आई-वडिलांचे बळ ऊर्जा देणारे...

चौदा वर्षांखालील विम्बल्डनसाठी निवड झालेल्या ऐश्‍वर्याची भावना
Aishwarya Jadhav
Aishwarya JadhavSakal

कोल्हापूर - ‘माझ्या करिअरची वाट कोणती असावी, यासाठी आई-वडिलांचा माझ्यावर दबाव आजही नाही. वडिलांना लॉन टेनिसची आवड होती, म्हणून मी टेनिसकडे वळले असेही नाही. मला बारामतीतील स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले. ते माझे पहिले बक्षीस होते. त्याने हुरूप वाढला. त्यानंतर मी विविध स्पर्धेत सहभागी व्हावे, यासाठी आईने तिची नोकरीही सोडली. आई-वडिलांचा शाबासकीचा हात पाठीवर कायम आहे. त्यामुळेच मी टेनिसमध्ये स्वतःला अजमावण्यासाठी सज्ज झाली आहे.’ चौदा वर्षांखालील विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड झालेली कोल्हापूरची कन्या ऐश्‍वर्या दयानंद जाधव सांगत होती.

ऐश्‍वर्या छत्रपती शाहू विद्यालयाची विद्यार्थिनी. ती इयत्ता नववीत शिकते. विम्बल्डन स्पर्धेसाठी चौदा वर्षांखालील गटात निवड होणारी ती देशातील एकमेव आहे. मेरी वेदर मैदानावरील टेनिस कोर्टवर तिचा सराव सुरू होता. त्यावेळी तिच्याशी संवाद साधला. ती म्हणाली, ‘माझे वडील अभियंता असून, ते रोड सर्वेअरचे काम करतात. आई अंजली गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात सीएचबी तत्त्वावर प्राध्यापक होती. मी, पाच वर्षांपूर्वी मेरी वेदरवरील कोर्टवर प्रशिक्षक अर्शद देसाई यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. पहिल्या यशाने माझा आत्मविश्‍वास वाढला. त्यानंतर नागपूर येथे दहा वर्षांखालील राज्य मानांकन स्पर्धेत मला विजेतेपद मिळाले. परभणी, औरंगाबादच्या स्पर्धेत उपविजेती ठरले. माझ्या यशातील सातत्याताला ब्रेक लागू नये, यासाठी आईने नोकरी सोडली.’

‘विम्बल्डन स्पर्धेत माझे प्रतिस्पर्धी कोणत्या देशाचे असतील, याची मला सध्यातरी कल्पना नाही. त्यांना टक्कर देण्यासाठी मला परिपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे. दररोज सकाळी सहा ते साडेसात माझा फिटनेसवर भर असतो. साडेसात ते साडेआठपर्यंत नाश्ता व विश्रांतीची वेळ असते. त्यानंतर मी पुन्हा सरावाला सुरुवात करते. सकाळी अकरापर्यंत सराव केल्यानंतर शाळेला जाते. पुन्हा चार वाजता माझा सराव सुरू होतो.’ सरावासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याची जाणीव शाहू विद्यालयातील शिक्षकांना आहे. ते मला प्रोत्साहन देण्यात कमी पडत नाहीत, असेही तिने स्पष्ट केले.

निवडीचा ई-मेल सुखद धक्का देणारा...

इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनतर्फे वर्ल्ड ज्युनिअर फायनल क्वॉलिफाईंग चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. त्यात आशियातून सोळा संघ सहभागी होते. त्यातून टॉप चार संघ निवडण्यात आले. एका संघात तीन खेळाडूंचा समावेश होता. भारतीय संघातून मी प्रतिनिधित्व केले. माझे रॅंकिंग उत्तम होते. त्यामुळे माझ्या निवडीचा आलेला ई-मेल सुखद धक्का देणारा होता, असे ऐश्‍वर्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com