esakal | कोल्हापूर : इचलकरंजीत मोठ्या घडामोडींचे संकेत, आवाडे-हाळवणकरांची भूमिका ठरणार महत्त्वाची

बोलून बातमी शोधा

election of corporation in ichalkaranji political changes possibility in kolhapur

पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे यातून निर्माण होणाऱ्या नव्या राजकीय समीकरणांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

कोल्हापूर : इचलकरंजीत मोठ्या घडामोडींचे संकेत, आवाडे-हाळवणकरांची भूमिका ठरणार महत्त्वाची
sakal_logo
By
पंडित कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरात आतापासूनच पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागले आहेत. इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करण्यास सुरवात केली आहे. नागरी प्रश्‍नांच्या आंदोलनातून नवे नेतृत्व पुढे येत आहे; मात्र संभाव्य राजकीय परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे इच्छुक संभ्रमात आहेत. वेगवेगळ्या निवडणुकांच्या निमित्ताने नव्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे यातून निर्माण होणाऱ्या नव्या राजकीय समीकरणांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 
 

फ्लॅशबॅक

पालिकेच्या गत सार्वत्रिक निवडणुकीत भाजप व ताराराणी आघाडी यांची युती, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व राजर्षी शाहू आघाडी यांची आघाडी होती. नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून होती. यात भाजपच्या उमेदवार नगराध्यक्षा अलका स्वामी राज्यात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून आल्या; तर बहुमत काँग्रेस आघाडीने मिळविले. मात्र, यातील माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी’चा गट निवडणुकीनंतर भाजप-ताराराणीच्या तंबूत दाखल झाला. त्यामुळे भाजप आघाडीची भरभक्कम सत्ता पहिली तीन वर्षे कायम राहिली. नंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद पालिकेच्या राजकारणात उमटले. त्यानंतर सत्तेत मोठा फेरबदल झाला.

हेही वाचा - एका शाळेत शिक्षक पाच वर्षे राहणार; शासनाचे सुधारित बदली धोरण

भाजपबरोबर पहिले तीन वर्षे सत्तेत आलेल्या ‘राष्ट्रवादी’सह नगरसेवक सागर चाळके यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीला सत्तेबाहेर जावे लागले, तर आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमधील आवाडे गट, ‘राष्ट्रवादी’चे नेते मदन कारंडे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडी सत्तेत आली. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले आमदार आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर व कारंडे या निमित्ताने पालिका सत्तेत एकत्र आले. पालिकेच्या राजकारणातही धक्कादायक घडामोड समजली गेली. 

सद्यस्थिती

सध्या पालिकेत विरोधक कोण व सत्ताधारी कोण, याबाबत अनेकदा गोंधळ निर्माण होत आहे. प्रत्येकाची भूमिका सोयीनुसार ठरते. सार्वत्रिक निवडणुकीला अगदी काही महिनेचे उरले आहेत. त्यामुळे संभाव्य राजकीय घडामोडींना हळूहळू सुरवात होताना दिसते. सद्यस्थिती पाहता पुढील काळात धक्कादायक अशी नवीन समीकरणे उदयास येण्याची चिन्हे आहेत. राज्यातील महाविकास आघाडी शहरात आकारास येणार काय, याची उत्सुकता आहे. काँग्रेसकडून नवीन राजकीय धमाका करण्याच्या हालचाली सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीतील सुरेश हाळवणकर यांच्या पराभवानंतर शहरातील भाजपच्या वाढीला काहीअंशी मर्यादा आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही गटा-तटातून सावरलेली नाही. इचलकरंजीतून मोठे मताधिक्‍य मिळालेल्या खासदार धैर्यशील माने यांचा या निवडणुकीत शिवसेनेला कितपत फायदा होणार, हे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. इच्छुकांकडून याचा अंदाज घेतला जातो, तर संभाव्य प्रभाग गृहीत धरून इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली.

हेही वाचा -  गोकुळ रणांगण; सत्तारूढ गटाचे नेते उतरले मैदानात, संचालकांवर जबाबदारी निश्‍चित

पुढे काय? 

शहरात राज्याप्रमाणे महाविकास आघाडी पॅटर्न आकारास आल्यास आजी-माजी आमदारांसमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे. आमदार आवाडे यांच्या नेतृत्वाखाली ताराराणी पक्ष सर्वच जागा लढविण्याची शक्‍यता आहे; पण ऐनवेळी त्यांची कोणाबरोबरही युती होऊ शकते. भाजपची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. 

घडलं-बिघडलं

 • घडामोडीनंतरही भाजप आघाडीचे बहुमत कायम
 • काँग्रेसमधील आवाडे गट सत्तेत, तर दुसरा गट विरोधात
 • सध्या ‘राष्ट्रवादी’तील कारंडे गट सत्तेत; जांभळे गट विरोधात
 • विधानसभेनंतर आवाडे गटाला उभारी
 • जिल्ह्यातील नेत्यांची निवडणुकीत ‘एंट्री’ची शक्‍य
 • नगरसेवक सागर चाळके गटाच्या पुढील वाटचालीकडे लक्ष

पक्षीय बलाबल 

 • एकूण जागा     ६२
 • रिक्त जागा     १
 • नगराध्यक्ष     भाजप
 • भाजप     १४
 • राष्ट्रवादी     ६ 
 • काँग्रेस     १८
 • ताराराणी आघाडी     ११
 • शाहू आघाडी     ९ 
 • शिवसेना     १
 • अपक्ष     २