने पाठवलेल्या प्रस्तावाची माहिती दिली. यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, क्रेडाईचे विद्यानंद बेडेकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, सुभाष जाधव चंद्रकांत बराले, अशोक भंडारे, किशोर घाटगे, सतीशचंद्र कांबळे, सुभाष देसाई, अनिल घाटगे, जयकुमार शिंदे, दुर्गेश लिंग्रस आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.